कनार्टक संगीताचे जनक व थोर संत पुरंदरदास यांच्या पुण्यतिथीनिमित्त अल्प परिचय!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 03:45 PM2024-02-09T15:45:39+5:302024-02-09T15:45:59+5:30
भारत ही संतांची भूमी; पुरंदर दास हे त्यापैकीच एक; त्यांनी कर्मकांडाचे अवडंबर करणाऱ्यांवर सडेतोड टीका केली आणि समाजाला अध्यात्माची दिशा दिली.
>> योगेश काटे, नांदेड
एका महान भगवद् भक्ताची पुण्यतिथी व मुख्याराधना दिवस आहे. ज्ञानविरहीत भावना व भावनेविरहीत ज्ञान हे दोन्ही अपूर्ण आहे. महाराष्ट्रातील संतांनी तसेच कर्नाटक प्रांतातील हरीदाससाहित्य परंपरेतील संतांनी या दोन्हीचा समतोल राखुन भक्ती संप्रदाय फुलवला व वाढवला. जसे महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास स्वामी, एकनाथ महाराज, नामदेव महाराज यांनी भक्तीचा मळा फुलवला तसच कर्नाटकात वैष्णव परंपरेने फुलवला आहे. यात श्री अचलानंद दास, श्री नरहरी तीर्थ, श्री व्यासराय, श्री वादिराज स्वामी, श्री कनकदास,श्री पुरंदरदास, श्रीराघवेंद्र स्वामी, श्री जगन्ननाथदास ही दासकुट व व्यासकुट भक्तांची परंपरा खुप मोठी आहे. या परंपरेचे प्रेरणास्थान म्हणजे भक्ती संप्रदायाचे उध्दारकर्ता श्रीमदांतीर्थ म्हणजे श्री मध्वाचार्य हे आहेत. श्री मध्वाचार्य यांनी प्रतिपादीत केलेला भक्तीसिध्दांत स्वीकारुन या दोन्ही परंपरने आपली वाटचाल सुरु केली. श्रीमदांतीर्थ यांचा भक्तीसिध्दांत म्हणजे परमेश्वर प्राप्तीसाठी सर्वात महत्वाचे साधन म्हणजे निर्मळ अंत:करणयुक्त परमेश्वराची भक्ती आराधना हेच आहे. याच परंपरेतील एका महान संताचे आज पुण्यस्मरण आहे. ते म्हणजे संत पुरंदरदास होय.
थोर संतकवी, शास्त्रीय संगीतकार व रचनाकार. वसिष्ठ गोत्र उत्पन्न यजुर्वेदी ब्राह्मण असून माध्वमत अनुयायी होते. जन्मस्थानाबद्दल विद्वान लोकांमध्ये मतभेद आहे. त्यांच्या वडिलांचे नाव वरदप्पा नायक. ते रत्नांचे व्यापारी होते तसेच विजयानगरच्या कृष्णदेवरायांच्या दरबारात ते रत्नपारखी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी या व्यवसायात भरपूर संपत्ती मिळविली, तरी मात्र वृत्ती कृपण होती. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह सरस्वतीबाई यांच्याशी झाला. त्यांची पत्नी सरस्वतीबाई तिच्या दानशीलतेमुळे नवऱ्याच्या रोषास पात्र झाली असता, तिने एका ब्राह्मणाला दान म्हणून दिलेली नथ ईश्वरी चमत्कारामुळे परत तिच्या नवऱ्याच्या हाती आली आणि तिची अब्रू वाचली. या चमत्कारामुळे तिम्मप्पा नायक यांनी धनदौलत सोडून भिक्षापात्र अवलंबिले, अशी एक आख्यायिका आहे.
पुरंदरदासांचे जन्मनाम श्रीनिवास तथा तिम्मप्पा नायक. संस्कृत, कन्नड, संगीत या विषयांत त्यांनी शास्त्रोक्त ज्ञान संपादन केले होते श्री व्यासराय यांनी तिमप्पा नायक यांना माध्व वैष्णव पंथाची दीक्षा दिली (१५२५) व पुरंदर विठ्ठल असे त्यांचे नाव ठेवले; पण व्यवहारात ते नाव पुरंदरदास असे झाले. पुरंदरदास जसे महान भगवद्भक्त होते, तसेच ते मोठे संगीतज्ञही होते. कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून त्यांना गौरविले जाते. कर्नाटक संगीत शिकविण्यासाठी त्यांनी पाठ तयार केले, म्हणून त्यांना आदिगुरू मानतात. कर्नाटक संगीताचे प्रमुख प्रवर्तक त्यागराज, मुथ्थुस्वामी दीक्षितर आणि श्यामशास्त्री यांना पुरंदरदासांपासूनच प्रेरणा मिळाली. त्यांनी रचलेले ‘कीर्तन’, ‘सुळादी’ आणि ‘उगाभोग’ हे काव्यप्रकार प्रसिद्ध आहेत तसेच त्यांनी कानडी भाषेत ‘देवरनाम’ नामक भक्तिरचना केल्या. त्यांनी सु. ४,७५,००० पदे रचली असावीत, असे मानले जाते; तथापि त्यांपैकी काही हजार पदेच उपलब्ध आहेत. दक्षिण भारतात सर्वत्र गायल्या जाणाऱ्या त्यांच्या पदांमध्ये पुरंदर विठ्ठल असे कर्त्याचे नाव असते. ज्ञानेश्वर, तुकाराम इ. संतांनी महाराष्ट्रात भगवद्भक्तीचा प्रचार व प्रसार केला त्याप्रमाणेच पुरंदरदासांनी दक्षिणेत, विशेषतः कर्नाटकात भक्तिपंथास लोकप्रियता मिळवून दिली. त्यांच्या अनेक भजनांचे विविध भारतीय भाषांमध्ये अनुवाद केलेले आहेत.
पुरंदरदासांनी भक्तीच्या प्रांतातील ढोंगावर व विसंगतीवर आणि सोवळ्याचे अवडंबर करणाऱ्यांवर नेमकेपणे टिका केली आहे. त्यांनी सांगितले की तुमच मन शुध्द करा तेच खऱ्या अर्थाने सोवळे आहे. पुरंदरदास हे माध्व संप्रदायी आहेत. पांडुरंगाचे अनन्य भक्त आहे. त्यांच्या मुख्यत्वे रचना या श्रीकृष्णाच्या बाल लिलांवर आहेत. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या रचना केल्या आहेत.त्या जवळपास चार लाखांच्या वर आहेत.पण विपरीत राजकीय परिस्थिती मुळे या रचना नष्ट झाल्या असे संशोधकांच मत आहे. आता काही हजार रचना राहिल्यात. त्यांच्या भक्ती रचना खुप रसाळ तर आहेतच व त्या हरिभक्तीचा गोडवा आहे.
भारतीय टपाल खात्याने त्यांच्या ४०० व्या पुण्यतिथिनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण केले. अभिनेता गिरीश कर्नाड यांनी कर्नाटक संगीतातील दोन महान विभूती म्हणून पुरंदरदास आणि कनकदास यांच्यावरील कनक-पुरंदर या माहितीपटाची निर्मिती केली (१९८८). २००७ मध्ये बंगळूर येथे पुरंदरदास मेमोरियल ट्रस्टची स्थापना करण्यात आली. या ट्रस्टकडून पुरदरदासांच्या विविध रचनांचा प्रसार केला जातो.श्री पुरंदरदासांच्या अनेक कन्नड भक्ती रचना प्रसिद्ध आहे. त्या पैकी विविध देवतांवरील त्यांच्या भक्तीरचना पाहुयात.
श्री लक्ष्मी देवी वरील भाग्यदा लक्ष्मा बारम्मा, श्री मुख्यप्राणांवरील भक्ती रचना, बिडुवेनेनो हनुमान निन्न बिडुवेनेनय्या, भजरे हनुमंत, करव मुगिदा मुख्यप्राण,
हनुमन मतवे हरिय मतवो, श्री विठ्ठलावरील भक्तीरचना, शरणु निनगे शरणेंबेनु विठ्ठला, विठ्ठल सलहो, इट्टिगेमेले निंतानम्म विठ्ठला, श्री नरसिंहावरील भक्ती रचना, सिंहरूपनाद श्रीहरि, श्री व्यंकटेश इंदु निन्न मोरेया होक्के वेंकटेशने श्रीकृष्णावरील अनेक भक्तीरचना माधुर्यपूर्ण आहेतच त्या बरोबरच त्यात वेदांत तत्वज्ञानाचे सार भरले आहे. श्री विजयदासांनी त्यांच्या रचनेतुन श्री पुरंदासांच्या अनेक कथा सांगितल्या आहेत. त्यांच्या रचनेत विविधता आढळते जसे की तीर्थक्षेत्रमहात्यावर , श्रीमध्वाचार्य व गुरूपंरपरेवर, पुराण कथासार एकादशी महात्म्य, अह्निक पद्धती, जयंती निर्णय, गंडकी महात्म्य व कल्याण चरित्र अशा अनेक विषयांवर मधुर रचना त्यांनी केल्या.उद्या मुख्याराधना दिवस या संतश्रेष्ठास कोटी कोटी नमन.
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।