Amla Navami 2022 : आज आवळे खाऊन आवळा नवमी साजरी करा आणि वाचा त्याचं सांस्कृतिक, पौराणिक आणि आयुर्वेदिक महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 01:00 PM2022-11-02T13:00:05+5:302022-11-02T13:00:46+5:30

Amla Navami 2022 : आपले सण, उत्सव, परंपरा आपल्याला निसर्गाशी जोडणाऱ्या आहेत, त्याचं उदाहरण म्हणजे आजचा आवळे नवमी उत्सव. वाचा ही रोचक माहिती!

Amla Navami 2022 : Celebrate Amla Navami today by eating amla and read its cultural, mythological and Ayurvedic significance! | Amla Navami 2022 : आज आवळे खाऊन आवळा नवमी साजरी करा आणि वाचा त्याचं सांस्कृतिक, पौराणिक आणि आयुर्वेदिक महत्त्व!

Amla Navami 2022 : आज आवळे खाऊन आवळा नवमी साजरी करा आणि वाचा त्याचं सांस्कृतिक, पौराणिक आणि आयुर्वेदिक महत्त्व!

googlenewsNext

आज आवळे नवमी. कार्तिक शुक्ल नवमी ही तिथी आवळा नवमी म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकर आवळ्याच्या वृक्षावर येऊन वास करतात, म्हणून आवळ्याच्या वृक्षाची पूजा केली जाते. तसेच, पूजा झाल्यावर आवळ्याच्या वृक्षाच्या छायेत बसून सहपरिवार भोजन केले जाते. निसर्गाच्या जवळ नेणारा आणि अक्षय आनंद देणारा हा दिवस अक्षय नवमी म्हणूनही ओळखला जातो. 

मानसी भोसेकर लिहितात, आपलं  व निसर्गाचं नातं जन्मजन्मांतरीचं. निसर्ग आपल्याला भरभरून देतो, आपण ही त्याच्या या ऋणात राहतो. आपले बरेचसे सण हे निसर्गाच्या या ॠणांची आठवण ठेवून त्याची, झाडांची पूजा करून साजरे केले जातात. वटपौर्णिमा, तुळशीचं लग्न, आवळी अष्टमी हे त्यापैकी काही सण आहेत. प्रत्येक ॠतुत येणारी वेगवेगळी फळं त्या त्या वेळी खाणं आरोग्याला हितकारक असतं. झाडाला नविन फळं आली कि आपण प्रथम झाडाची पूजा करून ते फळ देवाला अर्पण करून देवाची प्रार्थना करून मग ती फळं प्रसाद म्हणून खातो. दिवाळी नंतर आवळ्याच्या झाडाला फळं येतात. आवळ्याच्या झाडाची पूजा करून, आवळ्यावर फुलवात लावून ओवाळायचे, नंतर आवळे खायचे ही प्रथा आपल्याकडे पूर्वीपासून चालत आली आहे.  

पूर्वी सगळे एकत्र जमून आवळीची पूजा करत असत. पूजा केल्यानंतर आवळे तोडायचे व सगळ्यांनी खायचे. आम्ही शेताच्या बांधावरील बोराच्या झाडाची बोरं तोडायची , बोरं तोडताना पायात काटा रूतला तर तो काढायचा,पायातून थोडं रक्त यायचं, शेतातील मोटेच्या पाण्याने पाय धुवायचा, थोडं लंगडत चालायचं पण बोरं, चिंचेचा पाला तोडून खायचाच. शेतात मोठ्या झाडाखाली सावलीत सतरंजी अंथरून त्यावर गोलाकार बसायचं मध्ये जेवणाचे डबे ठेवायचे गप्पा गोष्टी करत जेवायचं. जेवायला पण वेगळा मेनू असायचा. दशमी, थालिपीठ, पुऱ्या, पराठे, बटाट्याची भाजी , लोणचं, चटणी, मसालेभात, शीरा व दिवाळीचे फराळाचे पदार्थ उरले असतील तर ते घ्यायचे. यानंतर तुळशीच्या लग्नाला बोरं, चिंचा ऊस याचा नैवेद्य दाखवून ते खायला सुरूवात करायची. 

आवळा नवमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आवळ्याचा रस टाकून स्नान करावे. आवळ्याच्या झाडाची पूजा करावी. आवळ्याला धात्री वृक्ष असेही म्हणतात. म्हणून पुजेच्या वेळी  'ओम धात्र्ये नम:' असा मंत्र म्हणावा. आवळ्याच्या वृक्षाच्या छायेत अनुभवलेली शितलता आपल्या आयुष्यात यावी, म्हणून प्रार्थना करावी. 

आपल्या आसपासच्या परिसरात परदेशी झाडांची एवढी गर्दी झाली आहे, की देशी झाड शोधूनही सापडत नाही. म्हणून अशा उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या झाडांची लागवड करावी. त्यांचे पालन पोषण करावे. आवळे नवमीच्या निमित्तानेही आवळ्याचे बीज रोवता येईल. त्या वृक्षाचा विस्तार लक्षात घेऊन झाड लावावे आणि त्याचा निगराणीदेखील करावी. यथासांग पूजा झाल्यावर आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा मारावी आणि दिवेलागण करून, नैवेद्य दाखवून पूजा पूर्ण करावी. 

देवी लक्ष्मीने आवळ्याच्या वृक्षाझाली बसून तीव्र तपश्चर्या केली होती. तिच्यावर प्रसन्न होऊन भगवान महाविष्णू आणि भगवान महेश यांनी तिला दर्शन दिले. तेव्हापासून आवळा नवमी हे व्रत श्रद्धेने केले जाते.

आयुर्वेदात आवळ्याला अतिशय महत्त्व आहे. ते एक अमृत फळ आहे. अनेक आजारांवर गुणकारी आहे. त्यात मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्व असते. विशेषत: हिवाळ्यात शक्तीवर्धनासाठी आवळ्याचे सरबत, मोरावळा, लोणचे, कँडी खाल्ली जाते. पचनक्रिया उत्तम होण्यासाठी जेवणानंतर रोज आवळा कँडी खावी. प्रवासात मळमळत, गरगरत असेल किंवा तापात तोंडाची चव गेली असेल, तर आवळा सुपारी योग्यप्रकारे काम करते. केसगळतीवर आवळा तेल रामबाण उपाय म्हणून वापरला जातो. आवळ्याची आंबट, तुरट चव आणि त्याचा रसरशीतपणा, हिरवा पोपटी रंग सर्वांना आकर्षून घेतो. 

जेव्हा संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली बुडाली आणि पृथ्वीवर जीवनच नव्हते, तेव्हा ब्रह्मदेव कमळाच्या फुलात बसून निराकार परब्रह्माची तपश्चर्या करीत होते. त्यावेळी ब्रह्माजींच्या डोळ्यातून ईश्वरीय भक्तीचे अश्रू गळत होते. या अश्रूंपासूनच आवळ्याच्या झाडाची उत्पत्ती झाली, असे म्हटले जाते.

वड, पिंपळ, बेल, अशोक आणि आवळा या वृक्षांना 'वृक्ष पंचवटी' म्हटले जाते.  लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, सर्व वयोगटासाठी आवळा गुणकारक आहे, बलवर्धक आहे. त्याची पूजा करणे आणि त्याच्या वृक्षाच्या सान्निध्यात वेळ घालवणे, हाच आवळे नवमीचा हेतू आहे.  

Web Title: Amla Navami 2022 : Celebrate Amla Navami today by eating amla and read its cultural, mythological and Ayurvedic significance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.