तुळशीची पाने खुडताना 'हे' नियम कायम लक्षात ठेवा आणि त्यांचे पालन करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 02:35 PM2022-04-22T14:35:27+5:302022-04-22T14:36:09+5:30
तुळशीची पूजा आपण रोज करतोच, त्याबरोबरीने तिला आवडणाऱ्या व न आवडणाऱ्या गोष्टीही आपण जाणून घेतल्या पाहिजेत!
हिंदू धर्मात तुळशीला अधिक महत्त्व आहे. असे मानले जाते की ज्या घरात तुळशीची पूजा विधीपूर्वक केली जाते त्या घरात लक्ष्मी नेहमी वास करते. त्यामुळे तुळशीच्या रोपाला रोज सकाळी पाणी घालावे आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा. रोज देवपूजेत तुळशी दल श्रीकृष्णाला अर्पण करावे. तसे केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. शास्त्रात तुळशीच्या पूजेचे महत्त्व विस्ताराने सांगितले आहे. तसेच तुळशीची पाने खुडताना पाळावयाचे काही नियम सांगण्यात आले आहेत.
तुळस तोडताना या गोष्टी लक्षात ठेवा
>>शास्त्रानुसार रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत. कारण तो भगवान विष्णूंचा दिवस असतो व त्यांना तुळशी प्रिय असते. म्हणून तिला झालेला अपाय त्यांना सहन होत नाही.
>>रविवारीही तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये. असे मानले जाते की रविवारी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते. अशा स्थितीत पाणी दिल्यास तिचा उपवास मोडला जातो, अशी भावना आहे. शास्त्रीय दृष्ट्या पाहिले, तर तुळशीच्या रोपाला अतिरिक्त पाणी मानवत नाही. म्हणून एक दिवस आराम देऊन बाकी दिवसात आवश्यक तेवढेच पाणी घालावे.
>>विष्णु पुराणानुसार एकादशी, द्वादशी, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण या दिवशी तुळशीची पाने खुडू नयेत.
>>शास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळीही तुळशीची पाने तोडू नयेत. कारण तुळशी हे राधेचे रूप मानले जाते. असे म्हटले जाते की संध्याकाळी राधा श्रीकृष्णासोबत विहार करते. ज्या दारात तुळशीपाशी दिवा लावला असेल त्या घरात जाते. अशा वेळी तुळशी तोडून तिचा अपमान करू नये.
>>आंघोळ केल्याशिवाय तुळशीला कधीही स्पर्श करू नये. तिचे पावित्र्य जपले पाहिजे. तुळशीचे रोप कुंडीत तग धरत नसेल तर वाहत्या पाण्यात ते सोडून या. मात्र पाने नसलेली कोरडी तुळस घरात ठेवू नका. नकारात्मकता वाढते.
>>भगवान विष्णूच्या सर्व अवतारांना तुळशीची पाने अर्पण करावीत. परंतु श्रीगणेश आणि शंकराला अर्पण करू नये.