येत्या दिवाळीत 5G ची सुरुवात होणार आहे, तरी गुरु'जी'ना पर्याय नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 07:00 AM2022-08-31T07:00:00+5:302022-08-31T07:00:02+5:30

आपल्या आयुष्यात शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करणारी मार्मिक गोष्ट!

5G is going to start in the coming Diwali, but Guru'ji will guide forever! | येत्या दिवाळीत 5G ची सुरुवात होणार आहे, तरी गुरु'जी'ना पर्याय नाही!

येत्या दिवाळीत 5G ची सुरुवात होणार आहे, तरी गुरु'जी'ना पर्याय नाही!

googlenewsNext

एकदा एक व्यक्ती हॉटेलमध्ये जेवायला गेली असते. तिथे तिला आपल्या बालपणीचे शिक्षक दिसतात. ती व्यक्ती आपणहून ओळख देते. शिक्षकांना ओळख पटत नाही, तेव्हा ती व्यक्ती आपल्या बालपणीचा किस्सा शिक्षकांना सांगते. 

'बाई, तुम्हाला आठवतंय? मी तिसरीत असताना आपल्या वर्गात एक मुलगा घड्याळ लावून आला होता. ते घड्याळ मला अतिशय आवडले होते. ते चोरण्याचा मोह मला आवरला नाही. मागचा पुढचा विचार न करता मी ते घड्याळ चोरलेही! काही वेळाने त्या मुलाने घड्याळाची शोधाशोध केली. पण घड्याळ सापडेना. त्याने तुमच्याकडे येऊन तक्रार केली. तुम्ही सगळ्या मुलांना म्हणालात, ''कोणी याचे घड्याळ घेतले असेल तर परत करा नाहीतर मला प्रत्येकाचे दप्तर तपासावे लागेल.'' 

मी खूप घाबरलो होतो. पण खरं सांगायची हिंमत होईना. तुम्ही सगळ्यांच्या दप्तराची तपासणी सुरू केलीत. मला घाम फुटलेला. मी घाबरलो होतो. तुम्ही शिक्षा कराल वरून सगळे वर्गमित्र मला चोर चोर म्हणणार याची भीती वाटत होती. आम्हा सगळ्यांना तुम्ही भिंतीकडे डोळे करून उभे राहायला सांगितले होते.  तुम्ही सगळ्यांची तपासणी करत माझ्या बाकाजवळ आलात. तुम्हाला दप्तरात घड्याळ मिळालं. तुम्ही माझे नाव न घेता त्या मुलाला घड्याळ परत केले. वरून मला ओरडलाही नाही. तुमच्या या वागण्याचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला. माझी मला लाज वाटली आणि त्या दिवसापासून दुसऱ्यांच्या वस्तूला हात लावायचा नाही असा पण केला! तुम्ही जर त्या दिवशी माझं नाव जाहीर केलं असतं आणि माझी बदनामी झाली असती तर मी कोणालाच तोंड दाखवू शकलो नसतो. पण तुम्ही मला वाचवलंत!

हे सगळं ऐकून झाल्यावर शिक्षिका म्हणाल्या, ''तू सांगितल्यावर मला तो प्रसंग आठवला. पण गंमत अशी की ते घड्याळ चोरणारा मुलगा तू होतास हे मलाही माहीत नव्हतं, कारण तुम्हा सगळ्यांना डोळे मिटायला सांगून मी सुद्धा डोळे मिटून चाचपडत तुमची दप्तरं तपासली होती!

हे ऐकल्यावर विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले. तो म्हणाला, 'बाई आमच्या चुका तुम्ही पदरात घेतल्यात, न बोलता शिकवण दिलीत  आणि आजच्या खुलाशावरून दुसऱ्यांना सावरून घेण्याचा संस्कारही घातलात!

असे असतात शिक्षक, छोट्याशा कृतीतूनही मोठी शिकवण देणारे! म्हणून शीर्षकात म्हटले आहे, 5G चा काळ आला तरी गुरुजींना पर्याय नाही!

Web Title: 5G is going to start in the coming Diwali, but Guru'ji will guide forever!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.