आनंद तरंग: मन वढाय वढाय...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 03:41 AM2020-08-26T03:41:02+5:302020-08-26T03:41:21+5:30
मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची अतुलनीय छाप सोडणारे खलनायक अभिनेते निळू फुले यांना बघताच क्षणी लोकांनी पायातल्या चपला, जोडे, पायताण फेकून मारलं. इतकं त्यांच्या अभिनयाशी लोकांचं मन एकरूप झालेलं होतं.
सुजाता पाटील
बहिणाबाई म्हणतात, ‘मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर! किती हाकलं हाकलं फिरी येतं पिकावर’ म्हणजे हे मन कसं आहे माहीत आहे का? फसवं. मृगजळासारखं. रूप, गंध, आकार नाही. तरीही ते आपल्यासोबत सदैव असतं. ज्याचं मन निरोगी तो मनुष्य यशस्वी. ज्याचं मन कमकुवत त्याला हळूहळू शारीरिक व्याधीही होतात. इंद्रधनुष्याप्रमाणे मनही एकाचवेळी अनेक रंग आपल्या अंगा-खांद्यांवर घेऊन मिरवत असतं. आणि इथेच आपण थोडं बावचळतो. स्वत:चा खरा रंग शोधण्यात. मनाचेही अनेक प्रकार. दुर्योधनासारखे वैशी मन, त्याउलट श्रीकृष्णासारखं रक्षित मन, एक जीव घेणारं मन, तर दुसरीकडे जीवनदान देणारं. आभासी मन. मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची अतुलनीय छाप सोडणारे खलनायक अभिनेते निळू फुले यांना बघताच क्षणी लोकांनी पायातल्या चपला, जोडे, पायताण फेकून मारलं. इतकं त्यांच्या अभिनयाशी लोकांचं मन एकरूप झालेलं होतं. तुम्हाला माहीत आहे राष्ट्रांनाही मन असतं? उदाहरणार्थ स्वीत्झर्लंडचं नाव काढताच आपल्या मनाचा पिसारा अगदी आनंदून, फुलून जातो. आपण प्रत्यक्ष जरी हे ठिकाण पाहिलेलं नसलं तरी आजतागायतच्या वर्णनातून आपलं मन तिथे गुंतलेलं असतं; परंतु पाकिस्तानचं नाव काढताच आपलं मन खवळून उठतं. कारण, मनाला भावनांच्या संवेदना पोहोचतात व त्या पद्धतीने ते व्यक्त होतं. जगावर दादागिरी करणाऱ्या अमेरिकेविषयी आपलं मनही कुरबुरतं. कठीणसमयी मदतीला धावून येणाºया रशियाच्या यशाबद्दल आपल्या मनात प्रेम आणि आदराची भावना उफाळून येत. आताचं ताजं उदाहरण घ्या. संपूर्ण जगाला कोरोनासारख्या महामारीमध्ये ढकलणाºया, उद्दामपणे गलवान खोºयात घुसखोरी करणाºया चीनबद्दल मन संतापाने पेटून उठतं. आपण जसे मनावर संस्कार करू त्यापद्धतीने ते आपली दिशा बदलत राहतं. आता मनाची गाडी खड्ड्यात न्यायची का इच्छितस्थळी, ते सर्वस्वी आपण ठरवायचं....!!