स्पष्ट उच्चारासाठी आणि तोतरेपणा घालवण्यासाठी प्रभावी उपाय म्हणजे प्रात: स्नान!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 05:49 PM2022-10-18T17:49:27+5:302022-10-18T17:49:48+5:30
अंघोळ रोजच करतो, पण तो केवळ सोपस्कार नाही तर फार मोठा उपचारसुद्धा आहे, सविस्तर जाणून घ्या!
दिवसाची सुरुवात ही स्नानापासून होत असते. अंग स्वच्छ केल्याशिवाय काहीही कर्म करू नये. म्हणूनच आपल्याकडे स्नानाचे फार महत्त्व आहे. संन्यस्त, वैराग्य प्राप्त झालेल्या व्यक्तींनी `त्रिकाल' स्नान करण्याची पद्धत आहे. त्यातील पहिले सकाळचे स्नान सूर्योदयापूर्वी तर संध्याकाळचे स्नान सूर्यास्तानंतर करावे.
स्नानाचे वेळी दक्षिण दिशेला तोंड असू नये, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. सूर्योदयापूर्वी करण्यात येणाऱ्या स्नानाला प्रात:स्नान म्हणतात. त्यावेळी स्नान करणाऱ्याने पूर्वेला सूयाकडे किंवा उत्तर दिशेला तोंड करावे. तर संध्याकाळचे स्नानाचे वेली स्नान करणाऱ्याने पश्चिमेला किंवा उत्तर दिशेला तोंड करावे. संध्याकाळच्या स्नानाला सायंस्नान म्हणतात.
प्रात:स्नानानंतर सूर्याची किरणे अंगावर घेण्याची शास्त्रात पद्धत सांगितली आहे. तसे केल्याने मन उल्हसित होते व बुद्धी आपोआप प्रगल्भ होत जाते. याचाच अर्थ, स्नानामुळे प्रज्ञाजागृतीचा थोडासा आविष्कारच जणू होऊ लागतो. तसेच आत्मविश्वास वाढतो, निर्णयशक्ती येते, नीट बोलता येते.
स्नानासाठी कधीही फार कढत किंवा फार थंड पाणी घेऊ नये. तर कोमट पाणी घ्यावे. गार पाण्यात गरम पाणी घालावे व ते कोमट करून झाल्यावर त्याने स्नान करावे. मुखाने पवित्र नद्यांचा नामोच्चार करावा. आपल्याकडे शास्त्रात `स्मरण' फार महत्त्वाचे सांगितले आहे. भगवंतसुद्धा स्मरण केल्यावर कृपा करीतच असतात.
स्नानाचे वेळी भगवंताचे नामस्मरण तोंड बंद ठेवून मनातल्या मनात केले तरी चालते. माणसाने फक्त स्नान करतेवेळी स्वत:च्या डोक्यावर पाणी घेताना भगवंताच्या नावाचा तोंडाने उच्चार करू नये. तसे केले तर त्या भगवंताचे रूप स्नानकत्र्याला प्राप्त झाल्यासारखे होईल. ते कदापिही शक्य नाही. म्हणून अशा वेळी शास्त्रात फक्त पवित्र नद्यांची नावे घेण्याची आपल्याकडे पद्धत आहे. उदा. गंगे, यमुने, गोदे, भागिरथी, कृष्णे, सरस्वती इ. सर्व भक्तांनी प्रात:स्नानाला जरूर महत्त्व द्यावे. जे लोक बोलताना अडखळतात, त्यांनी प्रात:स्नान जरूर करावे.
प्रात:स्नान सूर्योदयापूर्वी करणे आवश्यक आहे. तरच प्रज्ञाजागृती होते. हे अनंत काळ करावे लागते. त्यात सातत्य हवे. मुळीच खंड नको. पूर्वीचे लोक नदीत उभे राहून अघ्र्य देत असता. पहाटेची वेळ ही ब्राह्म मुहूर्ताची वेळ असते व त्यामुळे ती महत्त्वाची मानलेली आहे. अखंड काळ असे केल्यानंतर प्रज्ञाजागृती होत असते, इतके प्रात:स्नानाला महत्त्व आहे.
स्नानामुळे बाह्य शरीर स्वच्छ होत असते. म्हणूनच अंगावरील मळ निघण्याइतपतच साबणाचा वापर करावा. स्नानाचे पाणी तापवताना त्यावर झाकण ठेवावे. त्यामुळे पाण्याला शुद्धता येते. नदीवर स्नान करताना नदीला पाठ न दाखवता नदी ज्या दिशेने प्रवाही असेल त्या दिशेने तोंड करून स्नान करावे. स्नान करताना चुकूनही रामरक्षा, अथर्वशीर्ष, गायत्री मंत्र ही स्तोत्र म्हणू नयेत. स्नान झाल्यावर म्हणावीत.
पूर्वीच्या काळी स्नानासाठी पाणी न मिळाल्यास सूर्यस्नान, भस्मस्नान, पवनस्नान इ. प्रकार चालत. आपल्याकडे स्नानानंतर देवपूजा किंवा इतर साधना करण्यापूर्वी अंगाला भस्म लावण्याची पद्धत आहे. अंगाला भस्म लावल्याने बाह्य अंगाची शुद्धी होते.
तसंही आता दिवाळीत अभ्यंग स्नान भल्या पहाटे करणार आहोतच, तिथूनच ही नवीन सवय लावून घेऊया!