Anant Chaturdashi 2023: अनंत चतुर्दशीला 'अनंताचा धागा' बांधायला विसरू नका; तो का बांधायचा तेही जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 05:55 PM2023-09-26T17:55:12+5:302023-09-26T17:57:36+5:30
Anant Chaturdashi 2023: अनंत चतुर्दशीला आपण बाप्पाला निरोप देतो, त्यादिवशी भगवान विष्णूंचीही पूजा असते, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
यंदा गुरुवार २८ सप्टेंबर २०२३ रोजी या वर्षीच्या गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. बुद्धिदात्या, विघ्नहर्त्या बाप्पाकडे तुम्ही यश, समृद्धी, कीर्ती आणि बरेच काही मागितले असेल. त्यालाच जोड द्या अनंताच्या धाग्याची! अनंत चतुर्दशीला (Anant Chaturdashi 2023) भगवान विष्णूंची अनंत या नावे पूजा केली जाते व पूजेत अनंताचा धागा ठेवून पूजा झाल्यावर हा धागा मनगटावर बांधला जातो.
असे म्हणतात की जेव्हा पांडवांनी द्युतात सर्वकाही गमावले होते, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा वैभव मिळवण्यासाठी अनंत चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले. तसेच भगवान विष्णूंचे हे रूप ज्याला आदी नाही आणि अंत नाही, अशा स्वरूपाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि वेदना दूर होतात.परंतु अनंत चतुर्दशीचे व्रत तसे पाहता थोडे अवघड आहे. परंतु ज्यांना ते व्रत १४ वर्षे करणे शक्य नाही, त्यांनी निदान भगवान विष्णूंची पूजा करून अनंताचा धागा बांधावा आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर होऊन यश प्राप्त व्हावे, अशी भगवान विष्णूंना प्रार्थना करावी. त्याचा थोडक्यात विधी जाणून घेऊया.
>> अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturdashi 2023) दिवशी भगवान विष्णूच्या अनंत स्वरूपाची पूजा केल्यानंतर अनंताचा धागा बांधला पाहिजे. या चमत्कारी धाग्यात प्रत्येक दुःख आणि दैन्यातुन मुक्त होण्याची शक्ती आहे. हा अनंत धागा मनगटावर बांधला जातो. त्यात १४ गाठी असतात. हा धागा पुरुषांच्या उजव्या हाताला आणि स्त्रियांच्या डाव्या हाताला बांधला जातो.
>> १४ गाठींचा धागा बाजारात उपलब्ध होतो. परंतु तसा धागा न मिळाल्यास लाल धाग्याला चौदा गाठी मारून तो धागा पूजेत ठेवावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा १०८ वेळा जप करून तो धागा विष्णूंच्या पायी लावून मग आपल्या मनगटाला बांधावा.
>> या १४ गाठी भगवान विष्णूच्या प्रत्येक स्वरूपाचे प्रतीक आहेत. हे सूत्र परिधान केल्यानंतर, किमान १४ दिवस मांसाहार, मद्य, तसेच शारीरिक संबंध टाळावेत असे शास्त्र सांगते. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून क्षणिक मोहाला बळी पडू नये, यासाठी हे धर्माचरण सुचवले असावे.
>> ज्यांनी आयुष्यात सर्वस्व गमावले आहे, जर त्यांनी हे सूत्र बांधले तर त्यांना नवीन ऊर्जा मिळते. हे सूत्र प्रत्येक दुःख आणि दुःख दूर करते आणि जीवन आनंदाने भरते.
>> शक्य असल्यास अनंत सूत्र धारण केल्याच्या दिवशी उपवास ठेवा आणि श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे. यामुळे आत्मबळ वाढते आणि व्यक्तीला संपत्ती, सुख-समृद्धी सर्व काही मिळते.
>> एक धागा बांधल्याने खरेच हे सर्व शक्य होऊ शकते का, असा अनेकांना प्रश्न पडेल. परंतु हा केवळ धागा नाही, तर ही ऊर्जा आहे. स्वतःला दिलेला आत्मविश्वास आहे. जर पांडव त्यांचे वैभव मिळवू शकतात, तर आपण आपले गमावलेले किंवा आजवर केवळ स्वप्नात पाहिलेले वैभव का मिळवू शकणार नाही? नक्कीच मिळवू शकू. भगवंत आपल्या पाठीशी आहेच आता फक्त प्रयत्नांची जोड द्यायची आहे. त्याची आठवण हा धागा सातत्याने देत राहील, यासाठी हे व्रताचरण करायचे असते.