Adhik Maas 2023: 'या' कथेमुळे शंखाला विष्णू पूजेत मिळाले मुख्य स्थान; अधिक मासानिमित्त दररोज करा शंखपुजा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 07:00 AM2023-07-20T07:00:00+5:302023-07-20T07:00:07+5:30

Adhik Maas 2023: १८ जुलै पासून अधिक श्रावण मास सुरू झाला आहे, तो १७ ऑगस्ट पर्यंत असणार आहे, या कालावधीत शंखपुजेचे महत्त्व जाणून घ्या. 

Adhik Maas 2023: 'This' story gives the conch a central place in Vishnu worship; Do Shankh Puja daily for Adhik Maas! | Adhik Maas 2023: 'या' कथेमुळे शंखाला विष्णू पूजेत मिळाले मुख्य स्थान; अधिक मासानिमित्त दररोज करा शंखपुजा 

Adhik Maas 2023: 'या' कथेमुळे शंखाला विष्णू पूजेत मिळाले मुख्य स्थान; अधिक मासानिमित्त दररोज करा शंखपुजा 

googlenewsNext

भगवान महाविष्णूंच्या हातातील अनेक आयुधांमध्ये शंखाला स्थान मिळाले आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व वाढले आणि साहजिकच त्याचा पूजेतला मानही वाढला. शंख रणवाद्य म्हणून गौरवले गेले. मंगलकार्यातही शंखध्वनी केल्याशिवाय कार्य पूर्ण होत नाही. एवढे शंखाला महत्त्व मिळाले, ते का, कशामुळे, हे सविस्तर जाणून घेऊ. 

विष्णुंनी हाती शंख घेतला, त्याची कथा :

त्वं पुरा सागरोत्पन्न: विष्णुना विधृते करे।
असत: सर्वदेवानां पांचजन्य नमोस्तुते।।

समुद्र मंथनातून पांचजन्य नावाच्या शुभ्र शंखाची उत्पत्ती झाली असे म्हणतात. विष्णू पुराणानुसार, माता लक्ष्मी ही समुद्रराजाची कन्या असून 'शंख' तिचा भाऊ होय. म्हणूनच असेही मानले जाते, की जेथे शंख आहे तेथे लक्ष्मीचे निवासस्थान आहे. म्हणून भगवान विष्णुंनी आपल्या हातात शंख धारण केला. 

धर्मशास्त्रातील शंखाचे महत्त्व : 

हिंदू धर्मशास्त्र अभ्यासक सुधा धामणकर शंखाचे महत्त्व आणि त्याची महती सांगतात, हिंदूंच्या देवळात देवमूर्तीच्या डाव्या हाताला शंख ठेवतात. देवतापूजनाचे आधी शंखाचीच पूजा असते. हिंदू धर्माचे एक प्रतीक म्हणजेच, देवाजवळचा शंख आहे. सर्व मंगलकार्यात शंखनाद करणे पवित्र मानले जाते. युद्धारंभी रणवाद्य म्हणूनही मोठमोठ्याने शंखाचा आवाज काढतात. भगवद्गीतेत याचा उल्लेख आला आहे.  लहान मुलाची प्रकृति सुधारण्यासाठी, त्याचे आयुष्य वाढण्यासाठी पूर्वी मुलांच्या दंडावर शंख, मंत्रसंस्कार करून बांधत असत. शंखभस्म आयुर्वेदात मोलाचे औषध ठरले आहे.

'शंख' शब्दाची व्युत्पत्ती :

श खनति अशी शंख शब्दाची फोड कोशकार करतात. जो कल्याण निर्माण करतो, दारिद्र्य घालवतो, तो शंख. मंदिरामधून देवताना जागे करण्याचा उपचार म्हणून मंद शंखनाद पूर्वी करीत शंखामध्ये पाणी  किंवा दूध घेऊन ते देवावर शिंपडतात. स्नान घालतात. देवतांचे तीर्थ घेऊन `गंगा' अंगावर घेतली, या पवित्र भावनेने मस्तकावर उडवतात.

देवीला 'शंखिनी' म्हणतात : 

देवीला शंख आवडतो, म्हणून तिनेही आपल्या अन्य आयुधांबरोबर शंखही धारण केला आहे. देवीने अनेक युद्धांमध्ये दैत्यासूरांचा वध करताना शंख फुंकून युद्धाची सुरुवात केली, म्हणून तिला 'शंखिनी' म्हणतात.

शंखाचे पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व: 

महाभारतात युद्धाचेवेळी भगवान श्री कृष्णाजवळ पांचजन्य शंख होता. तर अर्जुनाजवळ देवदत्त आणि भीमाजवळ पौंड्रक नावाचा मोठा असा शंख होता. युधिष्ठिराजवळ अनंतविजय, नकुलकडे सुघोष आणि सहदेवाकडे मणिपुष्पक शंख होता. यापैकी एका शंखाचा आवाज करुन युद्धाची सुरुवात केली जायची. 

भारताच्या पुरातन इतिहास कालात शंख हे एक राष्ट्रीय नादवाद्य होते, मांगल्याचे प्रतीक होते. आपल्याकडील रत्नशास्त्रात फिक्कट गुलाबी रंगी गोलसर, स्वच्छ चकचकीत, सुंदर शंख हा रत्न मानतात. उजवा शंख व डावा शंख असे शंखात प्रकार आहेत. ते उजवीकडे व डावीकडे वळलेले असतात. उजवा शंख दुर्मिळ व पुण्यप्रद समजतात. 

शंख असतो तेथे विष्णू आणि देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते, अशी हिंदूंची धारणा आहे. म्हणून विष्णू पुजेत शंखपूजेला महत्त्व असते.

Web Title: Adhik Maas 2023: 'This' story gives the conch a central place in Vishnu worship; Do Shankh Puja daily for Adhik Maas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.