सत्याने वागा, नीतिन्यायाने चाला, ही शिकवणारे गुरु, समाजशिक्षक यांची गरज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 07:20 AM2020-12-10T07:20:00+5:302020-12-10T07:20:02+5:30
परमेश्वर माणसातच आहे आणि माणसाची सेवा करणे हाच श्रेष्ठ धर्म आहे. दुसऱ्याचे अश्रू पुसणे, भुकेलेल्याला अन्न देणे यासारखी देवाची अन्य सेवा नाही. हा परिपाठ घालून देणारी व्यक्तीच आपल्या शिष्याची आत्मोन्नती साधू शकते.
आपल्याकडे गुरु या संस्थेला प्रारंभापासून खूप महत्त्व आहे. गुरुंची महती अनेक शास्त्रांनी आणि धर्मग्रंथांनी गायली आहे. सर्वसामान्यजनांच्या गुरुभक्तीचा गैरफायदा घेऊन गुरु स्वार्थी, मतलबी वृत्तीने वागतात, असेही वारंवार निदर्शनास येते. समर्थ रामदासस्वामींनी दासबोधात सद्गुरु स्तवन या नावाचा एक समास लिहिला आहे. त्यात समर्थ म्हणतात,
हरिहरब्रह्मादिक, नाश पावती सकळीक,
सर्वदा अविनाश येक, सद्गुरुपद।
तयासी उपमा काय द्यावी,
नाशिवंत सृष्टी आघवी,
पंचभूतिक उठाठेवी, न चले तेथे।
म्हणोनि सद्गुरु वर्णवेना,
हे गे हे चि माझी वर्णना,
अंतरस्थितीचिया खुणा,
अंतर्निष्ठ जाणती।
हेही वाचा : देवाकडे काय मागितलं, तर सगळे प्रश्न सुटतील?... सांगताहेत सद्गुरू वामनराव पै
गुरुचे आणि सद्गुरुचे स्तवन करताना मोठमोठ्या कवींची आणि संतमहंतांची लेखणी कुंठित झाली आहे. सद्गुरुंनी आपल्या शिष्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे आणि शिष्यांच्या अभ्युदयाबरोबरच समाजाचा आणि देशाचा अभ्युदय कसा होईल, तेही पाहिले पाहिजे. कारण देश आणि समाज स्थिर राहिला, तरच त्यामधील लोक सुखी राहू शकतात.
आजकाल आपण काय पाहतो? अनेक ठिकाणी गुरु आपल्या गुरुपदाचा बाजार मांडताना दिसतात. गैरमार्गाने वागणारे धनिक मानसन्मानाच्या आणि खोट्या मन:शांतीच्या अपेक्षेने कोणत्या ना कोणत्या गुरुंच्या कळपात दाखल होतात. आणि हे भंपक गुरु त्यांच्या पैशावर आणि मोठेपणावर लट्टू होऊन त्यांना आपले शिष्य बनवतात. हे सर्वत्र दिसणारे चित्र आहे.
गुरुपाशी मन:शांतीसाठी जावे, मार्गदर्शनासाठी जावे तर तो गुुरुच आपल्या शिष्यांना योग्य मार्ग दाखवण्याऐवजी त्यांच्या गैरमार्गांच्या व्यवहारातच स्वत: सामील झाल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसून येते. कोणी तथाकथित तांत्रिक आपले पद आणि प्रतिष्ठा अशा नादातच धुळीला मिळवतात.
खरे म्हणजे गुरुंनी शिष्याला आणि समाजाला योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. संसारात राहूनच परमेश्वरप्राप्तीचा मार्ग चोखाळा, असे सांगितले पाहिजे. इतकेच नव्हे, तर स्वत:चा संसार करून परमार्थ कसा साधता येतो, हे आपल्यावरून उदाहरण घालून दिले पाहिजे.
परमेश्वर माणसातच आहे आणि माणसाची सेवा करणे हाच श्रेष्ठ धर्म आहे. दुसऱ्याचे अश्रू पुसणे, भुकेलेल्याला अन्न देणे यासारखी देवाची अन्य सेवा नाही. सत्याने वागा, नीतिन्यायाने चाला, हे समाजाला सांगण्याची आवश्यकता आहे. कारण आता समाजातले दुर्जन वाढत आहेत. सज्जन कमी होत आहेत. सज्जनांच्या सत्य बोलण्याची किंमत उरलेली नाही. माणसे हिंस्त्र श्वापदांसारखी वागत आहेत आणि दुर्जनांना संरक्षण देण्यात धन्यता मानत आहेत. सत्यं वद, धर्म चर, असे वैदिककाळापासून सांगितले जाते. तेच पटवून देण्याची आणि शिकवण्याची सध्या गरज आहे. हा परिपाठ घालून देणारी व्यक्तीच आपल्या शिष्याची आत्मोन्नती साधू शकते.