Ambedkar Jayanti 2023: 'हे' दहा उच्च विचार बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची आणखी वाढवतात!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 01:08 PM2023-04-13T13:08:26+5:302023-04-13T13:09:22+5:30
Ambedkar Jayanti 2023: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर भगवान बुद्धांच्या विचारांचा जबरदस्त पगडा होता; त्यांनी आपल्या जीवनात उतरवलेले हे दहा विचार अवश्य जाणून घ्या!
बदल घडावा असे प्रत्येकाला वाटते. पण बदलाची सुरुवात आपल्यापासून व्हावी, असे कोणाला वाटत नाही. जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान बुद्ध बदलाची सुरुवात स्वतःपासून करा, असे मार्गदर्शन करतात. स्वतः मध्ये बदल घडू लागले, की आपल्या सभोवताली बदल घडू लागल्याचे आपल्याला जाणवू लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील भगवान बुद्धांचे विचार अनुसरून प्रगतीचा मार्ग अवलंबिला आणि आपले ध्येय गाठले. जगाला प्रेरणा दिली. म्हणून आजही त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आणि त्यांचा आदर्श ठेवून अनेक तरुण स्वतःच्या आयुष्याला आकार देत आहेत. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. चला तर जाणून घेऊया, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भगवान बुद्धांच्या नेमक्या कोणत्या विचारांनी प्रेरणा दिली...
१. मनुष्य तेव्हाच स्वतःला बदलू शकतो, जेव्हा तो आपल्या दुर्गुणांचा त्याग करतो. त्यासाठी सर्वप्रथम आपल्या रागाचा त्याग करा. रागाच्या भरात मनुष्याला आपण काय वागतो, बोलतो आणि करतो याचे भान राहत नाही. म्हणून कितीही वाईट परिस्थिती आली, तरी मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
२. ज्याप्रमाणे स्वतःच्या हातून झालेल्या चुकांसाठी आपण स्वतःला माफ करतो, त्याप्रमाणे दुसऱ्यांकडून अनावधानाने घडलेल्या चुकांसाठी माफ करायला शिका. या जगात कोणीही परिपूर्ण नाही. त्यामुळे चुका घडणारच!
३. भांडणात दुसऱ्यांवर मात मिळवण्याऐवजी स्वतःच्या मनावर विजय प्राप्त करा. त्यामुळे मन दुसऱ्यांशी चढाओढ करण्यासाठी धडपडणार नाही. आणि इतरांशी झालेल्या वादात तुम्हाला हार पत्करावी लागली, तरी तुमची मनःशांती कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही.
४. जिथे अहिंसा असते, तिथेच मन:शांती लाभते.
५. आपला जीव जितका महत्त्वाचा आहे, तितकाच दुसऱ्याचा जीवही महत्त्वाचा आहे. त्याला मारण्याचे पातक करू नका. जगा आणि जगू द्या.
६. आपले ध्येय गाठण्यासाठी दुसऱ्यांच्या हक्कांची पायमल्ली करू नका. तुमच्या यशाचा मार्ग नैतिक असेल, तरच ध्येयाच्या शिखरावर पोहोचल्याचा तुम्हाला निर्भेळ आनंद प्राप्त होईल.
७. वाईटाला वाईटाने संपवू पहाल, तर वाईट वृत्ती अधिकच उफाळून येईल. रागाला रागाने नाही, तर प्रेमाने जिंकता येते, हेच वैश्विक सत्य आहे.
८. एकवेळ कोणाशी मैत्री झाली नाही तरी चालेल, पण कोणाशी शत्रुत्त्व अजिबात पत्करू नका. जमलेच तर जगन्मित्र होण्याचा प्रयत्न करा.
९. इच्छा, भूक आणि वृद्धत्त्व या तीन गोष्टींची पूर्तता करण्यासाठी मनुष्य आयुष्य खर्च करतो. कष्टाने या गोष्टी मिळाल्या नाहीत, तर वाम मार्ग पत्करण्याची मनुष्याची तयारी असते. त्यावेळेस आपली विवेकबुद्धी जागृत ठेवा आणि स्वतःला सतत सन्मार्गावर चालण्यास प्रवृत्त करा.
१०. मनुष्याने केवळ मनुष्याचा नाही, तर संपूर्ण जीव सृष्टीचा आदर केला पाहिजे. त्यांची काळजी घेतली पाहिजे. आपण निसर्ग सांभाळला, तरच निसर्ग आपल्याला सांभाळेल.