Adhik Maas 2023: अधिक मासात कोणते संकल्प लाभदायी ठरतात व ते कसे करायचे ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 10:58 AM2023-07-06T10:58:37+5:302023-07-06T10:59:00+5:30
Adhik Maas 2023: १८ जुलै पासून अधिक श्रावण मास सुरू होत आहे, त्यानिमित्ताने या महापुण्यदायी मासात कोणते संकल्प सिद्धीस न्यायला हवेत ते वाचा.
पुण्यसंचयासाठी उत्तम कालखंड मानला जाणारा अधिक महिना यंदा मंगळवार, १८ जुलै २०२३ रोजी अधिक श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. तर अधिक श्रावण महिन्याची सांगता बुधवार, १६ ऑगस्ट २०२३ रोजी होणार आहे. अधिक मासात अधिक फलप्राप्तीसाठी आपण हर तऱ्हेचे प्रयत्न करतो. त्यात पूजेइतकेच महत्त्व असते, संकल्पाला. मात्र, संकल्प करण्याआधी किंवा संकल्प सोडण्याआधी, त्याचा अर्थ काय आणि तो कोणकोणत्या प्रकारे केला जातो, ते जाणून घेऊया.
शपथ आणि संकल्प यातील फरक :
हाती घेतलेले कोणतेही कार्य सिद्धीस जावे, म्हणून आपण संकल्प करतो. संकल्प स्वेच्छेने केला जातो. याउलट शपथ, स्वेच्छेने किंवा अनिच्छेने घेतली जाते. शपथ पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी जाचक वाटतात, तर संकल्प पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी आव्हानात्मक वाटतात. शपथ रागाच्या भरात घेतली जाऊ शकते, मात्र संकल्प हा चांगले कार्य तडीस नेण्यासाठीच केला जातो. म्हणून अधिक मासाच्या वेळी धार्मिक अनुष्ठान मांडले असता, यथाशक्ती संकल्प पार पाडले जातात.
संकल्प करत असताना म्हणायचा श्लोक :
सङकल्पमूल: कामो वै यज्ञा: सङकल्पसम्भवा:।
व्रता नियमधर्माश्च सर्वे सङकल्पजा: स्मृता।।
अर्थ : आपल्या ईच्छा पूर्ण व्हाव्यात, या हेतूमधून संकल्पाचा उगम झाला. सर्व यज्ञ संकल्पानंतर संपन्न होतात, त्याचप्रमाणे सर्व व्रते, नियम व धर्म संकल्पातून निर्माण होतात. संकल्पाच्या वेळी देवतेचा उच्चार केल्यामुळे देवता सुक्ष्म रूपाने उपस्थित होतात व संकल्प तडीस नेण्यास मदत करतात.
संकल्प कधी करतात?
अनेक दिवस चालणारे गुरुचरित्र, भागवतसप्ताह, चण्डी, अथर्वशीर्ष, शिवकवच इ. अनुष्ठाने आरंभ करण्यापूर्वी संकल्प सोडले जातात. संकल्प सोडण्याच्या वेळी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला 'उदक' म्हणतात. उदकसेवनावाचून झालेला संकल्प व्यर्थ असतो, असे म्हणतात. नित्यसंकल्पात 'संकल्पोक्त फलवाप्यते, संकल्पोक्तसंख्यापरिपूर्तये' असे म्हटले जाते.
अधिक मासात कोणकोणते संकल्प करता येऊ शकतात?
चार्तुमासात, श्रावणी सोमवारी आपण जे संकल्प करतो, त्याचीच पुनरावृत्ती अधिक मासात केली तरी चालते. त्यासाठी वेगळ्या संकल्पांचे आयोजन करण्याची गरज नाही. मूळात, फार कठीण संकल्प करू नयेत. ज्या गोष्टींची आपल्याला सहज पूर्तता करता येईल, अशाच गोष्टींचा संकल्प करावा, म्हणजे तो सिद्धीस नेता येतो.
जसे की, दर सोमवारी शिवामूठ वाहणे, कोरडा शिधा दान करणे, एखाद्या ग्रंथालयाला, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांना यथाशक्ती आर्थिक मदत करणे, घरातल्या बाळकृष्णाला किंवा श्री विष्णूंच्या तसबिरीला एक तुळशी दल वाहणे, रोज एखादे पांढरे फुल वाहणे, उपास्य देवतेचा जप करणे, इ. गोष्टींचा आपण संकल्प करू शकतो.
प्रेम आणि प्राप्ती या दोन्ही गोष्टी मागून मिळत नसतात. त्यासाठी समर्पण असावे लागते. मनापासून केलेला संकल्प निश्चित पूर्ण होतो आणि त्याचे फळही मिळते.
भगवान श्रीकृष्णाची तुला करत असताना, त्यांची प्रिय पत्नी सत्यभामा हिने तिजोरीतले सर्व धन पारड्यात टाकले, तरी श्रीकृष्णाचे पारडे वर जात नव्हते. तेव्हा अत्यंत भक्तीभावाने रुक्मिणीने एक तुळशीचे पान धनाची राशी असलेल्या पारड्यात ठेवले आणि कृष्णाचे पारडे वर झाले. या कथेवरून लक्षात येते, भक्तीभावाने वाहिलेली कोणतीही गोष्ट, कोणताही संकल्प भगवंतापर्यंत पोहोचतो. फक्त त्यासाठी शुध्द भक्ती, शुद्ध आचरण आणि शुद्ध मनाने संकल्प करायला हवा.