Adhik Maas 2023: 'अधिकस्य अधिकं फलं' अर्थात अधिक मासाचे अधिक फळ पदरात कसे पाडावे? जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 12:56 PM2023-07-04T12:56:24+5:302023-07-04T12:56:44+5:30
Adhik Maas 2023: यंदा १८ जुलै पासून अधिक श्रावण सुरू होत आहे, या पुरुषोत्तम मासात कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या नाहीत ते समजून घ्या.
यंदा श्रावणाआधी अधिक श्रावण मास येत आहे. त्यालाच `मलमास' किंवा 'पुरुषोत्तम मास' असेही प्रामुख्याने म्हटले जाते. मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात, सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते.
दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाचे खगोलशास्त्रीय गणित काय ?
काशीनाथ जोशी यांनी `संपूर्ण चातुर्मास' या पुस्तकात संग्रहित केलेल्या माहितीनुसार, सर्वसाधारणपणे तीन वर्षांनी अधिकमास येतो. चैत्रापासून फाल्गुनापर्यंत १२ महिन्यात ३५५ दिवस येतात आणि इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे किंवा नक्षत्राप्रमाणे सौर वर्षाचे दिवस ३६५ असतात. हे १० दिवस तीन वर्षांनी ३० दिवस झाल्यावर एक महिना अधिक घालून ते पुन्हा सारखे होतात. म्हणजे, दर ३३ महिन्यांनी 'अधिक मास' येतो.
सूर्य वर्षातील १२ राशींपैकी प्रत्येक महिन्यात एकेक रास बदलतो. प्रत्येक राशीत सूर्य जातो, त्याला संक्रांत म्हणतात. मेष राशीपासून मीन राशीपर्यंत एका वर्षांत १२ संक्रांती होतात. चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत १२ महिन्यांत प्रत्येक एका महिन्यात संक्रांत असते. यात बदल होत होत ३३ महिन्यांनी असा महिना येतो, की त्यात संक्रांत नसते. अलीकडच्या महिन्यात अमावस्येला संक्रांत असते आणि पुढील महिन्यात प्रतिपदेला संक्रांत येते. त्या बिन संक्रांतीच्या महिन्याला अधिक महिना म्हणतात. अधिक महिन्याला पुढच्या महिन्याचे नाव देतात. जसे, यंदा अश्विन महिना आल्याने अधिक अश्विन मास असे म्हटले जाईल. चैत्र ते अश्विन या महिन्यांमध्ये अधिक मास येतो. मार्गशीर्ष, पौष, माघ या महिन्यात अधिक मास येत नाही. पण, फाल्गुनात क्वचित येऊ शकतो. यावरून आपल्याला पूर्वजांच्या सखोल अभ्यासाचा अंदाज येऊ शकतो.
अधिक मास अर्थात 'बोनस महिना', सुरुवात कधीपासून?
सन २०२३ मध्ये मंगळवार, १८ जुलै २०२३ रोजी अधिक श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. तर अधिक श्रावण महिन्याची सांगता बुधवार, १६ ऑगस्ट २०२३ रोजी होणार आहे. तर निज म्हणजेच नियमित श्रावण महिना गुरुवार, १७ ऑगस्ट २०२३ पासून सुरू होत असून, निज श्रावण महिना शुक्रवार, १५ सप्टेंबर २०२३ रोजी संपत आहे. म्हणजेच अधिक आणि निज असे दोन महिने धरल्यास श्रावण महिना ५९ दिवसांचा असेल, असे सांगितले जात आहे. वास्तविक पाहता, अधिक मास असणार्या श्रावण महिन्याच्या पहिल्या महिन्यात श्रावणाशी संबंधित शुभ कार्ये होणार नाहीत. सर्व धार्मिक व शुभ कार्ये श्रावण महिन्याच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजेच शुद्ध श्रावण महिन्यात होतील. मात्र, शिवशंकर महादेवांची आराधना, उपासना, नामस्मरण अधिक श्रावण महिन्यात केले जाऊ शकेल, असे सांगितले जाते. (Sawan 2023 Dates)
अधिक मासात काय करावे?
साक्षात भगवान महाविष्णूंनी या मासाची जबाबदारी घेतल्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली या महिन्यातील व्यवहार चालणार आहेत, याची नोंद घ्यावी.
>> हाताने काम आणि मुखाने नाम घेत, सत्कार्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक गुंतवणूक करावी.
>> या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी, पूजा पाठ करावेत.
>> स्तोत्रपठणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून अधिक मासात अधिकाधिक स्तोत्रपठण करून सकारात्मकता वाढवावी.
>> अधिक मासात गरजवंताला यथाशक्ती दानधर्म करावा. सामाजिक संस्थांमध्ये सेवा, शुश्रुषा करावी. अशी सेवा देवाच्या पायाशी चटकन रूजू होते.
>> मन विषयांमध्ये न गुंतवता, शक्य तेवढे हरिनाम घेऊन आपली दैनंदिन कामे पार पाडावीत.
अधिक मासात काय करू नये?
वर म्हटल्याप्रमाणे, हा महिना बोनस मिळाला आहे. त्याचा वापर काटेकोरपणे केला पाहिजे. तरच या अधिक महिन्याची बचत होऊन भविष्यात त्याचे व्याज मिळवता येईल.
>> लग्न, कार्ये, मुंज, साखरपुडा किंवा अन्य कोणतीही मंगल कार्ये अधिक मासात करू नयेत. फार तर, या समारंभाचे मुहूर्त या मासात निश्चित करता येतील.
>> गृहखरेदी, वास्तुखरेदी, वाहन खरेदी इ. मोठी आर्थिक गुंतवणूक असलेल्या गोष्टी अधिक मासात करू नये. मात्र, त्यासंबंधी बोलणी या मासात पार पाडता येतील.
>> नवीन ठिकाणी देवदर्शनाला न जाता, आपल्या नेहमीच्या मंदिरातील देवाची किंवा देव्हाऱ्यातील देवाची यथासांग पूजा करावी.