जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 11:40 AM2024-10-25T11:40:45+5:302024-10-25T11:41:23+5:30

दिवाळीच्या आधी जास्वंदीच्या रोपाची चांगली काळजी घेतली, तर हिवाळा सुरुहोईपर्यंत रोपटं फुलांनी भरून जाईल; त्यासाठी वापरा 'या' घरगुती टिप्स!

Add 'this' homemade fertilizer to hibiscus; you will get many flowers for Bappa till coming Sankashti! | जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!

जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!

दर मंगळवारी किंवा विनायकी अथवा संकष्टीला बाप्पाला जास्वंदीचे फुल आणि दुर्वा वाहाव्यात असे आपल्याला वाटते. घराच्या आवारात, बाग बगिच्यात दुर्वा सहज मिळू शकतात, मात्र एक जास्वंद विकत घ्यायला जावे तर २०-२५ रुपये भाव सांगतात. त्यांच्या चरितार्थाला हातभार म्हणून विकत घेण्यास हरकत नाही, पण कधी जर घरच्या घरी बाप्पासाठी जास्वंदीच्या फुलांचा हार बनवावा वाटला तर त्यासाठी तुमच्या खिडकीत, पडवीत, दारात, अंगणात लावलेल्या जास्वंदीच्या रोपाला घरगुती खाद्य अवश्य घाला. 

जास्वंदीच्या रोपाची योग्य काळजी न घेतल्यास कीटकांचा प्रादुर्भाव होतो आणि झाडातील फुलेही उमलणे बंद होते. तुमच्या जास्वंदीच्या रोपामध्ये अशी कोणतीही समस्या दिसल्यास किंवा ती पूर्णपणे कोमेजलेली दिसत असल्यास, तुम्हाला वेळोवेळी त्यात खत घालावे लागेल. 

बागेत फुलझाडे लावणे प्रत्येकाला आवडते, परंतु त्याची योग्य काळजी घेणे देखील आवश्यक आहे. आता हिवाळा ऋतू येत आहे. या काळात बागेत फुललेली जास्वंदीची फुले पाहणे खूप आनंददायी असते. हा आनंद घरच्या घरी घ्यायचा असेल तर कोणते घरगुती खत करून वापरायचे ते जाणून घेऊ. जेणेकरून तुमच्या जास्वंदीच्या रोपालाही शेकडो फुले येऊ शकतील... 

जास्वंदीचे रोप निरोगी ठेवण्यासाठी, दिवाळीपूर्वी, तुम्ही कोरडा कांदा आणि केळीच्या सालीपासून खत बनवू शकता आणि ते रोपट्याला घालू शकता.

>> यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात एक लिटर पाणी घ्या. 
>> केळ्याचे साल त्यात टाका. 
>> यामध्ये कांद्याची साले पण टाका.
>> हे भांडे २४ तास झाकून ठेवा. 
>> यानंतर पाण्याचा रंग बदलून तपकिरी होईल तेव्हा ते गाळून पाणी वेगळे करा.
>> आता तयार झालेले द्रव खत आपण जास्वंदीच्या रोपाला घालू शकता.
>> हे द्रव खत घालण्यापूर्वी, माती हलकीशी मोकळी करा, उपसून घ्या. 
>> यानंतर एक चमचा चहा पावडर मातीत मिसळा.
>> पाच मिनिटांनंतर, तयार केलेले घरगुती द्रव खत घाला.
>> अशा प्रकारे तुम्ही हे द्रव खत दर १५ दिवसांनी घालू शकता.

दिवाळीच्या आधी हे खत घालायला सुरुवात केली, तर हिवाळा येईपर्यंत तुमचे जास्वंदीचे रोप फुलांनी भरून जाईल आणि येत्या संकष्टीला घरी उमललेल्या जास्वंदाच्या फुलांचा भरगच्च हार बाप्पाला वाहता येईल!

Web Title: Add 'this' homemade fertilizer to hibiscus; you will get many flowers for Bappa till coming Sankashti!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.