मृत्यूनंतरचा प्रवास सोपा व्हावा म्हणून वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी केले जाते विशेष व्रत; जाणून घ्या सविस्तर माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 02:27 PM2022-11-05T14:27:40+5:302022-11-05T14:27:59+5:30

आपल्या संस्कृतीत जन्माचाच नाही तर मृत्यूनंतरचाही दीर्घ विचार करून ठेवला आहे, तो नेमका काय आहे, जाणून घेऊ. 

A special Ritual on Vaikuntha Chaturdashi to make the journey after death easier; Learn more details! | मृत्यूनंतरचा प्रवास सोपा व्हावा म्हणून वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी केले जाते विशेष व्रत; जाणून घ्या सविस्तर माहिती!

मृत्यूनंतरचा प्रवास सोपा व्हावा म्हणून वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी केले जाते विशेष व्रत; जाणून घ्या सविस्तर माहिती!

googlenewsNext

कार्तिक शुक्ल चतुर्दशी ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावेही ओळखली जाते. यंदा ६ आणि ७ नोव्हेम्बर रोजी ही तिथी विभागून आली आहे. त्यामुळे या दोन्ही दिवशी हरी आणि हर यांची पुढे दिल्याप्रमाणे उपासना करता येईल. असे म्हणतात, की या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर भगवान महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केले होते आणि भगवान शंकरांची प्रार्थना केली होती. त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले, की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला, की यादिवशी जे विष्णू भक्त किंवा शिव भक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील, त्यांना वैकुंठप्राप्त होईल.

मृत्यूनंतर नरकात जावे, असे कोणाला वाटेल? आयुष्यभर हालअपेष्टा सहन केल्यानंतर मृत्यूपश्चात तरी आत्म्याला सद्गती मिळावी, असे प्रत्येकाला वाटते. ती वाट सुकर व्हावी, म्हणून आपण आयुष्यभर चांगले आचरण करतो आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी, म्हणून व्रत-वैकल्य करतो. वैकुंठ चतुर्दशीचे व्रत ही त्यापैकीच एक!

वैकुंठ चतुर्दशीलाच काशी विश्वनाथ स्थापना दिवस असेही म्हणतात. यादिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांची प्रार्थना केली जाते व षोडशोपचार पूजा करून स्तोत्रपठण केले जाते. 

आषाढी एकादशीला भगवान महाविष्णू झोपतात, ते थेट कार्तिकी एकादशीला उठतात, असे म्हटले जाते. विष्णूंच्या अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात. याबद्दल कृतज्ञता म्हणून विष्णू महादेवाला फळे, फुले आणि बेल वाहतात, तर महादेवदेखील विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात. हे हरी हर ऐक्य, प्रेम, सद्भावना, एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो. तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपण दोहोंची उपासना करावी, हा वैकुंठ चर्तुदशी मागील हेतू आहे. 

वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरी-हर स्तोत्र म्हणतात. अन्यथा विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो, परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते. 

देवाधिदेव महादेवांना प्रसन्न केले असता, आपसुक माता पार्वतीदेखील प्रसन्न होते आणि भगवान विष्णूंचे ध्यान केले असता, त्यांच्यासह लक्ष्मी मातेचीही कृपादृष्टी लाभते. त्यामुळे घरातील दु:ख, दारीद्र्य नाहीसे होऊन, आयुष्यातील नरक यातना मिटतात आणि जिवंतपणीच वैकुंठप्राप्तीचा आनंद अनुभवता येतो. 

स्वर्ग म्हणजे तरी नेमके काय, स्व म्हणजे स्वत: आणि ग म्हणजे सभोवतालचा परिसर. आपण निर्माण केलेले विश्व आणि आपल्या विश्वातील आनंददायी क्षण म्हणजे स्वर्ग. तसेच नरक म्हणजे नराने निर्माण केलेला, तो नरक! वाईट गोष्टी पेरल्या तर फळही वाईटच येते. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले परंतु मानवाने आपल्या हातांनी बरेच काही गमावले. त्यामुळे जी स्थिती निर्माण झाली, तो नरक! 

मनुष्यासमोर चांगला आदर्श, चांगले विचार, चांगले आचार असले, की तो ठरवूनही मनात वाईट विचार आणू शकत नाही. यासाठीच चांगल्या कथा-कहाण्यांचे पारायण केले जाते. त्यातून प्रेरणा घेतली जाते. आपण आपले शुल्लक काम दुसऱ्याच्या अंगावर ढकलून मोकळे होतो. इथे तर चार महिन्यांचा ओव्हर टाईम करूनही महादेवांनी कुठलीही तक्रार केली नाही. आहे ना कौतुकास्पद? हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही वैकुंठ चतुर्दशी साजरी करूया.

Web Title: A special Ritual on Vaikuntha Chaturdashi to make the journey after death easier; Learn more details!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.