सगळी फुलं सकाळी उमलतात पण प्राजक्त रात्रीच का बहरतो माहितीय? वाचा ही आख्यायिका!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 01:37 PM2022-07-09T13:37:39+5:302022-07-09T13:37:56+5:30
प्राजक्ताच्या सुकोमल फुलांनी बहरण्यासाठी रात्रीची वेळ का निवडली असावी? चला जाणून घेऊ!
प्राजक्ताचा सुगंध आवडत नाही असा विरळाच; मात्र त्याचा बहर येतो तो रात्री. त्यामागे दोन आख्यायिका सांगितल्या जातात. पैकी एक आख्यायिका सर्व प्रचलित आहे. ती म्हणजे समुद्र मंथनातुन प्राजक्त निघाल्याची. पण आज आपण दुसरी कथा जाणून घेणार आहोत, ज्यामुळे प्राजक्ताचा बहर रात्रीच का येतो, याचेही गुपित उलगडेल!
एक राजकुमारी होती. ती तेजोमय सूर्यावर आसक्त झाली होती. तिने आपल्या वडिलांसमोर सूर्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव मांडला. राजकुमारीच ती; तिचा हट्ट राजान पुरवला. सूर्य देवाला राजाने साकडं घातलं. सूर्य देवाने होकार दिला. त्याच्या होकाराला धरून लग्न ठरलं. पण लग्न घटिकेला सूर्य देव फिरकलेच नाहीत. विवाह वेदीवर अपमानित ती बालिका स्व-अग्नीत जळून खाक झाली. अन तेथे उगवलं हे स्वर्गीय अद्भुत रोपट प्राजक्ताचं...!
सुर्यावरील रागाने ती बाकीच्या फुलांसारखी सूर्योदयाला उमलत नाही. ना ही तिची फुलं कधी उमलून डोलतात. बस उमललेलं प्रत्येक फुल मूक अश्रु सारखं टप टप टप टप गळतं..!! तरीही नाजूक अस्तित्व जपत सुगंधाची पेरणी करतं! अशा या कहाणीवर सुगंधी प्राजक्ताच वर्णन करणारी एक कविता. कवींचे नाव माहीत नाही. पण ज्यांनी कोणी ही कविता लिहिली त्यात प्राजक्ताचे वर्म सामावले आहे.
प्राजक्त
पाच पाकळ्या प्राजक्ताच्या ;
सान चिमुकल्या ; फक्त पांढऱ्या.
देठ ही इवला; संथ केशरी,
देह हलका हवेहूनही ॥
उठण्या आधी भ्रमर पाखरे,
फुलण्या आधी प्रफ्फुल्ल किरणे,
लपून कोपरी फुलूनी गेला
लाजरा प्राजक्त केंव्हाचा ॥
नाही मादक; ना माळण्या,
स्पर्श कुणाचा कधी न भावला,
धरला हाती; त्वरित मळला,
सुकुमार प्राजक्त हा ॥
उपमा याला कवी मनाची,
आणिक कोवळ्या बाल प्रीतीची,
नाजूक हळू गुणगुणण्याची ,
नि:शब्द चांदण्या रातीची ॥
फुलण्यासाठी, फुलून गेला
लकेर मनीची खुलवीत गेला,
तरंग सुगंधी उठवीत गेला,
एकला प्राजक्त हा ॥
असं हे सुगंधाची लयलुट करणारं रोप लक्ष्मी मातेला प्रिय असल्याने, ज्यांच्या दाराशी प्राजक्त बहरतो, त्यांना आर्थिक अडचणी कधीच भेडसावत नाहीत असे म्हणतात.