एकविसाव्या वाढदिवशी वडिलांनी मुलाला दिली अनोखी भेट आणि आयुष्यभराची अनमोल शिकवण!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 04:02 PM2021-05-10T16:02:22+5:302021-05-10T16:02:42+5:30
कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती अयोग्य नसते, तिला योग्य जागेची, परिस्थितीची, माणसांची गरज असते, तरच तिची योग्य किंमत ठरते.
एका वडिलांनी आपल्या मुलाला त्याच्या एकविसाव्या वाढदिवसाच्या दिवशी एक भेटवस्तू दिली. मुलाने कुतूहलाने भेटवस्तू उघडून पाहिले, तर त्यात अतिशय जुने घड्याळ होते. त्याचा चेहरा पडला. तो वडिलांना म्हणाला, `वाढदिवसाच्या दिवशी अशी भेटवस्तू कोणी देते का?'
वडील म्हणाले, `बेटा, हे घड्याळ साधेसुधे नाही, तर २०० वर्षे जुने घड्याळ आहे. आपल्या पूर्वजांनी जतन केलेला ठेवा, तुझ्या हाती देत आहे. आता हे घड्याळ सांभाळून ठेवायचे की विकून टाकायचे, ते तू ठरव.'
मुलगा म्हणाला, `बाबा, या घड्याळ्याच्या बदल्यात कोणी पाच रुपयेसुद्धा देणार नाही. हे मी ठेवून काय करू? तुम्हीच तुमच्या जवळ ठेवा.'
वडील म्हणाले, `असे म्हणतोस? चल या घड्याळाची किती किंमत मिळते ते पाहू!'
बाप बेटे जुने घड्याळ घेऊन एका भंगारवाल्याकडे गेले. भंगारवाल्याने घड्याळ पाहिले व म्हणाला, `हे घड्याळ एवढे जुने आहे, की याच्या मोबदल्यात मी तुम्हाला एक दमडीसुद्धा देणार नाही. हे घड्याळ गटारात फेकून द्या.'
बाप बेटे घड्याळाच्या दुकानात गेले. घड्याळवाल्याने डोळ्याला भिंग लावून घड्याळ बारकाईने पाहिले. तो म्हणाला, `घड्याळ फार जुने दिसते. परंतु आताच्या काळात त्याचा उपयोग नाही. फार तर तुम्हाला या घड्याळाचे मी पन्नास ते शंभर रुपए देऊ शकतो.'
बाप बेटे एका मोठ्या वास्तुसंग्रहायलात गेले. तिथल्या अधिकाNयाला भेटले. त्यांना हे घड्याळ दाखवले. ते अधिकारी पुरातन वस्तुंचे अभ्यासक होते. त्यांनी घड्याळाचे बराच वेळ निरीक्षण केले आणि उठून उभे राहत बाप बेट्यांचे अभिनंदन केले व म्हणाले, `एवढी जुनी आणि सुंदर वस्तू आमच्या वास्तू संग्रहालयात असेल, तर आमच्यासाठी ती अभिमानाची बाब असेल. या घड्याळाच्या मोबदल्यात तुम्हाला लाखो रुपये द्यायला मी तयार आहे.'
मुलाचे डोळे विस्फारले. वडिलांनी अधिकाऱ्यांचे आभार मानले. व आपण इथे घड्याळाची किंमत जाणून घेण्यासाठी आलो होतो असे सांगितले. त्या वाढदिवसाच्या दिवशी मुलाला वडिलांकडून मोठी शिकवण मिळाली. ती अशी, 'आपल्या कर्तृत्त्वाला शोभेल अशी जागा निवडा आणि आपल्या कर्तृत्त्वाची पारख करेल अशी व्यक्ती निवडा!'
कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती अयोग्य नसते, तिला योग्य जागेची, परिस्थितीची, माणसांची गरज असते, तरच तिची योग्य किंमत ठरते.