Adhik Maas 2020: सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?
By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: October 7, 2020 07:30 AM2020-10-07T07:30:00+5:302020-10-07T07:30:02+5:30
Adhik Maas 2020: अधिक मासानिमित्त, शाहीर होनाजी बाळा यांच्या नजरेतून मुकुंदाचा शोध घेण्याचा प्रयत्न.
ज्योत्स्ना गाडगीळ
शाहीर होनाजी बाळा यांनी तुमच्या आमच्या मनातला प्रश्न या लावणीतून मांडला आहे. तो प्रश्न म्हणजे, 'सांगा मुकुंद कुणी हा पाहिला?' तो नक्की कसा आहे, हे माहित नाही. परंतु, ज्यांनी त्याला अनुभवला, ते कथन ऐकून प्रत्येक भाविकाची त्याला भेटण्याची इच्छा बळावते.
हेही वाचा: Adhik Mass 2020: तन्नो विष्णू: प्रचोदयात।; श्री विष्णूंचे पाच श्लोक ठरतील पुण्यफलदायी
'अमर भूपाळी' चित्रपटातील पंडितराव नगरकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात गाजलेले हे गीत आजही शब्दांबरोबर आठवणींच्या हिंदोळ्यावर बसवून भूतकाळात नेते. मुकुंदाला पाहावं, अनुभवावं, ही तर प्रत्येक भक्ताची इच्छा. मनाची ती उत्कट अवस्था संगीतकार वसंत देसाई यांनी आपल्या तरल संगीतातून मांडली आहे. त्यात सुप्रसिद्ध शाहीर होनाजी बाळा, यांचे शब्द. त्यांना गोपिकांशी रासक्रिडा करताना मुकुंद आढळला. त्याचे वर्णन ते करतात,
रासक्रिडा करिता वनमाळी हो, सखे होतो आम्ही विषयविकारी,
टाकुनि गेला तो गिरीधारी, कुठे गुंतून बाई हा राहिला
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला....
कृष्णाच्या बाललिला, रासलिला यांची लालित्यपूर्ण वर्णने ऐकावी, तेवढी थोडी. ते निष्काम प्रेम आम्हालाही प्रेमात पाडायला लावते. प्रेम कोणाबद्दल, तर गोप-गोपिकांना रमवणाऱ्या मुकुंदाबद्दल. ज्याने या विश्वाच्या पसाऱ्यात स्वत: रंगून आम्हालाही रंगवले आहे आणि तो मात्र निर्लेप होऊन विषयांचा संग तोडून, आम्हाला सोडून निघून गेला आहे आणि तो कुठे गुंतून राहिला? तर...
गोपी आळविती, हे ब्रजभूषणा हे,
वियोग आम्हालागी तुझा ना साहे,
भावबळे वनिता व्रजाच्या हो,
बोलावुनि सुताप्रति नंदजीच्या,
प्रेमपदी यदुकुळटिळकाच्या,
म्हणे होनाजी हा, देह हा वाहिला,
सांगा मुकुंद कुणी हा पाहिला।
योगी, तपस्वी, संसारी त्याच्या दर्शनाची आस लावून बसले आहेत आणि हा मुकुंदा रमलाय, तो गोप-गोपिकांमध्ये. जिथे अलोट, नि:स्वार्थ प्रेम आहे. ज्यांच्यासाठी त्यांचा कान्हा, हेच सर्वस्व आहे. त्याच्या प्रेमापोटी जे दह्या-दुधारी चोरी करत आहेत. संसारी गोपिका मथुरेला जाऊन 'कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या' म्हणत आपल्या मुकुंदाची देव-घेव करत आहेत. त्यांनी आपले देहभान विसरून सर्वस्व मुकुंदाच्या ठायी अर्पण केले आहे, म्हणून हा यदुकुळटिळक इतरांच्या हाती तुरी देऊन निसटतो आणि आपल्या भक्तांच्या हृदयात विसावतो. तो तुम्हा आम्हाला कसा बरे दिसणार? त्यासाठी आपल्यालाही भक्तपदाला जायला नको का? म्हणून होनाजी बाळा तयारी दाखवतात, 'तुझ्या चरणी देह हा वाहिला...'
निष्काम, निस्सिम भक्तीची ही अवस्था जेव्हा प्राप्त होईल तेव्हा, मुकुंद बाहेर कुठे नाही, तर आपल्या आतच आहे, याची जाणीव होईल. मग आपणही होनाजींच्या सुरात सूर मिसळून म्हणू, 'हो हो मुकुंद आम्ही हा पाहिला....!'
चला तर मग, आपणही या अधिक मासात आपल्या अंतर्मनात सामावलेल्या मुकुंदाचा शोध
हेही वाचा: Adhik Maas 2020: विष्णुसहस्रनाम रोज ऐका, 'अधिक' मासाचे 'अधिक' फळ मिळवा!