वास्तुशास्त्रानुसार मातीच्या 'या' वस्तू, भांडी घरात ठेवणे ठरते लाभदायक!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 05:52 PM2021-08-17T17:52:53+5:302021-08-17T17:54:13+5:30
मातीचे गुणधर्म मुलांना मिळावेत आणि त्यांना मातीच्या वस्तूंचे महत्त्व कळावे यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनात मातीच्या वस्तूंचा, भांड्यांचा वापर वाढवला पाहिजे.
आपला उगम मातीतला आणि शेवटही मातीतच! निसर्गाशी समरसता दाखवणारे आणि निसर्गाशी आपल्याला जोडून ठेवणारे माध्यम म्हणजे माती. मातीचे गुणधर्म शरीरासाठी अतिशय लाभदायक असतात. म्हणून बालपणी मुलांनी जास्तीत जास्त मातीत खेळले पाहिजे असे वैद्यकीय तज्ञ देखील सांगतात. बैठ्या खेळांपेक्षा मैदानी खेळांना प्राधान्य देतात. हे भाग्य दुर्दैवाने मोबाईल पिढीकडून आपणच हिरावून घेतले आहे. अशा मातीचे गुणधर्म मुलांना मिळावेत आणि त्यांना मातीच्या वस्तूंचे महत्त्व कळावे यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनात मातीच्या वस्तूंचा, भांड्यांचा वापर वाढवला पाहिजे. तसे करणे वास्तूच्या दृष्टीनेही लाभदायक आहे.
१. फ्रिजचे पाणी न पिता माठाचे पाणी पिण्याचा सराव करा. पाणी मचूळ येत असेल तर ते फिल्टर करून माठात भरा आणि नैसर्गिक थंड पाण्याची गोडी मुलांना लावा. मात्र दरदिवशी माठ स्वच्छ विसळून भरा अन्यथा त्यात सूक्ष्म किडे होण्याचा धोका असतो. त्यासाठी पाणी वस्त्रगाळ करून भरणे केव्हाही योग्य!
२. बाजारात अनेक प्रकारची आधुनिक पद्धतीची मातीची भांडी विकत मिळतात. मातीचा तवा, हंडी, पातेले, वाट्या, ताटे यांचा वापर करता आले तर उत्तम. कुल्लड मधून चहा पिण्याची वेगळीच मजा आहे. तसेच घट्ट कवडीदार दही हवे असेल तर मातीचे भांडे केव्हाही सरस ठरते!
३. ज्यांच्या घरात मातीचा माठ वापरला जातो, त्याघरात भरभराट होते असे वास्तू शास्त्र सांगते. त्या घरावर चंद्र आणि बुध ग्रहांची अनुकूलता राहते.
४. बागेसाठी देखील प्लॅस्टिक किंवा इतर कुंड्यांचा वापर न करता जास्तीत जास्त मातीच्या कुंड्यांचा वापर लाभदायक ठरतो. वास्तू शास्त्रानुसार मातीच्या कुंड्यांमध्ये लावलेली रोपं मूळ घट्ट धरतात. आणि वेगाने फोफावतात.
५. घरात कोणी सतत तणावग्रस्त असेल तर त्या व्यक्तीला मातीच्या कुंडीत लावलेल्या रोपाला दररोज पाणी घालायला सांगा. हा उपाय अनेकांना परिणामकारक ठरतो.
६. पक्ष्यांना खाऊ घालण्याची तुम्हाला सवय असेल तर त्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था म्हणून मातीचे पसरट भांडे जरूर ठेवा. पक्ष्यांनाही थंड पाणी मिळेल.
७. देवघरात किंवा घरात देवाची एखादी सुंदर रेखीव मातीची मूर्ती असेल, तर ती मूर्ती घरातील नकारात्मकता शोषून घेईल आणि वातावरण प्रसन्न ठेवण्यास मदत करेल.
८. ज्यांच्या घरात आर्थिक अडचणी असतील अशा लोकांनी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तेल घातलेला मातीचा दिवा प्रज्वलीत करावा. लाभ होतो.
९. लहान मुलांना संचयनी गोळा करण्यासाठी मातीचे खेळणे द्या, तसेच मोठ्यांनी देखील मातीच्या भांड्यात पैसे जमा केल्यास धनवृद्धी होते.
१०. दाम्पत्य जीवनात काही अडचणी असतील किंवा संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर कृष्णाच्या प्रतिमेसमोर किंवा रोज सायंकाळी तुळशीजवळ मातीचा तेल घातलेला दिवा प्रज्वलित करावा.