Adhik Maas 2023: आपल्याही आयुष्याचा शेवट गोड व्हावा असे वाटत असेल तर 'या' गोष्टीकडे लक्ष द्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 07:00 AM2023-07-24T07:00:00+5:302023-07-24T07:00:02+5:30
Adhik Maas 2023: जन्माबरोबर सुरू झालेला आयुष्याचा प्रवास कधी संपेल, थांबेल माहित नाही, पण त्याची पूर्वतयारी आधीच करायला हवी ना!
जन्म यातनेतून होतो, त्यामुळे मृत्यू अर्थात शेवट तरी गोड व्हावा, अशी आपली सर्वांचीच इच्छा असते. समाज माध्यमावर एका वृद्ध गृहस्थांचा हा फोटो वाचला आणि खाली कॅप्शन होती, श्रीमद् भागवत पुराण वाचत असताना, श्रीविष्णू चरणी प्राणार्पण! त्या गृहस्थांच्या नशिबाचा हेवा वाटला. मरण कोणालाच सांगून येत नाही, पण आलेच तर असे सुखासुखी यावे. हेच तुकोबांनी देखील मागितले होते,
याजसाठी केला होता अट्टाहास । शेवटाचा दिस गोड व्हावा ॥१॥
आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु.॥
कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचें तेणें गुणें ॥२॥
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥३॥
आपण जन्माला येताना रडतो, पण आई आनंदाश्रू ढाळते, तसेच आपण मरताना आनंदात जावे आणि आपल्या पाठीमागे चार लोकांनी रडावे असे वाटत असेल तर आयुष्यभर सत्कर्म करावे लागते. जीवन आणि मृत्यू या दरम्यानचा प्रवास स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुखकर बनवला तरच शेवटही गोड होतो. हे ज्यांना कळले त्यांना जीवन कळले असे म्हणता येईल. मात्र आपण भेदभाव, द्वेष, वैर, लोभ, हव्यास या विकारांमध्ये एवढे गुंतून जातो की हा प्रवास कुठे न्यायचाय आणि कधी थांबवायचाय हेच लक्षात येत नाही.
म्हणून आपल्या आयुष्याचे ध्येय हे सत्कर्म करणे हेच असायला हवे. आपल्या कडून कोणाही जीवाचा मत्सर घडू नये यासाठी दक्ष असावे. प्रामाणिकपणे आपले जीवन जगावे. त्या कामाची पावती खुद्द भगवंत देतो. आणि विनासायास मरण देतो. यासाठी कर्तव्याप्रती जागृत होऊन या अधिक मासात आणि कायमस्वरूपी रोज झोपताना एक श्लोक म्हणूया ,
अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनम् ।
देहान्ते तव सायुज्यं देहि मे परमेश्वरम् ॥
नमो भगवते वासुदेवाय!