Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला राशीनुसार खरेदी व दान करा आणि क्षय न पावणाऱ्या धन-संपत्ती-ऐश्वर्याचा लाभ मिळवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 05:18 PM2023-04-21T17:18:24+5:302023-04-21T17:19:00+5:30
Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला केवळ सोने खरेदी नाही, तर तुमच्या राशीनुसार दिलेल्या धातूची खरेदी ठरेल अधिक लाभदायक!
हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी सोने, चांदी इत्यादी धातू खरेदी करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीला धातूच्या रूपात घरी आणले जाते. सोने अर्थात समृद्धी, तिचा आपल्या घरात कायम वास असावा आणि तिचा कधीच क्षय होऊ नये, म्हणून या दिवशी सोने खरेदीची प्रथा पडली. मात्र ज्योतिष शास्त्र सांगते, सगळ्याच राशींना सोने लाभदायक असते असे नाही, म्हणून आपल्या राशीला मानवेल अशा धातूची खरेदी करावी. आपल्या क्षमतेनुसार सोने, चांदी किंवा इतर दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते. यानिमित्ताने राशीनुसार धातूची खरेदी केल्यास ते तुमचे नशीब उजळू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तीसाठी कोणता धातू उत्तम राहील.
मेष: मेष राशीचे लोक या दिवशी तांबे किंवा सोने खरेदी करू शकतात. या राशीचा स्वामी मंगळ ग्रहासाठी शुभ धातू तांबे आहे.
वृषभ : या राशीचा स्वामी ग्रह शुक्र असल्याने त्यांनी या दिवशी चांदीची खरेदी करावी. शुक्रासाठी हिरा मुख्य मानला जातो.
मिथुन: ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या लोकांचा अधिपती ग्रह बुध आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पितळ्याची भांडी किंवा दागिने खरेदी करावेत.
कर्क : कर्क राशीचे लोक या दिवशी चांदी खरेदी करू शकतात. या राशीचा अधिपती ग्रह चंद्र असल्याने चांदी शुभ सिद्ध होईल.
सिंह: या राशींचा स्वामी सूर्य असल्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तांबे किंवा सोने खरेदी करता येईल.
कन्या : या राशीचा अधिपती ग्रह बुध असून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कांस्य खरेदी करणे शुभ राहील.
तूळ : अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी तूळ राशीच्या लोकांना चांदीची खरेदी करता येईल. या राशीचा शासक ग्रह शुक्र आहे.
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी तांब्याची खरेदी करणे चांगले राहील. त्यांचा अधिपती ग्रह मंगळ आहे.
धनु: या राशीचा स्वामी ग्रह गुरु गुरु असल्यामुळे धनु राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पितळ किंवा सोने खरेदी करणे चांगले राहील.
मकर: मकर राशीचे लोक अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लोखंडी भांडी खरेदी करावे. कारण या राशीचा अधिपती शनिदेव आहे. त्यांना लोखंड प्रिय आहे.
कुंभ : कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनिदेव असल्याने त्यांनीही लोखंडी भांडी खरेदी करावी.
मीन: मीन राशीचा शासक ग्रह गुरू आहे. हे लोक अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पितळ खरेदी करू शकतात. त्यांना हवे असल्यास ते सोनेही खरेदी करू शकतात.
वरील गोष्टी खरेदीच्या दृष्टीने तर सुचवल्या आहेतच, शिवाय त्याचे दान केले तर चौपट पुण्य लाभले आणि धन संपत्ती अक्षय्य राहते असे धर्मशास्त्रात म्हटले आहे.