Anant Chaturdashi 2022: बाप्पाला नैवेद्य दाखवताना धर्मशास्त्रानुसार दिलेले नियम पाळले तर तो नैवेद्य त्याच्यापर्यंत पोहोचतोच!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 02:54 PM2022-09-08T14:54:17+5:302022-09-08T14:56:30+5:30

Anant Chaturdashi 2022: नैवेद्य दाखवणे आणि अर्पण करणे यात खूप तफावत आहे, त्यातली योग्य पद्धती कोणती हे जाणून घेऊ. अनंत चतुर्दशीला नैवेद्य अर्पण करण्याआधी ही पद्धत जाणून घ्या.

Anant Chaturdashi 2022: If you follow the rules given by Dharmashastra while offering food to Bappa, then the offering will reach Him! | Anant Chaturdashi 2022: बाप्पाला नैवेद्य दाखवताना धर्मशास्त्रानुसार दिलेले नियम पाळले तर तो नैवेद्य त्याच्यापर्यंत पोहोचतोच!

Anant Chaturdashi 2022: बाप्पाला नैवेद्य दाखवताना धर्मशास्त्रानुसार दिलेले नियम पाळले तर तो नैवेद्य त्याच्यापर्यंत पोहोचतोच!

googlenewsNext

आपण नैवेद्य दाखवतो, पण तो अर्पण करतो का? दाखवणे आणि अर्पण करणे या दोन्ही शब्दात जेवढी तफावत आहे, तेवढाच कृतीतही फरक आहे. आपण बाप्पाला नैवेद्य दाखवतो, पण अर्पण करत नाही. तो कसा करायचा ते जाणून घेऊ. 

नैवेद्य समर्पण करण्याचा विधी व श्लोक :

नैवेद्याचे ताट वाढल्यावर तुलसीपत्र ताटातील पदार्थावर ठेवावीत व ताट दुसऱ्या ताटाने झाकावे. देवासमोर पाण्याने एक चौकोनी भरीव मंडल करावे व त्यावर एक पाट ठेवावा. त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे. डाव्या हातात पळी घेऊन, पळीतील पाण्याने  उजव्या हातात पाणी घेऊन ताटाभोवती शिंपडत फिरवावे. पाणी सिंचन करताना, 'सत्यं त्वर्तेन परिषिञ्चामि' हा मंत्र म्हणावा.  नंतर एक पळी ताम्हनात सोडावे आणि `अमृतोपस्तरणमसि' म्हणावे. त्यानंतर डाव्या हाताने नैवेद्याच्या ताटावरील झाकलेले ताट उचलून उजव्या हाताने आतील अन्नाचे पाच घास दाखवून आणखी एक सहावा घास दाखविताना लहान मुलास आई ताटातील भात प्रेमाने भरवते, तसा भरवावा. घास भरवताना म्हणावे...

प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा!

नैवेद्य दाखवताना ग्रासमुद्रा दाखवाव्यात. 

प्राणमुद्रा : कनिष्ठकामध्यमाअंगुष्ठ
अपानमुद्रा : अनामिकातर्जनीअंगुष्ठ
व्यानमुद्रा : मध्यमातर्जनीअंगुष्ठ
उदानमुद्रा : कनिष्ठिकाअनामिकाअंगुष्ठ
समानमुद्रा : पाचही बोटे

पाचही बोटे वरील प्रकारे त्या त्या अंगुली एकत्र घेऊन ग्रासमुद्रा करावी. नैवेद्य दाखवून झाल्यावर एक पळी पाणी ताम्हनात सोडून 'प्राशनार्थे पानीयं समर्पयामि.'  असे म्हणून एका पेल्यात देवाला प्यायला पाणी ठेवायचे. नंतर पुन्हा सगळे ग्रास दाखवावे. शेवटी चार पळ्या पाणी ताम्हनात सोेडावे. पाणी सोडताना, 'अमृतापिधानमसि', `उत्तरापोशनं समर्पयामि', `हस्तप्रक्षालम् समर्पयामि', 'मुखप्रक्षालनं समर्पयामि' असे चा मंत्र म्हणावे. अत्तर असल्यास फुलाला लावून `करोद्वर्तनं समर्पयामि' म्हण ते फूल देवास वहावे. अत्तर नसल्यास `करोद्वनार्थे चंदन समर्पयामि'' म्हणून ते फूल गंध लावून देवास वहावे. 

सरतेशेवटी, देवाला आवाहन करून म्हणावे, 'तुझ्या ठिकाणी माझी भक्ती अचल असू दे. इहलोकीची कामना पूर्ण होऊन परलोकी उत्तम गती मिळू दे. तुझ्या कृपाशिर्वादाने नैवेद्यार्थी वाढलेल्या अन्नात प्रसादत्त्व उतरू दे आणि ते अन्न भक्षण केल्यावर आम्हाला चांगल्या कार्याची प्रेरणा सदैव मिळू दे.' असा असतो नैवेद्यविधी. हे सर्व वाचताना जरी वेळ लागत असला, तरी नैवेद्य दाखवताना अवघ्या काही क्षणांचा अवधी लागतो. तो वेळ जरूर काढावा. देवाशी क्षणभर संवाद साधावा. आपल्या आप्त-नातलगांना आपण जसा प्रेमळ आग्रह करतो, तसा देवाला करावा आणि त्याच्या आशीर्वादाने आपल्याला सुग्रास भोजन मिळत आहे, याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी. आपल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला दोन वेळचे पोटभर जेवण मिळो, अशी प्रार्थना करावी. मगच तो प्रसाद ग्रहण करावा. 

आजवर आपण कसा नैवेद्य दाखवत होतो?

एका कीर्तनात कथेकरी बुवांनी नैवेद्याचा विषय निघताच मजेशीर कथन करायला सुरुवात केली. ते ऐवूâन कीर्तनात जोरदार हशा पिकला. बुवा म्हणाले, 'आपण नैवेद्य दाखवतो, समर्पित करत नाही. आपल्याला माहित असते, दगडाचा देव खात नाही. तरी सुद्धा न जाणो, एखादा लाडू नाहीसा झाला तर, म्हणून प्रथम पाणी फिरवतो, मर्यादा घालतो, देवा या रेषेच्या आत येऊ नको असे बजावतो. काळीज धडधडते म्हणून हात ठेवतो. डोळे किलकिले करून पाहतो. एवढ्या सपाट्यातून देव यदाकदाचित आत येईल, म्हणून हाताने बाजूला सारतो. असा नैवेद्य दाखवून झाला, की चटकन ताट उचलून घेतो. मग कसा बरे पोहोचेल आपला नैवेद्य? 

आपण जे खातो, ते देवाच्या कृपेने. म्हणून पहिला घास त्याला. हे प्रेम, समर्पण वृत्ती नैवेद्य विधीत आवश्यक असते. मग बघा देव जेवायला येतो की नाही,

कौन कहते है भगवान खाते नही, तुम शबरी के जैसे खिलाते नही।।
अच्युतम केशवं कृष्ण दामोदरम, राम नारायणं जानकी वल्लभम।।

Web Title: Anant Chaturdashi 2022: If you follow the rules given by Dharmashastra while offering food to Bappa, then the offering will reach Him!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.