Amla Navami 2023: द्वापरयुगाची सुरुवात झाली तो आजचा आवळा नवमीचा दिवस; सविस्तर वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 02:46 PM2023-11-21T14:46:38+5:302023-11-21T14:46:58+5:30
Kushmanda Navami 2023: आज कुष्मांड तथा आवळा नवमी आहे, आजच्या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व जाणून घेऊ आणि आजची तिथी कशी साजरी करावी तेही पाहू.
आवळा नवमी अर्थात कार्तिक शुक्ल नवमीचा दिवस. या दिवशी द्वापर युगाची सुरुवात झाली असा पुराणात उल्लेख आहे. यादृष्टीने आजच्या दिवसाचे महत्त्व आहेच, शिवाय आजचा दिवस कुष्मांड नवमीसाठीही ओळखला जातो. या दोन्ही दिवसांचे महत्त्व जाणून घेऊ.
आजच्या तिथीला अक्षय नवमी तथा आवळा नवमी म्हणतात. भगवान विष्णूंचा निवास हा आवळा वृक्षावर असतो असे म्हणतात म्हणून आजच्या तिथीला सर्व देवी देवता आवळा वृक्षाच्या ठायी येऊन निवास करतात, तसेच या दिवशी आवळा वृक्षातून अमृत बिंदुचा वर्षाव होत असतो अशी मान्यता आहे. म्हणून आजच्या तिथीच्या निमित्ताने आवळ्याचे पंचोपचार पूजन, गोड नैवेद्य, प्रदक्षिणा आणि मग वृक्षाच्या छायेत अन्नदान व स्वतः भोजन केले जाते यामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती होते.
आवळा नवमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आवळ्याचा रस टाकून स्नान करावे.आवळ्याला स्पर्श करावा. आवळ्याला धात्री वृक्ष असेही म्हणतात म्हणून पुजेच्या वेळी 'ओम धात्र्ये नम:' किंवा 'ओम नमो भगवते वासुदेवाय' असा मंत्र म्हणून पूजन करावे व आवळ्याच्या वृक्षाच्या छायेत अनुभवलेली शितलता आपल्या आयुष्यात यावी, म्हणून प्रार्थना करावी.
आवळे नवमीच्या निमित्तानेही आवळ्याचे बीज किंवा वृक्षारोपण करून संवर्धन करावे व विधिवत पूजा करावी.आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा मारावी व दिवेलागण करून, नैवेद्य दाखवून पूजा पूर्ण करावी
देवी लक्ष्मीने आवळ्याच्या वृक्षाखाली बसून तीव्र तपश्चर्या केली होती ,तिच्यावर प्रसन्न होऊन भगवान महाविष्णू आणि भगवान महेश यांनी तिला दर्शन दिले.
कुष्मांड नवमी महत्व आणि उपासना :
>> या दिवशी कुष्मांडासूर या दैत्याचा वध भगवान विष्णूंनी केला,आणि त्याच्या शरीरातून. कुष्मांड म्हणजेच कोहळे ची वेल उत्पन्न झाली होती अशी मान्यता आहे. त्यामुळे यादिवशी कोहळे आणून त्याचे पूजन करून ते पुरोहितास दान केले जाते.
>> यादिवशी श्री दुर्गा मातेचे चतुर्थ रूप कुष्मांडा देवीचा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे दुर्गा सप्तशती पाठ व देवीची कोणतीही सेवा उपासना अतिशय फलदायी आहे.
>> आयुर्वेद नुसार आवळा गुणकारक आहे, बलवर्धक आहे. त्याची पूजा करणे आणि त्या वृक्षाच्या सान्निध्यात वेळ घालवणे, हाच आवळे नवमीचा मुख्य हेतू आहे.