दहा वर्षांनी दोनच शब्द बोलायची संधी मिळाली, तर तुम्ही कोणते शब्द बोलाल? वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 03:21 PM2022-01-10T15:21:15+5:302022-01-10T15:21:33+5:30

दोष बघत राहाल तर दोषच दिसतील, आनंद शोधायचा ठरवला तर आनंदच मिळेल!

After ten years, if you get a chance to say only two words, what words would you say? Read this story! | दहा वर्षांनी दोनच शब्द बोलायची संधी मिळाली, तर तुम्ही कोणते शब्द बोलाल? वाचा ही गोष्ट!

दहा वर्षांनी दोनच शब्द बोलायची संधी मिळाली, तर तुम्ही कोणते शब्द बोलाल? वाचा ही गोष्ट!

googlenewsNext

आपल्या सर्वांना एक वाईट खोड असते, ती म्हणजे सतत दुसऱ्यांमधले दोष शोधण्याची. ते म्हणतात ना, दुसऱ्यांच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही! त्यामुळे आपल्याला सगळीकडे फक्त वाईटच घडतेय की काय असा समज निर्माण होतो. याउलट, आपण जर चांगल्या गोष्टी बघायला शिकलो तर आपल्याला हे जग देखील चांगलेच दिसू लागेल. त्यासाठी ही छोटीशी गोष्ट नक्की वाचा. 

एका आश्रमात गुरुकुल पद्धतीप्रमाणे शेकडो विद्यार्थी राहत होते. त्या गुरुकुलचा नियम होता, की तिथे कोणालाही बोलायची मुभा नव्हती. सर्वांनी मौन पाळायचे. ज्या विद्यार्थ्याची अध्ययनाची दहा वर्षे पूर्ण होत त्याला दोन शब्द बोलण्याची मुभा मिळत असे. त्यानुसार एका विद्यार्थ्याची दहा वर्षे पूर्ण झाली. गुरूंनी त्याला दोन शब्द बोलण्याची संधी दिली. तो म्हणाला 'अन्न वाईट' गुरुजींनी मान डोलावली. त्यानंतर दहा वर्षे गेली. त्याला पुन्हा बोलण्याची संधी मिळाली. यावेळेस तो म्हणाला, 'अंथरूण वाईट'. आणखी दहा वर्षांनी त्याला बोलायची संधी मिळाली तेव्हा म्हणाला 'जमणार नाही' गुरुजी हसले आणि त्यांनी त्या शिष्याला गुरुकुल सोडून जाण्याची परवानगी दिली. 

या गोष्टीतला गमतीशीर मुद्दा हा की दहा वर्षांनी बोलायची संधी मिळून शिष्याने तक्रारीचा सूर लावला. त्या तक्रारीत पुढची दहा वर्षे घालवली आणि आणखी दहा वर्षांनी त्याने तिथली व्यवस्था चांगली नाही म्हणत आश्रम सोडून जाण्याची परवानगी मागितली. याऐवजी या विद्यार्थ्याने जर अन्न वाईट न म्हणता पाककला शिकून घेतली असती आणि सहकाऱ्यांना घेऊन न बोलता जेवणात बदल केले असते, तर त्याचा पहिला प्रश्न सुटला असता. अंथरुणाबद्दल तक्रार करण्यापेक्षा त्यावर उपाय शोधला असता तर सर्वांसाठी झोपेची चांगली व्यवस्था झाली असती. सतत तक्रार करत राहिल्यामुळे त्याला त्या आश्रमात शिकण्याची संधी असूनही त्याने आश्रम सोडला, कारण त्याला तिथे काहीच चांगले दिसले नाही. 

आपणही थोड्या फार प्रमाणात याच चुका करतो. परंतु या चुका वेळीच सुधारल्या, तर आपले आयुष्य आनंदाने बहरेलच पण कदाचित आपल्या प्रयत्नांनी इतरांच्याही आयुष्यात आनंद फुलेल. 

Web Title: After ten years, if you get a chance to say only two words, what words would you say? Read this story!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.