समुद्रशास्त्रानुसार नखांवरील पांढरे 'दाग अच्छे है'; ते धन समृद्धीचे लक्षण कसे? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 12:54 PM2022-04-19T12:54:19+5:302022-04-19T12:54:37+5:30
बऱ्या वाईट कल्पनांचा फार विचार करत बसू नका. कारण समुद्र शास्त्राच्या अभ्यासकांनी तो विचार आधीच करून ठेवला आहे आणि त्या गोष्टींचा उलगडाही आपल्यासमोर केला आहे.
बालपणी नखांवर पांढरे डाग आले की कोण कोण काय काय वाईट होईल हे सांगून गोंधळून टाकायचे. मोठे होत गेलो तसतसे या गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ लागले. आपले लक्ष नखांवरून काम करणाऱ्या हातांवर स्थिरावले. शक्य तेवढी मेहनत आणि मिळालीच तर नशिबाची साथ, यामुळे आपले लक्ष समुद्र शास्त्राच्या आधारे पुन्हा हातावरून नखांकडे वेधले गेले. पण आता बऱ्या वाईट कल्पनांचा फार विचार करत बसू नका. कारण समुद्र शास्त्राच्या अभ्यासकांनी तो विचार आधीच करून ठेवला आहे आणि त्या गोष्टींचा उलगडाही आपल्यासमोर केला आहे. चला तर जाणून घेऊया नखावरील पांढरे डाग 'अच्छे' कसे आहेत ते!
हाताच्या रेषा, बोटांची ठेवण याशिवाय नखांवरूनही ओळखता येते की माणूस किती भाग्यवान आहे. त्यासाठी त्याच्या नखांचा आकार आणि त्यावर बनवलेल्या खुणांचे समुद्र शास्त्राने विश्लेषण केले आहे.
नखं केवळ हातांचे सौंदर्यच वाढवत नाहीत तर व्यक्तीचे नशीबही सांगतात. हस्तरेखा शास्त्र आणि समुद्र शास्त्र या दोन्ही ग्रंथात याबद्दल उल्लेख आहे. आज आपण माहित करून घेऊया की नखांवर कोणत्या प्रकारचे चिन्ह खूप शुभ मानले जाते आणि नखांचा आकार भविष्याबद्दल काय सांगतो ते!
- हस्तरेषा शास्त्रानुसार, जर सर्वात लहान बोटावर पांढरे डाग किंवा चिन्ह असेल तर असे लोक खूप भाग्यवान असतात. त्यांना प्रत्येक कामात यश मिळते. त्यांना खूप प्रगती मिळते. हे चिन्ह येत जात असते, त्याप्रमाणे आपल्या यशाचा आलेख चढ उतार दर्शवत असतो.
- अन्य कोणत्या बोटांच्या नखावर पांढरे निशाण असतील तर ती व्यक्ती त्याच्या करिअरमध्ये यशस्वी होत असल्याचे संकेत दिसू लागतात. तसेच यशाच्या आड येणारे अडथळे दूर होण्याचे ते चिन्ह असते.
- ज्या लोकांची नखे रुंद आणि टोकदार असतात, असे लोक शक्तिशाली आणि पराक्रमीदेखील असतात.
- ज्या लोकांची नखं गुलाबी असतात, त्यांचे आरोग्य चांगले असते आणि ते मायाळू असतात.
- मात्र, नखांवर काळे डाग असतील तर ते शुभ लक्षण म्हणता येणार नाही. अशा लोकांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो.
नखांकडे दुर्लक्ष करू नका!
केवळ हस्तरेखा किंवा समुद्र शास्त्र सांगते म्हणून नाही, तर आरोग्यशास्त्रदेखील नखांकडे लक्ष द्या असे सांगते. आपले आरोग्य कसे आहे, हे तपासण्यासाठी डॉक्टर डोळे, जीभ याबरोबर नखांची देखील पाहणी करतात. कारण आपली नखं आपल्या आरोग्याचे चित्र प्रतिबिंबित करत असतात. मात्र नखांवर भरपूर पांढरे डाग असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण भरपूर पांढरे डाग दिसणे हे शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असल्याचे सूचित करते. महिलांच्या नखांवर अशा खुणा असणे हे कॅल्शियमची कमतरता दर्शवते. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत अजिबात संकोच करू नका.