Adhik Maas 2020: ...म्हणून अधिक मासात विवाहित मुली भरतात आईची ओटी!
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: October 1, 2020 07:30 AM2020-10-01T07:30:00+5:302020-10-01T07:30:02+5:30
Adhik Maas 2020: ओटी भरणे, हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार. केवळ अधिक मासातच, विवाहित मुलगी आपल्या सवाष्ण आईची ओटी भरू शकते.
ज्योत्स्ना गाडगीळ.
पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत. ओटी भरणे, हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार. सुवासिनीला संततीप्राप्त व्हावी, म्हणून तिची ओेटी भरली जाते. 'संततीप्राप्ती'च्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते. मात्र, केवळ अधिक मासातच, विवाहित मुलगी आपल्या सवाष्ण आईची ओटी भरू शकते. का, ते जाणून घेऊ.
हेही वाचा: Adhik Maas 2020: विष्णू पूजेत शंखपूजनालाही महत्त्व असते, कारण...
लग्नकार्यात कन्यादानाला अतिशय महत्त्व असते. आपल्या लाडक्या लेकीला सुयोग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती सोपवणे, याला कन्यादान विधी म्हणतात. त्याचा चुकीचा अर्थ काढत, कन्या काय दान देण्याची वस्तू आहे का? अशी चर्चा करतात. मात्र तसे नसून, कन्यादान हा एक संस्कार आहे. जबाबदारीची जाणीव आहे. आपण ज्या मुलीला लाडाकोडाने वाढवली, तिची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी आई-वडिलांना कठोर व्हावे लागते. त्यांच्या त्यागामुळे तिला तिचे हक्काचे घर मिळते. त्या कृतज्ञतेची छोेटीशी परतफेड म्हणून विवाहित मुलगी अधिक मासात आपल्या आईची ओटी भरत़े
अधिक मासच का?
अधिक मासात सगळीच पुण्यकर्मे केली जातात. त्यात आणखी एका पुण्यकर्माची भर, म्हणून आईची ओटी भरली जाते. वास्तविक पाहता, मुलगी सासरी निघाली, की तिची ओटी भरतात. परंतु, अधिक मासात आईची ओटी भरून तिने आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्याप्रती छोटीशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. पुढच्या जन्मी तुझ्याच उदरी जन्म मिळावा, असाही सायुक्तिक अर्थ या संस्कारातून काढता येतो.
विवाहित मुलगी आईची ओटी भरू शकते, परंतु सासूची ओटी भरू शकत नाही. कारण, लग्न करून घरी आल्यावर सासु आपल्या सुनेची ओटी भरून आपला मुलगा राजीखुशी तिच्या पदरात देते. सासुकडून आशीर्वादरूपी मिळालेली ओटी तिला परत करता येत नाही.
विधवा स्त्रियांची ओटी भरत नाहीत. म्हणून आईची ओटी भरणे शक्य नसेल, तर अन्य सुवासिनीची खणा-नारळाने ओटी भरावी. तसे केल्यानेही सौभाग्यवती स्त्रिचे मंगलमयी आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्याला व परिवाराला लाभतात.
हेही वाचा : Adhik Maas 2020: अधिक मासात करूया ३३ सकारात्मक संकल्प
ओटी का भरतात?
अशोक लिंबेकर यांनी विश्वकोशात दिलेल्या माहितीनुसार, 'ओटी म्हणजे नाभिखालचे पोट, म्हणजेच जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग. यालाच ओटी-पोट असेही म्हणतात. ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते, त्याप्रमाणेच स्त्रियांच्या ओटीत म्हणजेच तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे, वंशवृद्धीचे सामर्थ्य असते. (म्हणून केवळ विवाहित स्त्रियांची ओटी भरली जाते, विधवा स्त्रियांची नाही.) स्त्रीजीवनातील हा महत्त्वाचा विशेष आहे. विवाहित स्त्रीची कूस उजावी, तिचा ओटी भरावी, फुलावी, फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचे मातृत्व लाभण्यासाठी अभीष्टचिंतन केले जाते. एका अर्थाने हा स्त्रीच्या मातृत्वाचा तिच्या सर्जनशीलतेचाच आपल्या संस्कृतीने केलेला गौरव असतो. ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फलशोभनाच्या विधीतही होतो. ग्रामीण भागात यालाच फळ भरणे म्हणतात. तसेच लग्नानंतर गर्भधान विधी यातही ओटी भरली जाते.
मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतीकात्मक अर्थ या पद्धतीमध्ये आहे. माहेराहून सासरी जाणाऱ्या मुलींची ओटी भरली जाते. ओटी भरण्यासाठी तांदूळ, सुपारी, श्रीफळ, खोबरे, लेकुरवाळे हळकुंड, हळद, कुंकू, पाच प्रकारची फळे इत्यादी साधन सामुग्री वापरली जाते. नवविवाहिता असेल, तर या पद्धतीला खूप महत्त्व आहे. पाच सुवासिनी तिची ओटी भरतात. एक एक स्त्री पुढे येऊन तिच्या पदरात ओटीच्या वस्तू टाकतात. कालांतराने यथोचित संततीप्राप्ती झाल्यावर जितक्या सुवासिनी उपलब्ध असतील त्या ओटी भरतात. ऋतुमास चालू असेपर्यंत ही पद्धत महत्त्वाची आहे. ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांनाही प्रतीकात्मक अर्थ आहे. या वस्तू मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता, विघ्ननिवारक, सौभाग्यदायक, आरोग्यवर्धक, शुभदायी आहेत. प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळातही ही रूढी अजूनही समाजजीवनात पाळली जाते यावरूनच या विधीचे महत्त्व लक्षात येते.