आजपासून तीन दिवस अंबाबाईचा किरणोत्सव; वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचा सुंदर आविष्कार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 11:48 AM2023-11-09T11:48:49+5:302023-11-09T11:51:04+5:30
श्री करवीर निवासिनी अंबाबाईचा किरणोत्सव ९, १०, ११ नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे; तो पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात.
श्री अंबाबाईचा वर्षातून दोनदा किरणोत्सव होतो. पाच दिवसांच्या या सोहळ्यात मावळतीची सूर्यकिरणे महाद्वारातून अंबाबाई मंदिरात प्रवेश करतात. प्रवासाचा एक एक टप्पा पार करत पहिल्या दिवशी किरणे अंबाबाईच्या मूर्तीचा चरणस्पर्श करतात, दुसऱ्यादिवशी कमरेपर्यंत व तिसऱ्या दिवशी किरणे चेहऱ्यावर येऊन किरणोत्सव पूर्ण होतो. यंदा हा किरणोत्सव तीन दिवसांचा असणार आहे.
अंबाबाई मंदिर संस्थानातून दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी मावळत्या सूर्याची किरणे देवीच्या चरणावर, दुसऱ्या दिवशी मध्य शरीरावर, तिसऱ्या दिवशी मुखकमलावर पडतात. फक्त याच दिवशी जगदंबेची सहावी आरती पार पडते.
सदर सोहळा अनुभवण्यासाठी देश विदेशातून मोठ्या संख्येने भाविक जमतात. संस्थानातर्फे गर्दीचे पूर्वनियोजन केले जाते. त्यामुळे किरणोत्सवाचा सोहळा सर्व भाविकांना पाहता येतो. एवढेच नाही, तर देवस्थापन व्यवस्थापन समितीने कोल्हापूर परिसरात बिंदू चौकात बसवलेल्या एल.इ. डी टीव्हीवर हा सोहळा थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. त्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थानातर्फे करण्यात आले आहे.