Adi Shankaracharya Jayanti 2022: धार्मिक तटबंदी उभारणीचे ऐतिहासिक कार्य करणारे सर्वोच्च आचार्य, अद्वितीय कर्मयोगी आद्य शंकराचार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 01:05 PM2022-05-06T13:05:11+5:302022-05-06T13:06:24+5:30
Adi Shankaracharya Jayanti 2022: आद्य शंकराचार्यांच्या जीवनचरित्राचा घेतलेला थोडक्यात आढावा...
सातव्या शतकात हिंदू धर्माची पुनःस्थापना करणारे, हिंदू धर्माच्या पुनरुत्थानाचे जनक मानल्या जाणाऱ्या आद्य शंकराचार्यांची जयंती आहे. वैशाख शुद्ध पंचमीला आद्य शंकराचार्यांचा जन्म झाला. यंदाच्या वर्षी ०६ मे २०२२ रोजी श्री आद्य शंकराचार्य जयंती साजरी केली जात आहे. अद्वैताचा पुरस्कार आद्य शंकराचार्यांनी सुरू केला. अखिल भारताच्या एकात्मतेची मूर्ती घडविणाऱ्या अद्वैतवादी वैदिक तत्वज्ञानी शंकराचार्यांनी भरतखंडाच्या चारही कोपऱ्यात वैदिक धर्माची ध्वजा रोवली. वेदांच्या आधाराने आणि वेदांतसुत्रांच्या पायावर त्यांनी आपले नवीन तत्वज्ञान उपदेशिले. भारतात धार्मिक तटबंदी उभारण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी करून दाखविले, असे सांगितले जाते. जयंतीनिमित्त आद्य शंकराचार्यांच्या जीवनचरित्राचा घेतलेला अगदी थोडक्यात आढावा... (Birth Anniversary Adi Shankaracharya Jayanti 2022)
अलौकिक बुद्धिमत्तेने भारत खंडाला शंकराचार्यांनी हादरवून सोडले. वैदिक संस्कृतीमधून विकसित होत गेलेला व कालानुसार बदलत गेलेलाच धर्म पुढे हिंदू धर्म म्हणून ओळखला जाऊ लागला, असे मत सर्वसामान्यपणे मांडले जाते. तत्कालीन भारतातील छोटीछोटी राज्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न करीत होती. एकूण समाजातील सुसंवाद नाहीसा होऊन तो अधिकाधिक विघटित होऊ लागला. त्यांमध्ये सलोखा निर्माण करण्याचे महान कार्य करणारी अद्वितीय कर्मयोगी विभूती म्हणजे आद्य शंकराचार्य. वैदिक धर्माची प्रतिष्ठापना भक्कम पायावर पुन्हा करत, वेद हे ईश्वरप्रणीत आहेत, असे ते म्हणत असत. वेदांताचे तत्त्वस्वरूप समजावून देणाऱ्या तत्त्ववेत्त्यांमध्ये आद्य शंकराचार्यांची योग्यता सर्वश्रेष्ठ दर्जाची मानली जाते.
शंकाराचार्यांचे पूर्वायुष्य
केरळमधील मलबार प्रांतात पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या कालडी ग्रामी इ.स. ७८८ मध्ये शंकराचार्यांचा जन्म झाला. लहानपणीच वडील गेल्याने त्यांची जोपासना त्यांच्या मातेने केली. त्यांच्या वडिलांचे नाव शिवगुरू होते. अध्ययन व अध्यापन यांची एक उज्ज्वल परंपरा त्या घराण्यात चालत आलेली होती. शंकराचार्यांनी आठव्या वर्षी सर्व वेदांचे अध्ययन पूर्ण केले. आईकडून संन्यास घेण्याबद्दल परवानगी मिळवून ते घराबाहेर पडले. मातेवर त्यांचे अतोनात प्रेम होते.
जगद्गुरु शंकराचार्य
विंध्याद्रीच्या आसपास शंकराचार्यांची गोविंद पूज्यपादाचार्य यांच्याशी गाठ पडली. त्यांनी उपदेश करून शंकराचार्यांना संन्यासदीक्षा दिली. शंकराचार्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी सर्व शास्त्रात प्रावीण्य प्राप्त केले. त्यानंतर ते काशी येथे गेले. काशीच्या पंडितांशी धर्मचर्चेवर वाद-प्रतिवाद करून त्यांना आपल्या विद्वत्तेने प्रभावित केले. धर्मावरील वाद-प्रतिवादात ते जिंकले. त्यामुळे त्यांची महती, कीर्ती अतिशय वाढली. आद्य शंकराचार्य एक महान यती, ग्रंथकार, अद्वैत मताचे प्रचारक, स्तोत्रकार होते. या लोकोत्तर कृतीने शंकराचार्य हे जगद्गुरु ठरले.
भारतभ्रमण व चार पीठांची स्थापन
आद्य शंकराचार्य एक महान यती, ग्रंथकार, अद्वैत मताचे प्रचारक, स्तोत्रकार होते. या लोकोत्तर कृतीने शंकराचार्य हे जगद्गुरु ठरले. आद्य शंकराचार्यांनी दोन ते तीन वेळा संपूर्ण भारत पालथा घातला, असे म्हटले जाते. अनेकविध नगरांत आणि तीर्थक्षेत्री जाऊन वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी शंकराचार्यांनी त्यांच्या शिष्यांसह भारतभ्रमण केले. त्यांना अद्वैत तत्त्वज्ञानाची शिकवण दिली. त्यामुळे पाखंडी आणि वामाचारी संप्रदाय भंगले, अशी मान्यता आहे. आपल्या भारतभ्रमणात शंकराचार्यांनी गोवर्धन पीठ (ओडिसा), शृंगेरी पीठ (दक्षिण देश), शारदापीठ (द्वारका) आणि ज्योतिर्मठ (हिमालय) अशा चार दिशांना चार पीठांची स्थापना करून शिष्यांना पीठाधिपती म्हणून नेमले.
एकेश्वरवादाचा पुरस्कार
आद्य शंकराचार्यांनी एकेश्वरवादाचा पुरस्कार करत, त्याचा अधिक पुरस्कार केला. तणावमुक्त अवस्थेत जगा, पण त्यासाठी मन निर्मळ व निर्भय ठेवा, असे ते नेहमी सांगत. आद्य शंकराचार्यांनी आखून दिलेल्या कार्यपद्धतीनुसारच आजही चारही धर्मपीठांची कामे सुरळीत सुरू आहेत. आद्य शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयींवर म्हणजेच ब्रह्मसूत्र, उपनिषदे, भगवद्गीता आणि अन्य विषयांवर अनेक भाष्यग्रंथ लिहिले आहेत. त्यांनी तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ, संस्कृत स्तोत्रे, आणि तत्सम काव्ये रचली आहेत. चराचरात परमेश्वर सामावलेला असून, त्याचा आदर करायला हवा, अशी त्यांची शिकवण असे.
आचार्यं देवोः भव
आद्य शंकराचार्यांनी प्रचंड कार्य अवघ्या बत्तीस वर्षांच्या आयुष्यात केले. त्यांच्या विचारधारेचा प्रभाव आधुनिक भारतातदेखील तेवढ्याच तेजाने जाणवत आहे. ते थोर तत्वज्ञ, महापंडित, प्रतिभावान कवी, समाजसुधारकांतील अग्रणी आणि चतुर संघटक होते. आचार्यांनी आपले कार्य बौद्धिक, तात्विक आणि धार्मिक या तिन्ही स्तरांवर करून निरनिराळ्या विचारधारांत एकसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला. लोकजीवनात रूढ असलेले पंथ-भेद नष्ट करून सर्वांना ज्ञानाने मोक्ष मिळू शकतो हे पटवून दिले आणि ज्ञानोपासनेचा मार्ग दाखवून दिला. कर्मसंन्सासपूर्वक ज्ञाननिष्ठा हे गीतेचे सार सांगणाऱ्या आचार्यांना त्यांच्या प्रत्यक्ष कार्यामुळे भारावलेल्या भक्तांनी ‘अद्वितीय कर्मयोगी’ अशा शब्दांत संबोधिले. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या ग्रंथात शंकराचार्यांबद्दल अत्यंत गौरवपूर्ण उद्गार काढले आहेत.