नामस्मरणाच्या सरावातून निरपेक्ष प्रेम करता येते- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 07:20 AM2020-12-07T07:20:00+5:302020-12-07T07:20:02+5:30
प्रपंचातले जे आपलेपण आहे, ते भगवंताकडे वळवावे. घरातल्या माणसांवर नि:स्वार्थ बुद्धीने प्रेम करायला शिकावे. ते जमले म्हणजे परमार्थ आपोआप साधेल.
प्रेम हे सर्वांना उपजतच येत असते. हा माझा मुलगा, ही माझी मुलगी असे आपण सांगतो. त्यांच्यावर प्रेम कसे करावे, हे कुणी शिकवावे लागत नाही. एकदा 'आपले' मानले, की प्रेम आपोआप निर्माण होते. पण हे प्रेमही खरे पाहिले, तर स्वार्थी आहे. एक गृहस्थ मला भेटले. मी त्यांना विचारले, `झाले का मुलाचे लग्न?' ते म्हणाले, `नाही उद्या आहे.', `मुलगा चांगले वागतो का?', हे विचारल्यावर ते म्हणाले, 'आता नाही, सहा महिन्यांनी सांगतो.'
हेही वाचा : बोलताना जरा सांभाळून, शब्दांना तलवारीपेक्षा जास्त धार असते!
स्वार्थाचे प्रेम इतके अशाश्वत असेल, तर प्रेमाचे सुख कसे लाभेल? प्रपंचात आपण केवळ कर्तव्यबुद्धीने वागावे आणि निरपेक्षपणे प्रेम करायला शिकावे.
खरोखरच प्रपंच हा एखाद्या प्रयोगशाळेसारखा आहे. उच्च शिक्षण पुरे करण्यासाठी तिथे काही काळ शिकावे लागते. महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतून काही उत्पादन काढण्याचा उद्देश नसतो. फक्त विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तिथे सर्व काही शिकून घ्यायचे असते किती उपयोगी पडेल व त्यापासून किती फायदा होईल ही अपेक्षा ठेवायची नसते, त्याप्रमाणे प्रपंच ही प्रयोगशाळा समजावी.
मनुष्य जन्मभर जो व्यवसाय करतो, त्याच्याशी तो एकरूप होऊन जातो. नोकरी करणारा माणूस आपल्या नोकरीशी इतका एकरूप होतो की, स्वप्नातही तो स्वत:ला नोकर समजून राहतो. कर्म कसे करावे, तर त्याच्यापासून वेगळे राहून. लग्नाचा सोहळा भोगावा. लाडू खावेत, पण ते दुसऱ्याचे आहेत हे लक्षात ठेवून खावेत.
आतापर्यंत आपला अनुभव पाहिला, तर आपण केले असे फारच थोडे असते, म्हणून परिस्थितीबद्दल फार काळजी करू नये. आपण आपले कर्तव्य योग्य रीतीने करावे. आपल्या वत्तीवर परिणाम होऊ देऊ नये. प्रत्येक गोष्ट घडायला योग्य वेळ यावी लागते. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्तकाळ घडी, आल्याविण! हे ध्यानात ठेवावे. तेव्हा कर्तव्यबुद्धीने वागून काय ते करावे. भगवंता, हा प्रपंच तुझ्या इच्छेने चालला आहे, असे म्हणावे. मग आपोआप भगवंताचे प्रेम लागेल.
प्रपंचातले जे आपलेपण आहे, ते भगवंताकडे वळवावे. घरातल्या माणसांवर नि:स्वार्थ बुद्धीने प्रेम करायला शिकावे. ते जमले म्हणजे परमार्थ आपोआप साधेल. आपलेपना भगवंताकडे वळवला म्हणजे भगवंतावर प्रेम जडेल. त्यासाठी काही वेगळे करायला नको. फणस चिरताना हायाला तेल लावून तो कापावा लागतो व त्यातले गरे काढावे लागतात. मग हाताला चिकाचा त्रास न होता गरे चटकन निघतात. देवाचे नाव घेऊन प्रपंचात व्यवहार केला, म्हणजे अहंकाराचा चीक न लागता, ईश्वरी कृपेचे गरे हस्तगत करता येतात. लहान मुले पावसाळ्यात कागदाच्या छोट्या होड्या पाण्यात सोडतात. एखादी होडी तरली, तरी हसतात, बुडाली तरी हसतात. तशीच प्रपंचातली सुख-दु:खे हसत खेळत झेलावीत. हे सारे नामस्मरणाने साधते.
हेही वाचा : चांगल्या कर्माचे फळ, चांगलेच मिळते का? वाचा ही बोधकथा!