Adhik Maas 2023: अधिक मासातले शेवटचे चार दिवस, माउलींच्या शब्दात करूया विश्वप्रार्थना 'पसायदान-२'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 07:00 AM2023-08-13T07:00:00+5:302023-08-13T07:00:02+5:30

Adhik Maas 2023: अधिक मासाचे अधिक फळ मिळावे म्हणून महिनाभर आपण अनेक प्रकारचे पुण्यकर्म केले आता विश्वशांतीसाठी प्रार्थना करूया!

Adhik Maas 2023: Last four days of Adhik Maas, in the words of Mauli, let's pray the world 'Pasaidan-2' | Adhik Maas 2023: अधिक मासातले शेवटचे चार दिवस, माउलींच्या शब्दात करूया विश्वप्रार्थना 'पसायदान-२'

Adhik Maas 2023: अधिक मासातले शेवटचे चार दिवस, माउलींच्या शब्दात करूया विश्वप्रार्थना 'पसायदान-२'

googlenewsNext

संत वाङमयाची ताकदच एवढी आहे, की ते वाचताना आपण आपल्या मनाशी हितगुज करत आहोत की काय, असा भास होतो. आता माऊलींचे पसायदानच पहा ना, ते म्हणतात, 

दूरितांचे तिमीर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, 
जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात।।

आपल्या सभोवती, परिसरात, गावात, शहरात, देशात, जगात काहीही वाईट घडत असले, तर आपले संवेदनशील मन विव्हळते. मनोमन आपले हात त्या दीनांसाठी जोडले जातात. त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर होवो, अशी आपण प्रार्थना करतो. तीच भावना माऊली पसायदानात व्यक्त करतात. फरक एवढाच, की आपण चांगल्या लोकांचे भले होवो म्हणून प्रार्थना करतो, परंतु माऊली वाईट लोकांचेही भले होवो, असे म्हणतात. त्यांच्या आयुष्यातील तिमीर म्हणजे अंधार दूर झाला, तर लख्ख प्रकाशात वाईट काम करण्यासाठी ते धजावणार नाहीत. इतर लोकांप्रमाणे तेही सन्मार्गाला लागतील. 

Adhik Maas 2023: अधिक मासातले शेवटचे पाच दिवस, माउलींच्या शब्दात करूया विश्वप्रार्थना 'पसायदान-१'

याठिकाणी अधोरेखित करण्यासारखी गोष्ट अशी, की आईला आपली सगळी लेकरे सारखी असतात. मुल हुशार असो किंवा ढ, गरीब असो नाहीतर श्रीमंत, सुदृढ असो नाहीतर आजारी, ती प्रत्येकावर समान माया करते. तोच भाव संत ज्ञानेश्वरांच्या ठायी दिसून येतो, म्हणूनच तर त्यांना 'माऊली' म्हटले जाते. त्या वत्सल भावनेने ते दुरितांचे तिमिर जावो, असे म्हणत आहेत. 

माऊलींना अभिप्रेत असलेला स्वधर्म कोणता, तर मनुष्यनिर्मित नाही, तर ईश्वरनिर्मित. तो म्हणजे 'मानवता' धर्म. सद्यस्थितीत प्रत्येकाला त्याचाच विसर पडत चालला आहे. परंतु, आपण सगळे देहाने वेगवेगळे असलो, तरी आत्मा एकच आहोत. आपण ईश्वराचेच अंश आहोत. त्यामुळे प्रत्येक देहातील आत्म्याचा सन्मान करणे, हा आपला मानव धर्म आहे. सूर्य ज्याप्रमाणे तळपत राहतो, तसा सत्वृत्तीने सारा समाज उजळू निघेल. सर्व प्राणीमात्रांना परस्परांप्रती स्नेह, भूतदया, प्रेम वाटले पाहिजे आणि मैत्र, सख्य निर्माण झाले पाहिजे. 

वर्षत सकळमंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेट तू भूता।।

'जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत' ही आपल्या संतांची शिकवण आहे. प्रत्येक जिवात्म्यामध्ये ईश्वराचा वास आहे, ही जाणीव जेव्हा होते, तेव्हा त्यांच्याप्रती वाईट विचार मनात येत नाहीत. अशी सद्भावना निर्माण झाली, की रामराज्य निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. हा समाज, जणू ईश्वरनिष्ठांची मांदियाळी वाटू लागेल. 

चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव,
बोलते जे अर्णव, पियुषाचे।।

कल्पतरू म्हणजे असा वृक्ष, जो सर्व मनोकामना पूर्ण करतो आणि चिंतामणी म्हणजे असा मणी, जो आपण जे चिंतन करू, त्या गोष्टींची पूर्तता करतो. माऊली म्हणतात, ज्यावेळी समाजात भूतदया निर्माण होईल, त्यावेळी ते गावच चिंतामणींनी युक्त असेल. तिथे कल्पतरुंचे आरव म्हणजे आवाज असतील. कल्पतरूंच्या रूपाने चैतन्य सळसळत असेल. हर तऱ्हेने केवळ समृद्धी तेथे वास करेल. तसेच पियुषांचे अर्णव म्हणजे अमृतसागर असेल, अशा ठिकाणी कोणाचीच, कुठलीच उपेक्षा होणार नाही. 

चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन,
ते सर्वाही सदासज्जन, सोयरे होतु।।

माऊलींचे काव्य लालित्य येथे ठळकपणे दिसून येते. जे सर्वसामान्य दृष्टीला दिसत नाही, ती दूरदृष्टी कवींच्या ठायी असते. माऊलीसुद्धा त्याच दूरदृष्टीने म्हणतात, अशा कल्पतरुंच्या गावात योगीजनांचा एवढा सुकाळू असेल, की तिथले लोक सूर्यासारखे ज्ञानाने तळपणारे असतील, परंतु त्यांच्या प्रखरतेचा कोणालाही त्रास होणार नाही. तिथले लोक स्वभावाने चंद्रासारखे शीतल असतील, परंतु, त्यांच्या चारित्र्यावर कोणतेही लांछन नसेल. त्यामुळे आपोआपच सर्वांची सोयरीक जुळलेली असते. सोयरीक जुळली, की 'वसुधैव कुटुंबकम्' ही भावना जागृत होईल आणि सर्व सुखी होतील. हेच पुढच्या ओवीत माऊली सांगतात. त्याचा भावार्थ पुढच्या भागात पाहू...!

जय हरी माऊली

Web Title: Adhik Maas 2023: Last four days of Adhik Maas, in the words of Mauli, let's pray the world 'Pasaidan-2'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.