दत्त दर्शनाचा साक्षात्कार झाल्यावर संत एकनाथ महाराजांनी केलेली अभंग रचना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 07:15 PM2020-12-25T19:15:21+5:302020-12-25T19:17:58+5:30

दत्तगुरूंचा अवतार हा एक चमत्कार आहे. स्वतःसच भक्ताला समर्पित करणारा हा एकमेव देव म्हणजे गुरु, देव आणि दत्त. त्रिगुणी अवतार.  दत्त म्हणजे स्मरण करताच हाजिर होणारा दाता. वाईट गोष्टींचा कर्दनकाळ. गुरुचरित्रात छान वर्णन केले आहे.

Abhang Rachna made by Saint Eknath Maharaj after the realization of Datta Darshan! | दत्त दर्शनाचा साक्षात्कार झाल्यावर संत एकनाथ महाराजांनी केलेली अभंग रचना!

दत्त दर्शनाचा साक्षात्कार झाल्यावर संत एकनाथ महाराजांनी केलेली अभंग रचना!

googlenewsNext

रवींद्र वासुदेव गाडगीळ

संत एकनाथांनी श्री दत्त दर्शन त्यांना गुरुकृपेने झाल्यावर स्फुरलेला हा अभंग रचला. साक्षात्कार शब्दांकीत केला आहे. त्याला सुमधुर संगीत दिले आहे आपले बाबूजींचे पुत्र संगीतकार श्री श्रीधर फडके, आणि "बैरागी भैरव" रागात गायले आहे आपले लाडके सुप्रसिद्ध पार्श्वगायक स्वरसम्राट पंडित सुरेश वाडकरजी यांनी.

ॐकार स्वरूपा सद्गुरू समर्था,  अनाथांच्या नाथा, तुज नमो ।। 
नमो मायबापा गुरुकृपाघना, तोडी या बंधना, मायामोहा ।। 
मोहजाळ माझे कोण निरशील, तुजविण दयाळा,  सद्गुरुराया ।। 
सद्गुरूराया माझा आनंदसागर, त्रैलोक्या आधार गुरुराव।। 
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश, ज्यापुढे उदास चंद्र रवी ।। 
रवी शशि,  अग्नि, नेणती ज्या रूपा, स्वप्रकाश रूपा नेणे वेद ।। 
एका जनार्दनी, गुरु परब्रम्ह, तयाचे पै नाम, सदा मुखी ।।

अतिशय सुंदर शब्द व गायन. सुरांचा पाऊस भक्तिरसात चिंब भिजवणारा. नादब्रह्मची अनुभूति. जो योग्य शिष्य तळमळून आपली साधना ,तप,  प्रार्थना, भजन, पूजन, सेवा, परिश्रम, कर्तव्य, निष्ठा निर्मल अंतःकरणाने गुरूंच्या,  भगवंताच्या चरणी देईल,  त्याला गुरूंचा, प्रभूचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही.  गुरूंच्या, प्रभूंच्या सेवेत आपला प्रत्येक क्षण सार्थकी लागला पाहिजे. तो अनाथांचा नाथ आहे, त्याला विनवणी करावी लागत नाही. त्यालाही तुमचे प्रेम हवेहवेसे वाटते. कारण सद्गुरूराया माझा आनंदसागर. 

हेही वाचा : दत्तजयंती आणि मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्ताने गुरुचरित्रातील ४१ व्या अध्यायातील काशीयात्रा, घरबसल्या !

गीतेत एक श्लोक वाचण्यात आलाच असेल. 

“न तद्भासयते सूर्यो, न शशांको, न पावक: 
यत्गत्वात निवर्तन्ते तत्धाम परमम मम” ।। 

तोच हा “रवी, शशि, अग्नि” सद्गुरूराय असे स्वयम प्रकाश, ज्यापुढे उदास चंद्र, रवी, अग्नि. किती सुंदर गीताभाष्य.

दत्तगुरूंचा अवतार हा एक चमत्कार आहे. स्वतःसच भक्ताला समर्पित करणारा हा एकमेव देव म्हणजे गुरु, देव आणि दत्त. त्रिगुणी अवतार.  दत्त म्हणजे स्मरण करताच हाजिर होणारा दाता. वाईट गोष्टींचा कर्दनकाळ. गुरुचरित्रात छान वर्णन केले आहे.

औदुंबर, गाणगापूर, नरसोबाची वाडी, गरुडेश्वर, नारेश्वर, ही दत्तगुरूंची तीर्थे आहेत. नृसिंहसरस्वतींच्या अवतारामुळे दत्त संप्रदाय वाढला. मोगल कालीन सततच्या आक्रमणामुळे येथील जनता भयभीत व दुर्बल झाली होती. मार्गदर्शकच कोणी राहिले नव्हते. कोण कोणाचे ऐकणार व का? म्हणून लोकाभिमुख गुरुसंस्थेच महत्व जे समाजात कमी होत चाललेले होते ते वाढविण्यासाठी दत्तांना अवतार घ्यावा लागला. 

“यदा यदाही धर्मस्य ग्लांनिर्भवती भारत”. त्यांनी वेद, पुराण, सहा शास्त्रे, चौदा विद्या, चौसष्ट कला, उपनिषदे, यज्ञ, पूजा पाठ, भजन, पूजन, कीर्तन, अशा सर्व सामाजिक हिताची देवदेवतांची पुनर्प्रस्थापना करून मानवाला आलेल्या कोणत्याही संकटाला धीराने तोंड देण्यास समर्थ केले व मनाला शांति देऊन, सामाजिक एकता प्रस्थापित केली. मी आहे तुझ्या पाठीशी असा दिलासा योग्य मार्गदर्शन करून दिला. “त्रैलोक्या आधार गुरुराव”

आजही धर्माला ग्लानि आलेली आहे. धर्माचे महत्व समजेनासे झाले आहे. उलट उत्सवी दिखाऊ चंगळवादी कार्यक्रमाचे पूजक बन्या, बापू,  स्वामी,  गुरूंचे पीक आलेले आहे, गुरु, शिक्षक,  आईवडील, ज्येष्ठ ,श्रेष्ठ ,आदर्श, आदरणीय व्यक्तीचे अवमूल्यन झपाट्याने होत आहे. गुरुच शेवटी आपल्याला मार्गदर्शन करतील अशी आशा करू या. 
श्रीगुरूदेव दत्त. 

हेही वाचा : सुखाची तहान भागवायची, तर आधी गळका पेला बदला; वाचा ही बोधकथा!

Web Title: Abhang Rachna made by Saint Eknath Maharaj after the realization of Datta Darshan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.