अधिक मास म्हणजे काय? यंदा अधिक महिना कोणता? कधीपासून सुरू होणार? पाहा, महत्त्व व मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 11:16 AM2023-06-16T11:16:45+5:302023-06-16T11:19:37+5:30

Adhik Maas 2023: सन २०२० मध्ये अधिक महिना आला होता. अधिक मास केव्हा येतो? वाचा, शास्त्र, महत्त्व व मान्यता.

adhik maas 203 know about how is adhik maas calculated and significance of purushottam maas and date and time in 2023 | अधिक मास म्हणजे काय? यंदा अधिक महिना कोणता? कधीपासून सुरू होणार? पाहा, महत्त्व व मान्यता

अधिक मास म्हणजे काय? यंदा अधिक महिना कोणता? कधीपासून सुरू होणार? पाहा, महत्त्व व मान्यता

googlenewsNext

Adhik Maas 2023: मराठी पंचांगानुसार दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरला जातो व ते वर्ष तेरा महिन्यांचे असते. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मल मास, संसर्प मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात. अधिक मास येण्याची पद्धत पूर्णपणे खगोलशास्त्रीय आहे. यंदा म्हणजेच २०२३ मध्ये श्रावण महिना अधिक असणार आहे. असा योग १९ वर्षांनी जुळून आल्याचे सांगितले जात आहे.सन २०२३ मधील अधिक मास केव्हापासून सुरू होणार? अधिक मासाला परुषोत्तम मास का म्हटले जाते? खगोलीय दृष्टिने अधिक मासाचे चलन कसे ठरवले जाते? जाणून घेऊया... (Adhik Maas Importance)

सूर्याधरित पंचांग पाळणाऱ्या आसाम, ओरिसा, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांत अधिक महिना नसतो. तो फक्त चांद्र पंचांग वापरणाऱ्या महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांत पाळला जातो, असे सांगितले जाते. पृथ्वीवर होणारे ऋतुबदल हे सूर्यामुळे होत असतात. त्यामुळे सौर कालगणना महत्वाची ठरते. पण त्याचवेळी हेही खरे आहे की, सूर्याच्या स्थानबदलामुळे होणारे बदल सहज लक्षात येत नाहीत. त्यामुळे दैनंदिन जीवनचर्या ठरवत असताना सूर्यामधील बदल नोंदवून कालगणना करता येत नाही. चंद्राचा आकार आणि जागेतला बदल सहज नोंदवता येतो. त्यामुळे दैनंदिन व्यवहाराकरिता चंद्र उपयोगी ठरतो. हे लक्षात घेऊन जगभरातील अनेक संस्कृतींमधून दैनिक व्यवहाराकरता चांद्र तर वार्षिक व्यवहाराकरता सौर कॅलेंडर वापरले जाते. अशा प्रकारच्या कॅलेंडरला चांद्रसौर कॅलेंडर म्हणतात. (Adhik Maas Significance)

अधिक महिना कसा येतो?

पृथ्वीची सूर्याभोवती एक फेरी म्हणजेच ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे आणि ४३ सेकंदांनी पूर्ण होते. व्यवहाराच्या सोयीकरिता आपण ३६५ दिवसांनी नवे वर्ष सुरू करतो. दर चार वर्षांनी येणारे वर्ष एक वाढीव दिवस घेऊन ३६६ दिवसांचे 'लीप वर्ष' म्हणून स्वीकारतो. पृथ्वीभोवतीची चंद्राची एक फेरी म्हणजे 'चांद्रमास'. एक वर्षाच्या कालावधीत १२ चांद्रमास पूर्ण होतात, यालाच चांद्रवर्ष म्हणतात. चांद्रमास प्रतिपदा ते अमावास्या असा २९.५ दिवसांचा असतो. त्यामुळे चांद्रवर्ष ३५४ दिवसांचे होते. याचा अर्थ चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा ११ दिवसांनी लहान असते. हा फरक दरवर्षी वाढत राहू नये, याकरिता चांद्रवर्षामध्ये ठराविक कालावधीनंतर एक महिना वाढीव म्हणजेच 'अधिक' घेतला जातो आणि दोन्ही कॅलेंडर एकमेकांना जोडून घेतली जातात. (What is Adhik Maas Mahina)

अधिक मास म्हणजे काय?

पृथ्वीवरून पहाताना सूर्य दररोज सरासरी एक अंश पुढे सरकल्यासारखा वाटतो. दर ३० दिवसांनी तो ३० अंशांची एक रास पुढे सरकतो. सूर्याच्या या राशीबदलाला 'सूर्यसंक्रांत' अथवा 'सूर्य संक्रमण' असे म्हणतात. हा कालावधी किमान २९ दिवस १० तास ४८ मिनिटे ते कमाल ३१ दिवस १० तास ४८ मिनिटे एवढा असू शकतो. चांद्रमास हा शुद्ध प्रतिपदेला सुरू होऊन अमावास्येला संपतो. चांद्रमास किमान २९ दिवस ५ तास ४४ मिनिटे ते कमाल २९ दिवस १९ तास ३६ मिनिटे असतो. या कालावधीत एक तरी सूर्यसंक्रांत होते. चांद्रमास हा सूर्यमासापेक्षा नेहमी लहान असतो. याचा परिणाम म्हणून एखाद्या चांद्रमासात एकही सूर्यसंक्रांत होत नाही. या चांद्रमासाला 'असंक्रातीमास' म्हणजेच 'अधिक मास' म्हटले जाते. (Adhik Maas in 2023 Date And Time)

सन २०२३ मधील अधिक मास कोणता?

सन २०२३ वर्ष अनेकार्थाने अद्भूत मानले गेले आहे. यापूर्वी सन २०२० मध्ये अधिक महिना आला होता. सन २०२३ मध्ये मंगळवार, १८ जुलै २०२३ पासून अधिक महिन्याला सुरुवात होणार आहे. यंदा श्रावण महिना अधिक आहे. बुधवार, १६ ऑगस्ट २०२३ रोजी संपेल. सरासरी ३२ महिने १६ दिवसांनी हा अधिक मास येतो. चैत्र ते अश्विन महिने अधिक वेळा, तर कार्तिक व फाल्गुन क्वचित अधिक येऊ शकतो. पण मार्गशीर्ष, पौष, माघ हे महीने कधीच अधिक येत नाहीत. 

 

Web Title: adhik maas 203 know about how is adhik maas calculated and significance of purushottam maas and date and time in 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.