वास्तुशास्त्रानुसार शांत झोपेसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी बेडरूममधून 'या' पाच गोष्टी हद्दपार करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 09:49 AM2021-06-07T09:49:48+5:302021-06-07T09:50:18+5:30

बेडरुमला मराठीत शयन मंदिर म्हटले जाते. त्याचे पावित्र्य जपले, तर आपोआपच आरोग्यही जपले जाईल. 

According to Vastushastra, banish these five things from the bedroom for a good night's sleep and good health! | वास्तुशास्त्रानुसार शांत झोपेसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी बेडरूममधून 'या' पाच गोष्टी हद्दपार करा!

वास्तुशास्त्रानुसार शांत झोपेसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी बेडरूममधून 'या' पाच गोष्टी हद्दपार करा!

Next

दिवसभराचा थकवा घालवून रात्री झोपेसाठी आपण बेडरूममध्ये पाठ टेकवतो. परंतु त्याच ठिकाणी भरपूर पसारा असेल, अस्वच्छता असेल तर झोपच काय पण तुमचे मनही लागणार नाही. म्हणून बालपणापासून आपल्यावर संस्कार घातला जातो, तो म्हणजे झोपून उठल्यावर अंथरुणाची घडी घालण्याचा आणि अंथरूण आवरून ठेवण्याचा. ही सवय तर चांगलीच आहे. शिवाय आणखीही काही अनावश्यक गोष्टी बेडरूममधून बाहेर केल्या तर तुम्हाला सुखासुखी झोप लागेल याची १०० टक्के हमी देता येईल. 

काही वस्तू दैनंदिन वापरातल्या असल्या, तरी त्यांची जागा ठरलेली असते. त्या त्याच जागी असणे गरजेचे असते. अन्यथा त्यांच्या स्थान बदलाचा प्रभाव वास्तूवर आणि आपल्या मनस्थितीवर पडू शकतो. साधी गोष्ट आहे, कपड्यांचा ढीग पलंगावर असेल, तर झोपायच्या वेळी पाठ टेकवणार की कपड्यांच्या घड्या घालत बसणार? त्याचप्रमाणे लहान मुलांची खेळणी, वह्या पुस्तके, घर सामान या सगळ्याच गोष्टींचे नीट व्यवस्थापन केले पाहिजे. वास्तू शास्त्रानुसार पुढील पाच गोष्टी कटाक्षाने बेडरूम बाहेर काढा. 

चपला : घरात चपला घालणे ही भारतीय संस्कृती नाही. परंतु अलीकडे पायाच्या आरोग्यासाठी अनेक जण घरातल्या घरात चपला वापरतात. बाहेर वापरण्याच्या चपला आपण दाराबाहेर काढून ठेवतो. तसेच घरातल्या चपलांचा जोड देखील बेडरूमच्या बाहेर ठेवावा. हे केवळ वास्तू शास्त्राच्या दृष्टीने नाही, तर आरोग्याच्या दृष्टीनेही हिताचे ठरते. 

झाडू : रोजच्या वापरातली केरसुणी घरात गॅलरीच्या कोपऱ्यात ठेवावी. तिला आपण लक्ष्मी मानतो. दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तिची पूजा करतो. एरव्ही सुद्धा तिला पाय लागला तर नमस्कार करतो. अशी लक्ष्मी बेडरूमच्या आत असेल तर अलक्ष्मी बनून दाम्पत्य जीवनात कलहाचे कारण ठरू शकते. म्हणूनच केरसुणीचा अर्थात झाडूचा कोपरा निश्चित असावा आणि शक्यतो बाहेरच्यांच्या दृष्टीस पडणार नाही, अशा बेताने असावा. 

फाटलेले कपडे : फाटलेले कपडे मुळातच दारिद्रयाचे लक्षण मानले जाते. परंतु अनेक जण अशा जुन्या कपड्यांचा पुनर्वापर पायपुसणी म्हणून करतात. त्यात अयोग्य काहीच नाही. परंतु जाणून बुझून फाटके कपडे वापरणे योग्य नाही. कपडे लज्जा रक्षणासाठी वापरले जातात, शरीर प्रदर्शनासाठी नाही. त्यामुळे फॅशन च्या नावावर पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण थांबवले पाहिजे आणि नाईलाजाने जुने कपडे वापरावे लागत असले, तरीदेखील ते शिवून किंवा रफ़ू करून  वापरावे. 

प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा भंगार सामान : पूर्वीच्या काळी अनावश्यक सामानासाठी अडगळीची खोली असे. परंतु आता जागेअभावी तशी व्यवस्था ठेवणे शक्य नाही. यावर उपाय एकच की अनावश्यक वस्तू घरातून हद्दपार करणे. विशेषतः बेडरूममध्ये पिशव्यांचा पसारा, रद्दी, भंगार सामान या गोष्टी जमा झाल्या तर बेडरूम हीच अडगळीची खोली वाटू लागेल आणि उंदीर, घुशी यांचा शिरकाव होऊन शांत झोपेला सुरुंग लागेल. 

टीव्ही : अनेक घरांमध्ये टीव्हीची व्यवस्था बेडरूम मध्ये केलेली असते. परंतु वास्तू शास्त्र सांगते, झोपण्याआधी आपल्या डोळ्यावर, मनावर तांत्रिक गोष्टींचा, क्लेशदायी विचारांचा प्रभाव नसावा. यासाठी टीव्हीच काय, तर मोबाईल, लॅपटॉप इ गोष्टी देखील बेडरूमच्या बाहेर ठेवाव्यात. दिवसभर तंत्रज्ञानाच्या भोवऱ्यात आपण अडकलेले असतो, निदान झोपेच्या वेळेस तरी त्या हानिकारक विद्युत लहरी आपल्यापासून दूर असाव्यात. 

या सर्व बाबींव्यतिरिक्त बेडरूममध्ये कायम स्वच्छता ठेवावी. धूळ, माती, पसारा विरहित खोली असावी. यासाठीच बेडरुमला मराठीत शयन मंदिर म्हटले जाते. त्याचे पावित्र्य जपले, तर आपोआपच आरोग्यही जपले जाईल. 
 

Web Title: According to Vastushastra, banish these five things from the bedroom for a good night's sleep and good health!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.