आत्मकल्याण ते जनकल्याण साधणारे आचार्यश्री विद्यासागरजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 03:14 AM2020-07-09T03:14:05+5:302020-07-09T03:14:43+5:30

- शोभना जैन (वरिष्ठ पत्रकार) आचार्यश्रींपासून प्रेरणा घेत श्रद्धावान समाजाने अनेक समाजकल्याणाचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यात स्री शिक्षण, ...

Acharyasri Vidyasagarji from self welfare to public welfare | आत्मकल्याण ते जनकल्याण साधणारे आचार्यश्री विद्यासागरजी

आत्मकल्याण ते जनकल्याण साधणारे आचार्यश्री विद्यासागरजी

Next

- शोभना जैन
(वरिष्ठ पत्रकार)

आचार्यश्रींपासून प्रेरणा घेत श्रद्धावान समाजाने अनेक समाजकल्याणाचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यात स्री शिक्षण, पशुकल्याण, पर्यावरण रक्षण, खादी, आरोग्यसेवा यांसारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे. त्यांचेच शिष्य प्रणम्यसागर हे तुरुंगातील कैद्यांना आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा देण्यासाठी योगसाधना शिकवीत असतात. हा एक अपूर्व असा प्रयोग असून, मध्य प्रदेशातील जबलपूर येथे तो यशस्वी करून आता त्याच राज्यातील डुंगरपूर येथेही नैतिक शिक्षण देण्यात येत आहे.

अनेक वर्षांपूर्वीची ही घटना. केवळ आठवणीतच नाही तर डोळ्यातही साठवली आहे. मध्य प्रदेशातील सागर या शहरातील रहली नावाची वस्ती अचानक मोहमयी भासू लागली. तेथील गल्लीबोळातील घरे एकमेकांत गुंतलेली होती आणि तेथील रस्त्यावर सकाळच्या सूर्यकिरणांची आभा पसरली होती. त्या वस्तीत वास्तव्य करणाऱ्या तपस्वी, साधक, विद्वान तसेच समाजसुधारक जैन मुनी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या दर्शनासाठी मी परिवारासह पोहोचले होते. सकाळी त्यांची भेट घेतली. त्यानंतर दुपारी पुन्हा त्यांच्या दर्शनाचा आणि प्रवचनाचा कार्यक्रम ठरला होता. पण दुपारी मी प्रवचनस्थळी पोहोचले तेव्हा मला तेथे अस्वस्थता जाणवली. मग समजले की, आचार्यश्रींनी आपल्या कार्यक्रमात अचानक बदल करून आपल्या भक्तसंघासह पुढील मुक्कामाच्या दिशेने कूच केले होते!

त्यामुळे काही क्षणात त्या वस्तीवर उदासीनतेची झालर पसरल्याचे जाणवले, कारण तेथून आचार्यश्रींनी प्रयाण केले होते. त्यांच्या मागे चाळीस मुनीसुद्धा निघाले होते. आणि पाठोपाठ शेकडो भक्तांचा समूह आचार्यांना निरोप देण्यासाठी भावविभोर होऊन निघाला
होता. एकीकडे आचार्यांच्या दर्शनासाठी आसपासचे भाविक एकत्रित झाले होते. याशिवाय देश-विदेशातून आलेले भाविकही त्यात होते. पण आचार्यश्री निर्विकार भावनेने पुढील मुक्कामाच्या दिशेने निघाले होते, त्यात राग नव्हता, तसेच कोणतेही बंध त्यांना बांधू शकले नव्हते. त्यांच्या अनवाणी पायांनी चालण्याने आसमंतात धूळ पसरली होती. आचार्यश्रींचे जेथे प्रवचन होणार होते ते स्थळ ओस पडले होते. कार्यकर्ते त्याठिकाणी टाकलेली बिछायत गुंडाळू लागले होते. ती जागा अचानक विराण झाली होती!

असे आहेत हे विद्वान, चिंतनशील, तपस्वी जैन मुनी जे गेली ५३ वर्षे घोर तपस्या करीत आहेत. दु:खितांचे अश्रू पुसणे, त्यांना आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा देणे, सामाजिक सौहार्द निर्माण करणे, सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणाची अपेक्षा बाळगणे, अपरिग्रहाची दीक्षा देत, स्रियांना सर्व अधिकार प्रदान करण्याची मंत्रदीक्षा देण्याचे काम ते अविरत करीत असतात. वयाच्या अठराव्या वर्षी ब्रह्मचर्याची दीक्षा घेणारे तपस्वी संत आचार्यश्री विद्यासागरजी महाराज हे जैनांच्या त्याग, तपस्या आणि मुनी परंपरेचे जिवंत उदाहरण आहेत.

आचार्यश्रींनी गेली ४८ वर्षे मधुर तसेच खारट पदार्थांचा त्याग केला आहे. गेल्या ४० वर्षांपासून त्यांनी कोणताही रस वा फलाहार घेतलेला नाही. वयाच्या अठराव्या वर्षांपासून त्यांनी रात्रीच्या विश्रांतीसाठी चटईचा त्याग केला आहे. गेली बावीस वर्षे त्यांनी कोणतीही भाजी ग्रहण केलेली नाही आणि दिवसाची निद्रादेखील वर्ज्य मानली आहे ! २६ वर्षांपासून त्यांनी तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणे सोडून दिले आहे. त्यांच्या आहारात धान्य, डाळी आणि जलपान याव्यतिरिक्त काहीही नसते. जैन परंपरांचे पालन करीत ते हाताच्या ओंजळीतूनच अन्न ग्रहण करीत असतात. मग फलाहार किंवा मेवा घेणे तर दूरच राहिले ! संपूर्ण दिवसभरात केवळ तीन तास ते निद्रेसाठी देतात. एकाच कुशीवर झोपतात आणि ठरल्यावेळी मलमूत्र विसर्जन करतात!

दिगंबर जैन संत परंपरेनुसार परमतपस्वी आचार्यश्री विद्यासागरजी महाराज हे कोणत्याही वाहनाचा वापर करीत नाहीत आणि पूर्णत: दिगंबरावस्थेत वास्तव्य करतात. थंडीत किंवा बर्फाच्छादित प्रदेशातही त्यात कोणताही बदल होत नाही. झोपण्यासाठी लाकडी पलंगाचा ते वापर करतात. संपूर्ण देशभर त्यांनी हजारो किलोमीटर पायी अनवाणी प्रवास केला आहे. दिगंबर जैन परंपरेत साधू-साध्वींना वाहनाचा उपयोग करणे वर्ज्य आहे.

देश-विदेशातून साधक त्यांच्याकडे येतात ते मंत्रदीक्षा घेण्यासाठी. ही दीक्षा असते सेवा करण्याची, सर्वांविषयी करुणा बाळगण्याची, अहंकाराचा त्याग करण्याची, नि:स्वार्थ भावनेने ेदीनदुबळ्यांची सेवा करण्याची आणि स्रियांना शिक्षण देण्याची. त्यांच्या तपस्येने प्रभावित होऊन साधक त्यांच्याकडे येत असतात आणि आदर्श जीवन कसे जगावे, याची शिकवण घेऊन परतत असतात.

आचार्यश्री विद्यासागरजी महाराज हे जसे महान संत आहेत तसेच उत्कृष्ट कवी आणि विचारवंतदेखील आहेत. काव्याची आवड आणि साहित्याविषयीचे प्रेम त्यांना वंशपरंपरेने मिळाले आहे. ते कन्नड भाषी विचारवंत असले तरी प्राकृत, संस्कृत, हिंदी, मराठी, बांगला आणि इंग्रजीतून ते सतत लेखन करीत असतात. ‘मूकमाटी’ हे त्यांचे महाकाव्य विशेष प्रसिद्ध आहे. काव्य, अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि युगचेतना यांचे मिश्रण असलेली ही एक रूपक कथा आहे. शोषितांच्या उत्थानाचे ते प्रतीक आहे. पायाखाली तुडवली गेलेली माती मंदिराच्या शिखराचे रूप कशी धारण करते, हे त्यात दर्शविले आहे. त्यांच्यासोबत असलेल्या संघातील ३००हून अधिक साधक हे उच्चशिक्षा प्राप्त मुनीगण आहेत. त्यापैकी कुणी एम.टेक. केले आहे तर कुणी एम.सी.ए. केले आहे. पण संपूर्ण शिक्षण ग्रहण केल्यानंतर संसाराचा त्याग करून आत्मशोधाचा आणि आत्मकल्याणाचा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे. त्यांनी स्वीकारलेले जीवनच त्यांच्या दृष्टीने संपूर्ण जीवन आहे. आचार्यश्रींनी स्वत:चे गुरु आचार्य ज्ञानसागरजी महाराजांपासून वयाच्या बावीसाव्या वर्षी दीक्षा घेतली. त्यांच्या गुरुने आपल्या जीवनातच आपले आचार्यपद त्यांच्याकडे सोपवून समाधीमरण सल्लेखनाचा (स्वेच्छामरणाचा) पर्याय स्वीकारणे, ही त्यांच्या जीवनातील उल्लेखनीय घटना म्हणावी लागेल.

सध्या वर्षायोगाच्या चतुर्मासानिमित्त आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांचे वास्तव्य इंदूरमध्ये आहे. त्यात देशातील वरिष्ठ नेतृत्वापासून सामान्य लोकांपर्यंत सर्वांचा सहभाग पाहावयास मिळत आहे. त्यांच्या साधनेविषयी आणि तपश्चर्येविषयी समाजात समर्पणाची भावना पाहावयासमिळते.
आचार्यश्रींच्या पादप्रक्षालनानंतर जमिनीवर पडलेले पाण्याचे थेंब आपल्या हातांनी टिपून एका श्रद्धाळूने ते मस्तकी धारण करताना उद््गार काढले ‘‘आचार्यांची साधना धन्य आहे.’’ भक्तांपासून त्यांची कोणतीही अपेक्षा नाही किंवा भक्तांना ते कोणताही मंत्र देत नाहीत. असा तपस्वी पुरुषाच्या साधनेसमोर आम्ही नतमस्तक आहोत !

Web Title: Acharyasri Vidyasagarji from self welfare to public welfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.