Adhik Maas 2023: दानशूर वृत्ती असण्यासाठी श्रीमंती हवी पण पैशांची नव्हे तर मनाची; सुधा मूर्तींनी सांगितला स्वानुभव!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 02:51 PM2023-08-03T14:51:12+5:302023-08-03T14:52:17+5:30
Adhik Maas 2023: अधिक मासात दानाचे महत्त्व अधिक असते हे आपल्याला माहीत असतेच, याबाबत लेखिका सुधा मूर्ती यांनी त्यांना आलेला अनुभव सांगितला आहे.
शिक्षण क्षेत्र, लेखन, व्यवसाय आणि समाजकार्याच्या निमिताने लेखिका सुधा मूर्ती यांनी समाजाच्या सर्व स्तरातील लोकांचा अनुभव घेतला. यातून त्यांच्या लक्षात आले, दान करण्यासाठी श्रीमंती लागत नाही तर मनाचा मोठेपणा लागतो. दान केल्याने खूप फायदे होतात, हे कळल्यावर दान करणारे लोक कमी नाहीत, पण तो स्वार्थ झाला, दान नाही! याबाबत सुधाजींनी आपला एक स्वानुभव सांगितला. त्या म्हणाल्या -
शैक्षणिक व्याख्यानासाठी परप्रांतात गेले असता समारंभाच्या ठिकाणी मला इंग्रजीत बोलायचे होते, पण स्थानिकांशी बोलताना भाषेचा अडसर येणार होता. माझ्याबरोबर एक भाषांतकार होता. कार्यक्रमाला जात असताना आम्ही एकेठिकाणी अडकलो. रस्ता निर्मनुष्य होता आणि जवळच गाव होते. ड्रायव्हर गाडी सुरू करण्याच्या प्रयत्नात होता. मी आणि भाषांतकार दोघे गावातल्या एका झोपडीवजा घरात गेलो. काही वेळ त्यांच्याकडे थांबण्याची अनुमती मागितली. त्यांनी ती आनंदाने स्वीकारली.
त्या घरात पदोपदी दारिद्र्याच्या खुणा दिसत होत्या. तरीसुद्धा त्याक्षणी आम्हाला डोक्यावर छप्पर मिळाल्याने आम्हाला हायसे वाटले. 'अतिथी देवो भव' या भारतीय संस्कृतीप्रमाणे त्यांनी पाहुणचार म्हणून काय घेणार असे विचारले. आपल्यामुळे त्यांना त्रास नको या भावनेने मी चहा पाण्याला दोनदा नकार दिला. निदान दूध तरी? असे त्यांनी विचारल्यावर क्षणभर थांबले. पुन्हा नकार दिला तर त्यांच्या परिस्थितीकडे पाहून नकार दिला असे त्यांना वाटेल, म्हणून मी होकार दिला.
तो गृहस्थ त्यांच्या घरातल्या ओट्याकडे वळला, तसा बायकोने रागाचा कटाक्ष टाकला. ती काहीतरी बोलली. त्याने तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला. त्यांची भाषा मला कळणारी नव्हती, भाषांतकाराकडून मला कळले, की त्या माउलीने आपल्या मुलांसाठी राखीव ठेवलेलं दूध तिच्या नवऱ्याने मला विचारले. त्या गृहस्थाची द्विधा मनस्थिती झाली. सगळे दूध मला दिले तर मुलाची उपासमार झाली असती म्हणून त्याने अर्धे दूध बाजूला ठेवून उरलेल्या दुधात थोडे पाणी घालून आम्हाला देऊ केले. ते देत असताना त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड अपराधी भाव होता. मी त्यांच्याशी मोकळेपणाने बोलून तो दूर केला. यथाशक्ती त्यांना आर्थिक मदत केली आणि निघाले. पण तो प्रसंग आयुष्यभरासाठी मनावर कोरला गेला. आपले पोट भरल्यावर दुसऱ्याला कोणीही खाऊ घालेल, पण घासातला घास काढून देण्याची संस्कृती आणि संस्कार भारतातच बघायला मिळेल.
हा संस्कार आपणही जतन करूया आणि शक्य तेवढी दुसऱ्यांना मदत करूया आणि आपणही अधिकाधिक सक्षम होऊया!