Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सासरी परत चाललेल्या चैत्रगौरीची 'अशी' करा पाठवणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 10:21 AM2022-05-03T10:21:30+5:302022-05-03T10:22:25+5:30
Akshaya Tritiya 2022: देवीची जमेल तेवढी सेवा करून आपल्या चुका पदरात घे अशी तिला विनंती करावी आणि तिचे कृपाछत्र कायम डोक्यावर राहावे असा आशीर्वाद मागावा.
आज अक्षय्य तृतीया. साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. आजच्या दिवशी सोने खरेदी केली जाते, दानधर्म केला जातो. तसेच चैत्रगौरीला माहेरी बोलवून, तिचा पाहुणचार करून आज तिला निरोप देण्याची, पाठ्वणीची वेळ आली आहे. काय आहे हा सोहळा? कसा केला जातो? ते पाहू...
महाराष्ट्रात शारदीय नवरात्रीप्रमाणे चैत्र नवरात्रदेखील साजरी होते. चैत्र शुक्ल तृतीयेला घरातील सुवासिनी देवघरातल्या अन्नपूर्णेची गौर म्हणून वेगळे आसन देऊन स्थापना करतात व महिनाभर तिची पूजा करतात. त्यानिमित्ताने सोयीनुसार चैत्रातील कुठल्याही मंगळवारी अथवा शुक्रवारी हळदीकुंकू समारंभ करतात. त्यावेळी घरी आलेल्या लेकी सुनांचे पाय धुतात. त्यांच्या हातांना थंडाव्याचे प्रतीक म्हणून चंदनाचा लेप लावून मग त्यावरून शिंपल्याचा वरचा शिरांचा भाग फिरवतात. यावेळी भिजवलेल्या हरभऱ्यांनी फळासह ओटी भरतात. वाटली डाळ आणि कैरीचे पन्हे हा या समारंभातील आतिथ्याचा एक भाग असतो. यावेळी 'गौरीचे माहेर' नावाचे एक गाणे आरतीत म्हटले जाते. चैत्रात गौरी तिच्या माहेरी येते. सगळे कौतुकसोहळे करवून घेते आणि अक्षय्यतृतीयेला परत सासरी जाते, असे मानून सारे विधी केले जातात.
वरील माहिती वाचून तुम्ही विचार करत असाल की आपल्याला यापैकी काहीच करता आले नाही. तर काळजी करू नका. आज चैत्रगौरीची पाठवणी करताना देवीची खणा नारळाने ओटी भरा आणि नंतर ती ओटी एखाद्या सुवासिनीला देवीचा प्रसाद म्हणून द्या. त्या ओटीतल्या चार अक्षता आपल्या तिजोरीत, धनधान्यात टाकायला विसरू नका. तसेच देवीला नैवेद्य म्हणून कैरीची डाळ आणि पन्हे यांचा नैवेद्य दाखवा. शक्य असेल तर सायंकाळी पाच सुवासिनींना बोलावून छोटासा हळद कुंकू समारंभ करा आणि त्यांनाही डाळ, पन्हे यांचा नैवेद्य द्या.
लक्ष्मीची पावले : ज्याप्रमाणे आपण भाद्रपदात गौरी आगमनाच्या वेळी दारातून आत येणारी लक्ष्मीची पावले कुंकवाने रेखाटतो आणि निर्गमनाच्या वेळी घरातून बाहेरच्या दिशेने रेखाटतो, त्याप्रमाणे अक्षय्य तृतीयेलासुद्धा देवीच्या निर्गमनाची पावले बाहेरच्या दिशेने रेखाटावीत. घरात शक्य नसेल तर निदान दारात चार पावलं काढावीत आणि देवीला 'पुनरागमनायच' म्हणजेच पुन्हा ये असे म्हणत निरोप द्यावा.
देवीचे आपल्याकडे येणे, पाहुणचार घेणे आणि तृप्त मनाने आशीर्वाद देऊन जाणे ही कल्पनाच आनंददायी आहे. त्यामुळे जमेल तेवढी सेवा तिला अर्पण करून आपल्या चुका पदरात घे अशी देवीला विनंती करावी आणि तिचे कृपाछत्र कायम डोक्यावर राहावे असा आशीर्वाद मागावा.