Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 01:51 PM2024-05-03T13:51:54+5:302024-05-03T13:52:32+5:30
Akshaya Tritiya 2024: आजही अनेक घरात अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खाण्याची प्रथा पाळली जाते, त्यामागे धार्मिक कारण आहे की शास्त्रीय ते जाणून घेऊ.
यंदा १० मे रोजी अक्षय्य तृतीया आहे. या दिवशी चैत्र गौरीची पाठवणी केली जाते आणि तिला आमरस पुरीचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच या दिवशी अनेक घरात सीझनचा पहिला आंबा खाल्ला जातो. वाचून आश्चर्य वाटलं ना? हो! ही प्रथा पाळणारे लोक आपल्या आजूबाजूला आहेत. हा लिखित नियम तर नाही, मग अलिखित नियम कधी आणि कशामुळे तयार झाला? त्यामागे शास्त्रीय कारण आहे की धार्मिक कारण आहे त्याचा अंदाज घेऊ.
आंब्याची परिपक्वता :
सद्यस्थितीत वाढत्या चढाओढीमुळे डिसेम्बरपासूनच आंब्याच्या पेट्या बाजारात दिसायला लागतात. पाडव्याला आमरस पुरीचे जेवण करता यावे म्हणून लोक आंब्याचे चढे भाव देऊन आमरस ओरपतात! मात्र आंब्याला परिपक्वता येण्याचा काळ हा वैशाखातला! झाडावर पूर्ण वाढ झालेली कैरी अलगद काढून ती पेटीत चारा घालून परिपक्व केली जाते. मग फळ पूर्ण तयार होते आणि खाण्यास योग्य होते. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैशाख उजाडतो आणि वैशाख तृतीयेला अक्षय्य तृतीया असल्याने त्या दिवशी आंबा देवासमोर ठेवून मग कुटुंबात खाल्ला जातो.
अक्षय्य तृतीयेला देवाला आंब्याचा नैवेद्य :
जे मिळते ते देवाच्या कृपेने मिळते ही आपली भावना असल्यामुळे नवीन वस्तू वापरण्याआधी (चपला वगळता) आपण देवासमोर ठेवतो. देवाची दृष्टी पडावी आणि ती वस्तू आपल्याला लाभावी, वृद्धिंगत व्हावी एवढाच हेतू असतो. अक्षय्य तृतीया आपण साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानतो. त्यामुळे नुकताच घरी आणलेला आंबा घरी आणल्यावर आधी देवासमोर ठेवून मग घरच्यांबरोबर आमरसाचा आस्वाद घेतला जातो.
पितरांना नैवेद्य :
अक्षय्य तृतीयेला पितरांच्या नावे दान धर्म करण्याची प्रथा आहे. त्यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळून त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभते अशी श्रद्धा आहे. थोडक्यात सुख-दुःखाच्या क्षणी त्यांचा आठव करून, त्यांच्या कृपेने आपण आहोत याची जाणीव ठेवणे हा उद्देश होतो. ग्रामीण भागात आजही आठवणीने पितरांच्या नावे आंब्याचे दान केले जाते.
आंब्याची नैसर्गिक वाढ :
नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याचा आजूबाजूला घमघमाट सुटतो. आंब्यात गोडवा कसा येतो तर कोय तयार होण्यापूर्वी असलेलीची कैरी चवीला तुरट लागते. कोयीचे आवरण टणक व्हायला सुरुवात होते तेव्हा कैरीत आंबटपणा येतो व ती खाण्यायोग्य होते. नंतर त्यात पिष्टमय पदार्थ व मॅलिक ॲसिड तयार होते. आंबा काढणीला आल्यानंतर तो उतरवून पिकवायला ठेवला जातो त्यावेळी पिष्टमय पदार्थ आणि मॅलिक ॲसिडचे शर्करेत रूपांतर होत जाते हे रूपांतर ९८ टक्के झाल्यानंतर आंब्यात पूर्णपणे गोडवा येतो व रस तयार होतो. त्यात गोडवा आला की साल पिवळी दिसू लागते.
ही भौगोलिक, शास्त्रीय आणि धार्मिक कारणं पाहता अक्षय्य तृतीयेचा आणि आंब्याचा संबंध कसा जुळला हे लक्षात येते.