Akshaya tritiya 2021 : अक्षय्यतृतीयेच्या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असे म्हणतात, त्यासंदर्भात दोन पौराणिक कथा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 11:16 AM2021-05-05T11:16:58+5:302021-05-05T11:17:39+5:30
Akshaya tritiya 2021 : अक्षय्यतृतीयेच्या अलौकीक महिमा सांगणाऱ्या या दोन कथा!
वैशाख शुक्ल तृतीयेला 'अक्षय्यतृतीया' असे म्हणतात. हा दिवस सर्व कार्यासाठी शुभ आणि पुण्यप्रद मानला जातो. या दिवशी केलेले दान अक्षय्य फल देणारे असते. अशी श्रद्धा पुरातन काळापासून आहे. अक्षय्यतृतीया हा काहींच्या मते कृतयुगाचा प्रारंभ दिन आहे. तर काहींच्या मते तो त्रेतायुगाचा प्रारंभ दिन आहे. यासंबंधी असा मतभेद असला तरीही आपण त्रेतायुगाचा प्रारंभ दिन या तिथीला झाला असे मानतो. या संदर्भात अनेक कथा प्राचीन ग्रांथांमधून आढळतात. त्यातील प्रमुख दोन कथा पुढीलप्रमाणे आहेत-
देवधर्म मानणारा आणि धर्माचरणाने वागणारा एक व्यापारी होता. व्यापारातील चढ-उतारात त्याला आर्थिक फटका बसला आणि दारिद्र्य आले. वैशाख शुक्ल तृतीया बुधवारी आली असेल आणि त्यातही रोहिणीनक्षत्रयुक्त असेल तर तो दिवस परमपावन असतो, हे त्याला माहित होते. त्याप्रमाणे योग असलेली अक्षय्यतृतीया आल्यावर या व्रताचे सर्व विधी श्रद्धापूर्वक केले. त्यामुळे पुढल्या जन्मी तो कुशावर्ती नगरीचा राजा झाला. त्याने स्वत: आणि त्याच्या प्रजेने अनेक तऱ्हेचे सुखोपभोग भोगले, तरीही त्याचे पुण्य अक्षय्य राहिले.
दुसरी कथा अशी-
धर्मराजाने अश्वमेध यज्ञ पूर्ण केला त्यावेळी यज्ञसमाप्तीच्या वेळी एक मुंगूस यज्ञमंडपात आले. त्याच्या शरीराचा अर्धा भाग सोन्याचा होता. यज्ञमंडपातील वेदीवर ते मुंगूस लोळू लागले. आपले उरलेले अर्धे अंग यज्ञाच्या पवित्र स्थळामुळे सोन्याचे होईल असा त्याचा समज होता. पण तसे झाले नाही. धर्मराजाने `तू असे का लोळतो आहेस?' याची चौकशी केली, तेव्हा मुंगूस म्हणाले, `धर्मराजा, अक्षय्यतृतीयेच्या दिवशी दान केलेल्या गव्हाच्या दाण्याइतकेही पुण्य हा यज्ञ केल्याने तुला लाभलेले नाही. माझे अर्धे शरीर जे सोन्याचे झाले, ते एका सत्यवादी ब्राह्मणाने केलेल्या पुण्यामुळे झाले.'
धर्मराजाने कुतूहलाने त्याला 'ब्राह्मणाने कोणते पुण्य केले?' असे विचारल्यावर मुंगूस म्हणाले, `तो ब्राह्मण व्यवसाय उद्योग करून जेमतेम आपला चरितार्थ चालवत असे. एका अक्षय्यतृतीयेच्या दिवशी माध्यान्ही तो जेवायला बसणार इतक्यात प्रत्यक्ष भगवंत ब्राह्मणरूपाने त्याच्याकडे येऊन माधुकरी मागू लागला. घरात जे अन्न शिजवले होते ते सर्व अन्न त्या ब्राह्मणाने अतिथीरूपी भगवंताला मोठ्या प्रेमाने दिले. परिणामी त्या ब्राह्मणासह त्याच्या घरातील सगळेजण उपाशी राहिले. अतिथीरूपी देवाने जे अन्न भक्षण केले त्याची थोडीशी शिते, थोडासा अंश जमिनीवर सांडला होता, तो मी खाल्ला. त्यामुळे माझे शरीर अर्धे सोन्याचे झाले. दुसरा अर्धा भागही सोन्याचा व्हावा म्हणून मी इथे आलो, या यज्ञवेदीवर लोळण घेतली. पण माझ्या शरीराचा एक केसही सोन्याचा झाला नाही. म्हणून म्हणतो, या केलेल्या यज्ञापासून तुला थोडेदेखील पुण्य प्राप्त झालेले नाही.' अक्षय्यतृतीयेच्या व्रताचा महिमा असा अलौकिक आहे.