अधिक मास: तुळशीचे एक रोप लावा, धन-धान्य, सुख-समृद्धी मिळवा; श्रीविष्णू-लक्ष्मी शुभ करतील! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 04:54 PM2023-07-20T16:54:04+5:302023-07-20T17:00:00+5:30

Adhik Maas 2023 Tulsi Pujan: श्रीविष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्याने पुरुषोत्तम अधिक मासात तुळशीचे १० उपाय आवर्जून करावेत, असे सांगितले जाते.

adhik maas 2023 do these 10 tulsi remedies of basil plant to get prosperity benefits of tulsi upay in adhik mahina 2023 | अधिक मास: तुळशीचे एक रोप लावा, धन-धान्य, सुख-समृद्धी मिळवा; श्रीविष्णू-लक्ष्मी शुभ करतील! 

अधिक मास: तुळशीचे एक रोप लावा, धन-धान्य, सुख-समृद्धी मिळवा; श्रीविष्णू-लक्ष्मी शुभ करतील! 

googlenewsNext

Adhik Maas 2023 Tulsi Pujan: मराठी वर्षातील अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला चातुर्मास सुरू आहे. विशेष म्हणजे १८ जुलै २०२३ पासून अधिक महिना सुरू झाला आहे. यंदा १९ वर्षांनंतर श्रावण महिना अधिक मास आला आहे. १६ ऑगस्टपर्यंत अधिक मास राहणार असून, यानंतर निज श्रावण महिना सुरू होत आहे. अधिक महिना श्रीविष्णूंना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास म्हटले जाते. अधिक महिन्यात केलेले विष्णूपूजन अत्यंत पुण्यफलदायी, शुभ मानले जाते. श्रीविष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्याची मान्यता आहे. अधिक मासात तुळशीचे रोप लावून, त्याचे पूजन करणे शुभ-फलदायी मानले गेले आहे. 

हिंदू धर्मात तुळशीचे मोठे महत्त्व आहे. दररोज तुळशीला पाणी अर्पण करण्यापासून ते संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणे, तुळशीची दोन पाने खाणे, तुळशी हार देवाला घालणे अशा अनेक बाबतीत तुळशी भारतीय परंपरेचा महत्त्वाचा भाग बनली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही तुळशीचे बरेच फायदे आहेत. तुळशीच्या रोपाने आणि तुळशीच्या रूपाने घरात चैतन्य नांदते, असे सांगितले जाते. अधिक मासात केलेले तुळशीचे पूजन अनेकपटीने पुण्य-फलदायी ठरू शकते, असे सांगितले जाते. 

अधिक मास आणि तुळशी पूजनाचे महत्त्व

या दृष्टा निखिलाघसंघशमनी स्पृष्टा वपुष्पावनी।
रोगाणामभिवन्दिता निरसनी सिक्तान्तकत्रासिनी।।
प्रत्यासत्तिविधायिनी भगवतः कृष्णस्य संरोपिता।
न्यस्ता तच्चरणे विमुक्तिफलदा तस्यै तुलस्यै नमः।।

हा श्लोक पद्म पुराणातील आहे. या श्लोकाचा अर्थ केवळ तुळशीच्या दर्शनाने सर्व पापांचा नाश होतो. तुळशीला स्पर्श केल्याने शरीर शुद्ध होते. रोज नमस्कार केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते. यासोबतच जल अर्पण केल्याने यमाचे भय नाहीसे होते. यासोबतच तुळशीचे पूजन भगवान श्रीकृष्णाच्या जवळ घेऊन जाते. भगवंताच्या चरणी मोक्ष देणारे फळ देते, असा सांगितला गेला आहे. अधिक महिन्यात तुळशीच्या रोपाची पूजा करणे शुभ मानले जाते. नियमितपणे तुळशीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. यासोबतच सुख-समृद्धी प्राप्त होते, असे म्हटले जाते. 

अधिक मासात करा तुळशीचे अतिशय प्रभावी १० उपाय

- प्राचीन परंपरेनुसार तुळशीला जल अर्पण करून तिची पूजा करावी. ज्या घरात रोज तुळशीची पूजा केली जाते, त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. त्या घरात सुख-समृद्धी, सौभाग्य कायम राहते, असे म्हटले जाते. 

- धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक घराबाहेर तुळशीचे रोप लावल्याने घरात पवित्रता राहते आणि नकारात्मकता दूर होऊन व्यवसायात सतत प्रगती होते.

- तुळस पूजनावेळी 'ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः' या मंत्राचा जप केल्याने घरामध्ये पवित्रता आणि सुख-समृद्धीचा योग निर्माण होतो. श्रीहरी आणि देवी लक्ष्मी यांचे अपार आशिर्वाद प्राप्त होऊ शकतात. 

- अधिक मासात दररोज तुळशीची पाने आंघोळीच्या पाण्यात घालावीत आणि स्नान करावे. असे केल्यास तीर्थयात्रेचे फळ मिळते. श्रीविष्णूची कृपा होते, असे म्हटले जाते. 

- घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी तुळशीची खूप मदत होते. अधिक महिन्यात घराच्या योग्य दिशेला तुळशीचे रोप लावून पूजा केल्यास अनेक फायदे होतात. धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो, अशी मान्यता आहे. 

- पौराणिक शास्त्रातील मान्यतांनुसार, तुळशीच्या पानांच्या सेवनाने देवतांचा विशेष आशिर्वादही प्राप्त होतात.

- पुरुषोत्तम महिन्यात महिलांनी सुख-समृद्धी मिळविण्यासाठी तुळशीची पूजा केल्यास आश्चर्यकारक परिणाम प्राप्त होतात.

- अधिक महिन्यात घराच्या अंगणात किंवा घरात शक्य असेल तिथे तुळळीचे रोप लावल्याने घरगुती त्रास आणि अशांतता दूर होऊ शकते. 

- भगवान विष्णूच्या मस्तकावर तुळस शोभून दिसते. श्रीविष्णूंची पूजा करताना किंवा नैवेद्य दाखवताना तुळशीचे पान आवर्जुन वापरावे. तुळशीच्या पानांचा हार करून श्रीविष्णूंना अर्पण करावा.

- दररोज न चुकता दिवेलागणीच्या वेळेस तुळशीसमोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा. तुळशीची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी. केवळ तुळशीचे रोप लावून भागणार नाही. त्याची निगा राखावी, ते बहरेल, वाढेल यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावेत. असे केल्याने श्रीविष्णू आणि लक्ष्मी देवीची अपार कृपा मिळू शकेल, असे म्हटले जाते. 

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.


 

Web Title: adhik maas 2023 do these 10 tulsi remedies of basil plant to get prosperity benefits of tulsi upay in adhik mahina 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.