Adhik Maas 2023: ऑगस्टमध्ये अधिक मासातील पौर्णिमा, द्वादशी आणि अमावस्येला न विसरता करा ज्योतिष शास्त्राने दिलेले उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 06:11 PM2023-07-31T18:11:30+5:302023-07-31T18:11:52+5:30
Adhik Maas 2023: यंदा १८ जुलै रोजी अधिक श्रावण मास सुरू झाला असून तो अर्ध्यावर आला आहे. या आगामी काळात ऑगस्टमध्ये महत्त्वाचे योग येत आहेत.
अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. या मासातील प्रत्येक दिवसाला महत्त्व आहेच, मात्र या मासातील तीन तिथींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या तीन तिथी म्हणजे पौर्णिमा, द्वादशी आणि अमावस्या. येत्या काळात १ ऑगस्ट रोजी अधिक श्रावण पौर्णिमा आहे, १३ ऑगस्ट रोजी द्वादशी आहे आणि १६ ऑगस्ट रोजी अधिक श्रावण अमावस्या असून १७ तारखेपासून निज श्रावण अर्थात मुख्य श्रावण सुरु होत आहे. या तिथीचे महत्त्व अधोरेखित करत ज्योतिष शास्त्राने कोणते उपाय सांगितले आहेत ते जाणून घेऊ.
अधिकमासात वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या व द्वादशी ही पुण्यकारक पंचपर्वे येतात. या पर्वांची तारीख आणि त्या दिवशी कोणते कर्म करावे ते पुढे दिले आहे.
१ ऑगस्ट : पौर्णिमा- इष्ट व अराध्यदेवतीची पूजा करून पुरुषोत्तमाची विधीवत पूजा करावी. सुवर्णभूमी, अन्न व वस्त्र दान द्यावे.
६ ऑगस्ट : वैधृती योग- स्नान, दान होमादी कृत्ये करून दुध, तूप, फळे, सोळा पाने, सोळा सुपाऱ्या दान कराव्यात.
१३ ऑगस्ट: द्वादशीस- तीर्थस्थानी जावून पितृतर्पण करावे. ब्राम्हणाला अन्न, वस्त्र, जल, द्रव्य, सुवर्ण, गो वा भू यापैकी एखादे दान द्यावे.
१५ ऑगस्ट : व्यतिपात योग- सुवर्ण, धान्य, तेरा संख्येत नारळ वा केळी खजूर, द्राक्षे आदी दान करावे एखादे ताटही द्यावे.
१६ ऑगस्ट :पितृ अमावस्या अमावस्या पितृतर्पण करून करून अन्न, वस्त्र, तीळ, पात्र आदी दाने द्यावी.
अधिक मासात व्रते, नियम, साधन, उपासना दानादी पुण्यकर्म केल्यावर मनुष्याला सुखशांती व समाधान लाभते. त्याची प्रगती होते. इच्छित मनोरथ पूर्ण होतात. मोक्षप्राप्ती होऊन जीवनाचे सार्थक होते. ज्या घरात व्रत, नियम पाळले जातात तेथे देवता वास करतात. त्यामुळे तेथील दु:ख, संकटे बाधा आदींचे निवारण होऊन ते घर, संतती, संपत्ती व सौख्याने भरुन जाते. म्हणून त्यागाचे, दानाचे व भक्तीचे महत्व सांगणाऱ्या पुरुषोत्तम मासाचे खगोलीय ज्योतिष्य शास्त्रीय महत्त्व जाणून घेत आपणही अधिकाचे अधिक फळ मिळवले पाहिजे.