Adhik Maas 2023: अधिक श्रावण मासात भगवान विष्णूंचा जप करायचा की महादेवाचा? आणि किती ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 12:00 PM2023-07-07T12:00:24+5:302023-07-07T12:00:47+5:30
Adhik Maas 2023: १८ जुलै पासून अधिक श्रावण मास सुरू होत आहे, त्यानिमित्ताने पुण्यसंचयाच्या दृष्टीने कोणता जप करायला हवा ते जाणून घ्या.
यंदा श्रवणाआधी अधिक मास येत आहे, १८ जुलै ते १६ ऑगस्ट हा त्याचा कालावधी असणार आहे. हा महिना श्रावणआधी आला म्हणून त्याला अधिक श्रावण म्हटले जाईल. तसे असले तरी श्रावणातील पूजा विधींचा अधिक श्रावणाशी संबंध नसतो. सालाबादाप्रमाणे येणारा श्रावण, ज्याला निज श्रावण म्हणतात तो १७ ऑगस्ट पासून सुरू होईल. त्यामुळे स्वाभाविकच श्रावण मासातील महादेवाची पूजा ही अधिक श्रावणात करायची नसून ती निज श्रावणातच केली पाहिजे. तर अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे त्याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. त्यामुळे या काळात भगवान विष्णूंची उपासना केली जाते. यात मुख्य भाग असतो जपाचा!
'जप'तो, त्याला भगवंत 'जपतो', असे म्हणतात. भगवंताच्या नाम:स्मरणाचे जीभेला आणि मनाला वळण लागावे, म्हणून जप केला जातो. भगवंताच्या नामाचा पुनरुच्चार आणि मन एकाग्र करायला लावणे, हा त्यामागील विचार असतो. जप केल्यामुळे आचारही शुद्ध होतो.
अधिक मासात (Adhik Maas 2023) मुख्यत्वे भगवान महाविष्णूंचे श्लोक, मंत्र, नाम यांचे पारायण केले जाते. अनेक जण रोज एक जपाची माळ ओढायची, असा संकल्प करतात. अधिक मासात 'ऊँ नमो भगवते वासुदेवाय' हा मंत्र १०८ वेळा म्हणतात. याशिवाय अनेक जण आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करताना जपाची माळ ओढतात.
जपाची सवय का लावावी, याचे उत्तर शोधायचे, तर संत सोयरोबानाथ यांच्या अभंगाच्या ओळी आठवतात,
हरिभजनाविण काळ घालवू नको रे,
अंतरिचा ज्ञानदिवा मालवू नको रे।।
चांगल्या गोष्टी आपोआप घडत नाहीत, त्या घडवाव्या लागतात. तशाच चांगल्या सवयी आपोआप लागत नाहीत, त्या लावाव्या लागतात. प्रापंचिक माणसाच्या मुखात नाम:स्मरण सहजासहजी येत नाही, ते जाणीवपूर्वक घ्यावे लागते. ती सवय लावण्याचे माध्यम म्हणजे 'जप.' जपाच्या माळेत १०८ मणी असतात. त्या संख्येगणिक नाम घेत असताना किमान एखादवेळेस तरी मनापासून नाम निघावे, हा उद्देश असतो.
जप कसा करावा?
जप करताना उजव्या हाताच्या मधल्या बोटाच्या पेरावर माळ धरून अंगठ्याने तिचे मणी आपल्याकडे ओढायचे असतात. माळेतील मण्यांची झीज होऊ नये, म्हणून ते आपटणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. मेरूमणी येताच माला विरुद्ध बाजूने मोजण्यास सुरू करावी.
एका व्यक्तीची माळ दुसऱ्या व्यक्तीने वापरू नये. माळ जपण्यापूर्वी आणि वापरून झाल्यावर माळेला नमस्कार करावा. पवित्र ठिकाणी जपमाळ ठेवावी. शक्यतो एखाद्या कापडी पिशवीतून किंवा डबीतून जपमाळ ठेवावी. जपमाळेची संख्या एकाएक न वाढवता, क्रमाक्रमाने वाढवावी. मन केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. शुद्ध मनाने नाम:स्मरण घ्यावे. जप करताना मन शांत व्हावे, यासाठी शांत परिसराची निवड करावी. सुखासनात बसून डोळे मिटून जप करावा.
आपल्याला एक वाईट खोड असते, ती म्हणजे नाम:स्मरण सुरू करताच जपमाळेकडे पाहण्याची. जेमतेम दहा मणी ओलांडून होत नाही, तो आपले लक्ष जपमाळेकडे जाते. याचा अर्थ, आपले मन नाम:स्मरणात नसून केवळ सोपस्कारात अडकले आहे. जपसाधनेचा संबंध पाप-पुण्याशी नसून, आपल्या आचार-विचारांशी निगडित आहे. म्हणून त्या सरावाला 'जपसाधना' म्हटले जाते. ज्याप्रमाणे एखादे सुभाषित, श्लोक, कविता, गाणे पाठ होण्यासाठी आपण शंभर वेळा घोकमपट्टी करतो, तसेच भगवंन्नाम मुखोद्गत होण्यासाठी १०८ संख्या सुनिश्चित केली आहे. जपसाधनेत एवढ्यावर थांबणे अपेक्षित नसून, ही सुुरुवात आहे, असे म्हटले जाते. त्यामुळे आपणही संख्येत अडकून न राहता, मेरुमणी हाताला लागेपर्यंत अखंड नाम:स्मरण घेत राहावे.
ऊँ नमो भगवते वासुदेवाय.