Adhik Maas 2020: अधिक मासात करूया ३३ सकारात्मक संकल्प
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: September 28, 2020 03:18 PM2020-09-28T15:18:03+5:302020-09-28T15:28:12+5:30
Adhik Maas 2020: संकल्प असेच करावेत, जे आपल्याला पूर्ण करता येतील किंवा जे आपल्या आवाक्यात असतील.
ज्योत्स्ना गाडगीळ.
अधिक मासात तीस तीन या संख्येला खूप महत्त्व असते. अनेक जण अधिक मासानिमित्त ३३ जणांना वाण, ३३ जणांना भोजन, ३३ जोडप्यांसह सामुहिक पूजा, ३३ जणांना दान असे नानाविध संकल्प करून अधिक फलप्राप्ती करून घेतात. आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात काही करणे शक्य नसले, तरी सहज साध्य करता येतील असे काही संकल्प आहेत. ते ३३ संकल्प जाणून घेण्याआधी या संख्येमागील गणित समजावून घेऊ.
तीस तीनच का?
चैत्रापासून फाल्गुनापर्यंत १२ महिन्यात ३५५ दिवस येतात आणि इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे किंवा नक्षत्राप्रमाणे सौर वर्षाचे दिवस ३६५ असतात. हे १० दिवस तीन वर्षांनी ३० दिवस झाल्यावर एक महिना अधिक घालून ते पुन्हा सारखे होतात. म्हणजे, दर ३३ महिन्यांनी 'अधिक मास' येतो. म्हणून या महिन्यात सगळ्या गोष्टी तीस तीन या पटीत करतात.
हेही वाचा: Adhik Mass 2020: तन्नो विष्णू: प्रचोदयात।; श्री विष्णूंचे पाच श्लोक ठरतील पुण्यफलदायी
३३ सकारात्मक संकल्प!
संकल्प असेच करावेत, जे आपल्याला पूर्ण करता येतील किंवा जे आपल्या आवाक्यात असतील. समाज माध्यमांवर एक छान मेसेज वाचला. त्यात हे ३३ संकल्प सुचवले होते. `जे जे आपणासी ठावे, ते दुसऱ्याशी सांगावे, सूज्ञ करून सोडावे सकळ जन', या उक्तीप्रमाणे ते संकल्प लेखाच्या माध्यमातून देत आहे.
१) सदाचार २) सद्भावना ३) समयसूचकता
४) समयपालन ५) समंजसपणा ६) सात्त्विकता
७) सहजता (वागण्या-बोलण्यात) ८)सौजन्य
९) स्नेहभाव १०) स्वयंशिस्त ११) स्वाभिमान
१२) सौम्यपणा १३) सुदृढता (शारीरिक व मानसिक)
१४) सत्यवादित्व १५) संकल्प १६) संयम
१७) स्मितहास्य १८) सदसद्विवेक १९) सत्संगती
२०) समर्पणभाव २१) सरळपणा २२) सौंदर्यदृष्टी
२३) सेवाभाव २४) सखोलज्ञान (विशेषत: आपल्या क्षेत्रात)
२५) सरसत्व २६) सातत्य २७) समाधान
२८) स्वावलंबन २९) सजगता ३०) सुसंस्कार
३१) सहनशीलता ३२) सकारात्मकता ३३) सद्गुरुसेवा
या सकारात्मक गोष्टी आत्मसात होण्यासाठी वेळ लागेल, परंतु अधिक मासाच्या मुहूर्तावर आपल्याला प्रयत्नांची सुरुवात नक्कीच करता येईल. 'अधिकस्य अधिकं फलम्' मिळवायचे असेल, तर अधिक मेहनत लागणारच ना?
हेही वाचा: Adhik Maas 2020: विष्णुसहस्रनामाची महतीः चोच दिली, तो चारा देतोच!
तीस तीन गोपद्म रांगोळी
अधिक मासात कोणत्याही दिवशी किंवा सलग महिनाभर ७,६,५,५,४,३,२,१ अशी गोपद्मांची चढत्या क्रमाने रांगोळी काढतात. इथेही तीस तीन संख्या आलीच. वास्तविक पाहता, संपूर्ण चातुर्मासात तीस तीन गोपद्मांची रांगोळी काढण्याची प्रथा आहे. त्याला गोपद्म व्रत असेही म्हणतात. गोपद्म हे चिन्ह रांगोळीत शुभ मानले जाते. गो पद्म अर्थात गायीच्या पावलांचा ठसा. त्याचे प्रतिकात्मक रूप रांगोळीत काढतात. भगवान महाविष्णूंना गाय अतिशय प्रिय आहे. कृष्णावतारात तर ते 'गोपाल' झाले होते. जे त्यांना प्रिय, तेच त्यांना समर्पण करण्याची भावना भाविकांच्या ठायी असते. तिच तीस तीन गोपद्म चातुर्मासात किंवा अधिक मासात देवघरासमोरील पाटावर साकारली जातात.
हेही वाचा: Adhik Maas २०२०: आपण नैवेद्य दाखवतो, की अर्पण करतो?