Adhik Maas 2023: भक्त कुब्जावर कृष्ण कृपा झाली तशी आपल्यावरही व्हावी, म्हणून 'अशी' करावी कृष्णभक्ती!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 07:00 AM2023-07-27T07:00:00+5:302023-07-27T07:00:01+5:30
Adhik Maas 2023: कृष्ण भक्ती म्हटल्यावर आठवतात त्या राधा, मीरा पण भक्त कुब्जाही तेवढीच महत्त्वाची; तिच्यावर कृष्ण कृपा कशी झाली ते वाचा.
आपली सकाळ होते, तीच अलार्मने. डोळे उघडल्यावर दृष्टीस पडतो मोबाईल. जगभरातल्या गोष्टी, रोजची कामे, अनेक तऱ्हेचे व्याप मानगुटीवर येऊन बसतात. मन उद्विग्न होते. झोप पूर्ण होऊनही कामाचा ताण दिवसभर राहतो आणि कामात राम वाटत नाही. यासाठीच समर्थ रामदास स्वामी सांगतात,
प्रभाते मनी राम चिंतीत जावा,
पुढे वैखरी राम आधी वदावा,
सदाचार हा थोर सोडू नये तो,
जनी तोचि तो मानवी धन्य होतो।
सकाळची वेळ अतिशय शांत असते. त्यातही पहाटे लवकर उठता आले, तर उत्तमच. अशा वेळी मन शांत असते. ती शांतता कायम ठेवण्यासाठी देवाचे नाम घ्यावे. त्याच्या स्मरणाने दिवसाची प्रसन्न सुरुवात करावी. देवाला साक्ष ठेवून प्रत्येक काम करावे. आपल्याकडे देवाचे लक्ष आहे, हे लक्षात ठेवून सदाचार म्हणजे चांगले काम सोडू नये. वाईट कर्माचे फळ वाईट असते. हे लक्षात ठेवून शक्य तेवढ्या चांगल्या गोष्टी करत राहाव्यात. या चांगल्या कामाची दखल कोणी घेवो न घेवा, भगवंत जरूर घेतो. आता हेच उदाहरण बघा ना...
समाजाने धिक्कारलेली एक मामूली स्त्री, राजवाड्यात चंदन उगाळणे हेच तिचे काम होते. इतके सुंदर चंदन उगाळणारी दुसरी कुणी नव्हतीच. कुणा एकासाठी पहाटे उठून भक्तीने नामस्मरण करीत चंदन उगाळणारी ती `कुब्जा' होती. रुपाचा लवलेश नसलेली, ठेंगणी, पोक असलेली काळी, अशी स्री कुणाला प्रिय असणार? तिची निष्ठा, नामस्मरण, सतत परमात्म्याचे चिंतन कोणाला कळणार? जग बाह्य सौंदर्याचे भोक्ते. तिच्या वाट्याला नुसती अवहेलना.
परंतु एका मध्यरात्री, राधेसकट सगळी मथुरा निद्रिस्त. यमुनासुद्धा संथ, अस्तित्व फक्त भणभणणाऱ्या वाऱ्याचे. आता कुब्जेच्या भक्तीला भगवान श्रीकृष्णाचे रूप आठवता आठवता, चिंतन करता करता उधाण आलं होते. तन, मन कशाकशाचे तिला भान राहिले नव्हते. एवढेच काय, अंधारही जणू तिच्या भक्तीला घाबरला.
अचानक डोळे मिटलेली ती भानावर आली. पैलतीरावरून मुकुंदाच्या पाव्याचे मंजूळ सूर कानी पडताच स्वत:ला सावरीत तिने समोर बघितले. क्षणातच तिचे जीवन धन्य झाले. कारण भगवान करुणाद्र्र नजरेने तिला सांगत होते, `हा वेणुनाद तुझ्यासाठी आहे. फक्त तुझ्यासाठी. तुझ्या निष्ठेचे फळ, तू मागितले नाहीस तरीही. आपली ही भेट.'
समाजाने अव्हेरलेली कुब्जा भगवंताना प्रिय होती. तिचे रूप त्याला दिसले नव्हते. दिसली होती, ती केवळ निष्ठा. धन्य ती कुब्जा, धन्य तिची भक्ती! आईला ज्याप्रमाणे आपली सगळी मुले सारखी आवडतात, तशी देवालाही आपली लेकरे प्रिय असतात.
म्हणून आपणही देवाचे स्मरण मनात ठेवून आनंदाने आणि सदाचाराने सर्व कामे पार पाडावीत. एक ना एक दिवस आपल्यालाही भगवद्कृपा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही.