आनंदाला छळणारी पीडा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 08:02 AM2024-07-14T08:02:07+5:302024-07-14T08:02:16+5:30
आनंद हा निरंतर उपलब्ध आहे; आपण मात्र त्याचे काळाप्रमाणे तुकडे करतो.
खरे तर आनंद ही मनुष्यात फुलाप्रमाणे उमलणारी सहज प्रक्रिया आहे. असे असूनही मनुष्य आनंद शोधण्याच्या नादात तणावग्रस्त होऊन बसतो. आपण महिनाभर काम करून श्रमाचा मोबदला मिळवून आनंदी होणारे आहोत. हे श्रम अधिकार जन्माला घालतात. जिथे अधिकार जन्माला येतो, तिथे आनंदाचा केवळ आभास वाट्याला येतो. आभासाचे वय शाश्वताकडे न सरकता क्षणभंगुराकडे सरकते. झाडाची सावली आणि शीतलता तशी नित्यत्वानेच उपलब्ध असते; आपण मात्र उन्हात राबराब राबून त्यानंतरच गार वाऱ्याचा आनंद घेतो. आनंद हा निरंतर उपलब्ध आहे; आपण मात्र त्याचे काळाप्रमाणे तुकडे करतो. 'अमुक केल्याशिवाय तमुक होणारच नाही' ही भाषा आपल्याला तणावात ढकलते. तणाव जन्माला येण्याचे मुख्य कारण हेच आहे, की आपण आनंदाऐवजी त्याच्या कारणांनी आनंदी होतो. कारणं आली की त्यांचा काळ जन्माला येतो. एकदा आनंद काळात ढकलला, की त्यानंतर तो आपोआपच तणावात बदलतो. इथे प्रत्येक महत्वाची गोष्ट तिच्या गतीत आनंद देणारी आहे. या गतीवर आपल्या गतीचे टार्गेट लादले की आनंद पीडेत बदलतो.
आपला श्वास एका मिनिटात पंधरा फेऱ्या घालतो. या फेऱ्या कमीअधिक झाल्या तर त्यातून लगेच दुःख, रोग जन्माला येतो. आपल्या नाडीच्या ठोक्यांच्या गतीवर आपण आपली गती लादत नाही. जिथे नैसर्गिक गती आपोआप राखली जाते आहे, तिथे अस्तिवाचा आनंद प्रसन्नतेचा शिडकावा करतो. जिथे या नैसर्गिक गतीवर माणसाची कृत्रिम गती स्वार होते, तिथे मात्र हा बेलगाम घोडा आपल्याला खड्ड्यात घातल्याशिवाय राहात नाही. कोणत्याही विषयातली 'विश्रांती' हीच त्या विषयातून आनंद जन्माला घालत असते. आपण घाई, अज्ञान, स्पर्धा, नैपुण्य, ध्येय अशा असंख्य कारणांनी या विश्रांतीला सतत छेडत राहतो; परिणामी आनंदाचे सगळे उद्योग घोर पीडेत बदलतात. इथे कोणतेही पशुपक्षी स्वतःच्या आनंदाला कधीही छेडत नाहीत. आपण मात्र आपल्या मानगुटीवर बसलेला काळ आनंदाच्या मानगुटीवर बसवतो. यशाच्या चुकीच्या संकल्पना डोक्यावर बसल्याने ही 'आनंदाला छळणारी पीडा' संपायचे नावच घेत नाही. याचा शेवटचा परिणाम असा होतो, की आपला आनंदावरचा विश्वास कायमचा उडून जातो, आणि काळातून जन्माला आलेला मृत्यू नामक भ्रम शाश्वत होऊन बसतो.