३० वर्षांनी अद्भूत योग: जन्माष्टमीचे व्रत करा, तीनपट लाभ मिळवा; बाळकृष्णाची होईल अपार कृपा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 04:24 PM2023-09-04T16:24:08+5:302023-09-04T16:24:55+5:30

Shri Krishna Janmashtami 2023: यंदाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला दुर्मिळ अद्भूत योग जुळून येत आहेत. व्रताचरणाचे शुभ-पुण्य मिळू शकते, असे म्हटले जात आहे.

after 30 years auspicious yoga on shri krishna janmashtami 2023 know about vrat vidhi benefits and significance of jayanti yoga | ३० वर्षांनी अद्भूत योग: जन्माष्टमीचे व्रत करा, तीनपट लाभ मिळवा; बाळकृष्णाची होईल अपार कृपा

३० वर्षांनी अद्भूत योग: जन्माष्टमीचे व्रत करा, तीनपट लाभ मिळवा; बाळकृष्णाची होईल अपार कृपा

googlenewsNext

Shri Krishna Janmashtami 2023: श्रावण पौर्णिमा, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा साजरी झाल्यानंतर आता श्रावण अष्टमीला श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते. संपूर्ण देशभरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्ण हा श्रीविष्णूंचा आठवा अवतार मानला जातो. यंदाच्या वर्षी ०६ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीकृष्ण जयंती आहे. यावर्षी श्रीकृष्ण जयंतीला अद्भूत योग जुळून येत असून, या दिवशी गोपाळकृष्णाचे व्रत केल्यास तीनपट पुण्य मिळू शकते, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...

बाललीला, नीती, मुसद्देगिरी, राजकारण, भगवद्गीता, मित्रत्व, प्रेम, त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णांचे नेहमीच स्मरण केले जाते. महाभारतकालीन अनेक गोष्टी, संदर्भ, व्यक्ती, प्रसंग, घटनांवर आजच्या काळातही संशोधन केले जात आहे. श्रीकृष्णांचे आचार, विचार, तत्त्वज्ञान हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिलेला आहे. श्रीकृष्णांचा जन्माष्टमी उत्सव भारतभर साजरा केला जातो. श्रीकृष्ण जयंती जन्माष्टमी, गोकुळाष्टमी आदी विविध नावांनी देशाच्या विविध भागात अनेकविध पद्धतीने साजरी केली जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी गोकुळाष्टमी विशेष साजरी केली जाते. या दिवशी अनेकांच्या घरी गोकुळ, वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा करतात. वृंदावनात दोलोत्सव असतो. या दिवशी रासलीलांचे सादरीकरण केले जाते. 

Janmashtami 2023: केवळ श्रीकृष्णाचा जन्मदिवस नाही तर जन्माष्टमी हा ज्ञानेश्वर माउलींचाही जन्मदिवस! 

श्रावण वद्य अष्टमी प्रारंभ: ०६ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ०३ वाजून ३७ मिनिटे.

श्रावण वद्य अष्टमी सांगता: ०७ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ०१ वाजून १६ मिनिटे.

श्रीकृष्ण जन्मोत्सव: ०६ सप्टेंबर २०२३ रोजी रात्रौ १२ वाजता. (जयंती योग)

रोहिणी नक्षत्र प्रारंभ: ०६ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०९ वाजून १९ मिनिटे.

रोहिणी नक्षत्र समाप्ती: ०७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजून २४ मिनिटे. 

श्रीकृष्ण जन्माष्टमीला अद्भूत योग

यंदाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला अनेक अद्भूत योग तयार होत आहेत. ०६ सप्टेंबर रोजी दिवसभर सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. सर्वार्थ सिद्धी योगात चंद्र वृषभ राशीत आणि रोहिणी नक्षत्रात असताना एक विशेष योग जुळून येत आहे. तसेच ०६ सप्टेंबर रोजी श्रावण कृष्ण पक्ष, मध्यरात्री अष्टमी तिथी आहे. जेव्हा जन्माष्टमी बुधवार किंवा सोमवारी येते तेव्हा ती खूप शुभ मानली जाते. यावेळी ०६ सप्टेंबर रोजी एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहे. जेव्हा असा योग जुळून येतो, तेव्हा त्याला जयंती योग म्हटले जाते. 

Janmashtami 2023: वैवाहिक जीवनासंबंधित काहीही अडचणी असतील तर जन्माष्टमीला करा 'हे' खास उपाय!

श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताचरणाचे लाभच लाभ

ज्योतिष शास्त्रानुसार, श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत आणि जयंती योगात श्रीकृष्ण पूजन केल्यास व्यक्तीला तीनपट लाभ मिळू शकतात. तसेच या योगात जन्माष्टमीचे व्रत करणार्‍याला वैकुंठधामाची प्राप्ती होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. जयंती योगामध्ये केलेले व्रताचरण पितरांना मुक्ती देणारे ठरते, अशी मान्यता आहे. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून काही मिठाई वाटावी. यासोबतच अन्नदान करावे, असे केल्याने जन्माष्टमीचे पुण्य प्राप्त होते, असे सांगितले जाते. 

श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत कसे करावे?

जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून करावे. मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करावा. यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. यानंतर सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करावी. धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. श्रीकृष्णाची आरती करावी. पूजा करून पुरुषसूक्त, विष्णूसूक्ताचे स्तवन करावे. वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, पुराण, इतिहासातील निरनिराळ्या सत्कथा ऐकत रात्री जागरण करावे. गोकुळातील कृष्णजन्माच्या लीला श्रवण करावे. यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा.  

अशी करा जन्माष्टमी व्रताची सांगता

जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी. या दिवशी पंचोपचार करून उत्तरपूजा करावी. बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा. याच दिवशी काला करावा. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजे काला. हा कृष्णाला फार प्रिय होता. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत, असे मानले जाते. देशभरात प्रांताप्रमाणे व्रचारणाची पद्धत वेगवेगळी असू शकते. आपापल्या पद्धतींनुसार व्रताचरण करावे, असे सांगितले जाते.
 

Web Title: after 30 years auspicious yoga on shri krishna janmashtami 2023 know about vrat vidhi benefits and significance of jayanti yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.