भग्वद्गीतेतला दोन ओळींचा श्लोक तुमचे आयुष्य बदलू शकतो, फक्त तो झोपण्यापूर्वी रोज म्हणायला हवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 05:12 PM2023-06-14T17:12:59+5:302023-06-14T17:14:09+5:30
हा एक श्लोक तुमची सगळी काळजी दूर करेल, रोज रात्री म्हणा आणि अनुभव घ्या!
जिभेला आणि मनाला चांगले वळण लावायचे असेल तर चांगले स्तोत्र मनन, पठण करण्याची सवय लावून घ्यायला हवी. जेणेकरून रोज नित्य नेमाने ही स्तोत्र म्हटली जातील आणि कळत नकळत आपल्या मनाला चांगले वळण लागेल. एकदा का स्तोत्रपठणाचा सराव झाला की तुम्हाला त्यासाठी वेगळे कष्ट घ्यावेच लागणार नाहीत, स्तोत्र आपोआप म्हटली जातील. या श्लोकांचे, स्तोत्रांचे महत्त्व दैनंदिन आयुष्यात कळत नसले तरी अडीअडचणीच्या काळात हेच श्लोक मंत्रासारखे उपयोगी ठरतात. कारण ते रोज म्हटले गेलेले असतात. त्यामुळे आपोआप सिद्धी प्राप्त होते आणि त्या श्लोकांमुळे मानसिक बळ मिळते.
भगवद्गीतेच्या बाबतीत तर तुम्ही ऐकले असेलच, की आपल्या आयुष्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे गीतेत सापडतात. त्यामुळे संस्कृत मधील गीता वाचन शक्य नसेल तर विनोबा भावेंच्या गीताई वाचनाचा नित्य सराव ठेवावा आणि शक्य तेवढे श्लोक मुखोद्गत करण्याचा प्रयत्न करावा. असाच एक श्लोक आहे भगवद्गीतेचा.
आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते, यावर सबंध दिवस अवलंबून असतो. त्याचप्रमाणे दिवसाचा शेवट कसा होतो, यावर पुढचा दिवस अवलंबून असतो. दुर्दैवाने आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट मोबाईलने होतो. त्यामुळे मोबाईलमधून आपण जे विचार पाहतो, ऐकतो, तेच आपल्या मनात रुजत असतात. मात्र, अध्यात्मिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि वैद्यकीय दृष्ट्या ते योग्य नाही. मग, त्यावर उपाय काय? तर हा भग्वद्गीतेतील श्लोक -
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।
श्लोकाचा अर्थ : जो भक्त अनन्य भावाने मला शरण येतो, त्याचा रोजचा योगक्षेम मी वाहून नेतो. हे आश्वासन खुद्द भगवान श्रीकृष्ण यांनी केवळ अर्जुनाला नाही, तर समस्त मानव जातीला दिले आहे.
म्हणून रोज चिंतेचे ओझे मानेवर आणि मनावर वाहत राहण्यापेक्षा आपण आपल्याकडून शंभर टक्के प्रयत्न करावे आणि बाकीचा भार भगवंतावर सोपवून निश्चिन्त राहावे. आपली काळजी घेणारे कोणी आहे, ही भावना अत्यंत दिलासादायक असते. म्हणून आज रात्रीपासूनच हा प्रयोग करून पहा. तना मनावरचा भार एकाएक हलका झाल्यासारखा वाटेल आणि दिवसाची सुरुवात आणि शेवट मंगलमयी होऊन नवीन दिवसाची आव्हाने स्वीकारण्यासाठी मन सज्ज होईल.