Adhik Maas 2023: अधिक मासात नदी किंवा संगमात स्नान करावे;शक्य नसेल तर प्रत्यक्ष दर्शन तरी घ्यावे, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 02:25 PM2023-07-27T14:25:23+5:302023-07-27T14:25:36+5:30
Adhik Maas 2023: नदीचे विशाल पात्र, समुद्र किंवा जलाशय पाहिला तरी निसर्गासमोर कृतज्ञतेने आपले हात जोडले जातात, अधिक मासात त्यात स्नानही महत्त्वाचे!
>> हृषीकेश श्रीकांत वैद्य
आपण पूर्वी बघितले असेल की ट्रेन ने जाताना नदी किंवा खाडी (नदी - समुद्र संगम) लागला की बहुतांश लोकांचे हात आस्थेने जोडले जायचे. काही जण लहान मुलांना त्यात अर्पण करण्यासाठी नाणी द्यायचे. तर, आपले पूर्वज नक्की का करायचे असं?
तर, संगम किंवा नदी हे जीव आणि शिवाच्या एकरूप होण्याचे प्रतीक आहे. जसा सागरापासून बाष्पीभवनामुळे तयार झालेला ढग दूर गिरी पर्वतांवर जाऊन बरसतो, त्या प्रत्येक थेंबाला आपल्या मूळ स्वरूपात म्हणजेच सगरात एकरूप होण्याची ओढ लागलेली असते. अनेक पर्वतरांगा, दऱ्या, अरण्य, इ पार करत करत तो थेंब सागराच्या दिशेने धाव घेत असतो व अंततोगत्वा शेवटी तो सागराला जाऊन मिळतो त्यात एकरूप होतो.
जसा एक छोटा थेंब जिद्दीने सागरात जाऊन एकरूप होतो त्याचप्रमाणे आपला आत्मा हा त्याच्या मूळ तत्वात म्हणजेच परब्रह्म परमेश्वराशी एकरूप होवो ही नमस्कार करण्यामागची भावना. आपल्या जीवनाचा नेमका उद्देश्य काय आहे? आपण जन्माला का आलो? आपण नक्की काय करत आहोत ? का करत आहोत ? नक्की काय करायला हवं ? काय साध्य करायला हवं ? हे प्रश्न जो पर्यंत आपल्याला पडत नाहीत व योग्य गुरूंकडून त्याची उत्तरे मिळत नाहीत तो पर्यंत आपला जन्म घेणेच व्यर्थ आहे !
गंगेपुढे मन शांत होते. गंगा हे परमेश्वराचे चिन्ह आहे. गंगास्नानाने पापक्षालन होते. परंतु त्यासाठी आपला भाव चांगला असावा लागतो. या गंगास्नानाचे दुसरे महत्त्व असे की, आपल्या पाठीमागे कायम ग्रहपीडा असते. कोणाला शनीपीडा, कोणाला मंगळ पीडा असते, या सर्व पीडा गंगेच्या पाण्याने कमी होत जातात.
हिमालयात गंगेचा उगम होतो, त्या ठिकाणाला गंगोत्री म्हणतात. तेथूनच ती ऋषिकेश व हरिद्वारला येते. जेव्हा संधी मिळेल तेव्हा तिथे अवश्य जाऊन या. तोवर आपल्या हाती असलेले पाणी गंगेचे पुण्य स्मरण करून तीर्थ समजून प्या व पाण्याची नासाडी न होता ते जपून वापरा. आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व लक्षात घेऊन नदी, संगम किंवा कोणताही जलस्त्रोत्र दिसल्यावर नतमस्तक जरूर व्हा आणि अधिक मासात नदी स्नानाची संधी दवडू नका!