Adhik Maas 2023: 'धोंडा' मास आणि 'जावयाचा' मान यांचा शब्दश: अर्थ घेऊ नका; ही तर नारायणाची पूजा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 11:29 AM2023-07-06T11:29:04+5:302023-07-06T11:29:40+5:30
Adhik Maas 2023: अधिक मासाला धोंडा मास का म्हणतात आणि त्यात जावयाला एवढे महत्त्व का दिले जाते ते जाणून घ्या!
यंदा मंगळवार, १८ जुलै २०२३ रोजी अधिक श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. तर अधिक श्रावण महिन्याची सांगता बुधवार, १६ ऑगस्ट २०२३ रोजी होणार आहे. या कालावधीत तुमच्या आणि तुमच्या जावयाच्या सवडीनुसार त्याचा मान केला जातो, भेटवस्तू दिल्या जातात, त्याचे अगत्य केले जाते, पण त्यामागचा हेतू काय ते जाणून घेऊ.
हिंदू संस्कृतीत, परंपरेत प्रत्येक नात्याला मानाने वागवले जाते. जेणेकरून आपसुकच परस्पर ऋणानुबंध दृढ होतात. अधिक मासानिमित्त असेच एक हळुवार नाते, ते म्हणजे सासु-सासरे आणि जावयाचे. आपल्या मुलीला सासरच्या वातावरणात प्रेमाने सांभाळून घेणारा जावई, हा मुलीच्या मातापित्यांना `नारायणा'समान भासतो. म्हणून पुरुषोत्तम मासात जावयाचा मान म्हणून त्याला वाण दिले जाते.
जावयाला काय वाण द्यावे?
अधिक मासातील प्रत्येक दिवस शुभ असतो. तरीदेखील जावयाच्या सवडीने त्याला घरी बोलावून त्याचा साग्रसंगीत सत्कार केला जातो. अलीकडे, तर प्रत्येक गोष्ट थाटामाटात साजरी करण्याची प्रथा झाल्यामुळे जावयाला काय वाण द्यावे, याबाबत अनेक सोन्याच्या पेढ्यांमध्ये चढाओढ पहायला मिळते. चांदीचे ताम्हन, चांदीचे निरांजन, चांदीचा पेला अशा अनेक वस्तू भेट म्हणून देता येतात. अर्थात हा सगळा भाग, स्वेच्छेचा. हौसेला मोल नसते. परंतु, शास्त्रानुसार तीस तीन अनारसे, म्हैसूर पाक किंवा बत्तासे असे सच्छिद्र पदार्थांचे वाण देण्याची पद्धत आहे.
जोडवी बदलण्याचा मुहूर्त.
अधिक मासाचे निमित्त, म्हणून सुवासिनींनादेखील जोडवी बदण्यास निमित्त मिळते. जोडवी हे सौभाग्यलेणे म्हणून पायात घातले जाते. जोडव्यांमध्येही अनेक सुंदर, नक्षीदार प्रकार मिळतात. दर तीन वर्षांनी अधिक मासाची आठवण म्हणून नवीन जोडवी घेतली जातात.
धोंड्याचा मास आणि धोंड्याचा नैवेद्य.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी अधिक मासाला धोंड्याचा महिना असे म्हटले जाते. नियमित सुरू असलेल्याल्या कालगणनेत आडमुठ्यासारखा, मध्येच आलेल्या दगडासारखा (धोंड्यासारखा) आलेला महिना म्हणून धोंड्याचा महिना असेही एक मत आहे. मात्र, धोंडा आणि अधिक मास यांना जोडणारा एक खाद्यपदार्थ आहे, त्याला `धोंडा' म्हटले जाते. नागपंचमीला पुरण घालून चौकोनी पदार्थ केला जातो, त्याला `दिंड' म्हणतात, तोच पदार्थ मराठवाड्यात गोल लाडवासारखा किंवा धोंड्यासारखा वळून उकडवला जातो. त्याला धोंड्याचा नैवेद्य म्हणातात. जेवताना जावयाला आग्रहाने धोंडे खाऊ घातले जातात आणि त्याच्या रुपाने नारायणाने धोंड्यांचा नैवेद्य स्वीकार केला, असे समजतात.
जावई हा जिव्हाळ्याचा, आधाराचा धागा खूप पूर्वीपासून जपण्यात आला आहे. प्रत्येक नाते शब्दातून सांगण्यापेक्षा प्रतीकांतून, उत्सवांच्या माध्यमातून आविष्कारित करण्याची सवय आपल्या हिंदू संस्कृतीने लावली आहे. काळ बदलला तशी सण-उत्सवांची पद्धत बदलली. वाण देण्याच्या वस्तूही बदलल्या...मात्र परंपरांची साखळी अतुट राहिल्याने नात्यांमधले अवघडलेपण हळू हळू दूर होऊ लागले. लक्ष्मी नारायण भगवान की जय।।