सर्वार्थाने भाग्योदयासाठी गुरुचरित्रातील 'हा' तोडगा ठरू शकतो प्रभावी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 04:04 PM2022-01-13T16:04:52+5:302022-01-13T16:05:11+5:30
गुरुचरित्र वाचताना अनेक नियमांचे पालन करावे लागते. म्हणून पुढील तोडगा त्या तुलनेत सोपा आहे, त्याचा अनुभव घ्यावा.
असंख्य प्रयत्न करूनही यश मिळत नसेल किंवा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असेल, तर लेखक अ.ल.भागवत यांनी `परम सुखाचे रहस्य' या पुस्तकात दिलेला प्रभावी तोडगा जरूर आजमावून बघा.
गुरुचरित्राचे सामर्थ्य अनेक भाविकांनी अनुभवले आहे. गुरुचरित्राचे भक्तिभावाने पारायण करणाऱ्या लोकांच्या अडचणी दूर झाल्याचेही आपण ऐकले असेल. परंतु गुरुभक्ती सोपी नाही. गुरुचरित्र वाचताना अनेक नियमांचे पालन करावे लागते. म्हणून पुढील तोडगा त्या तुलनेत सोपा आहे, त्याचा अनुभव घ्यावा.
सर्व रीतींनी भाग्योदय होण्यासाठी भाविकांनी पुढील तोडगा अवश्य करावा.
हा तोडगा एखाद्या गुरुवारपासून सुरू करावा. रोज सकाळी स्नान करून गुरुचरित्राची अवतर्णिका बावन्न दिवस वाचावी. सात आठ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही. अवतर्णिका मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने वाचावी. या बावन्न दिवसांत कांदा व लसूण खाऊ नये. शक्य तो हॉटेलमधील पदार्थ खाऊ नयेत. खाणावळीतही जेवू नये. या काळात आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. कोणावर रागवू नये. जागरणे करू नयेत. कामोत्तेजक सिनेमे पाहू नये, कादंबऱ्या वाचू नये.
रोज रात्री झोपण्याआधी 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' हा मंत्र १०८ वेळा जपावा. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आपला भाग्योदय होईल असा भाव ठेवावा. बावन्नाव्या दिवशी जेवणात काही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.
या बावन्न दिवसात येणाऱ्या गुरुवारी उपवास करावा. वरीलप्रमाणे तोडगा श्रद्धेने व भक्तिभावाने केल्यास भाग्योदय होण्यास वेळ लागणार नाही. आकस्मिक संकट आलेल्या व्यक्तींनी हा तोडगा अवश्य करून बघावा. त्यांना मोठी हिंमत येईल व शेवटी संकट निवारण होईल. आजारी माणसांसाठी हा तोडगा दुसऱ्यांनी करावा.