Anant Chaturdashi 2023: बाप्पाला निरोप देताना मनातल्या मनात आठवणीने म्हणा 'हे' मंत्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 07:00 AM2023-09-27T07:00:00+5:302023-09-27T07:00:02+5:30
Anant Chaturdashi 2023: बाप्पाला निरोप देताना आपण भावुक होणं स्वाभाविक आहे, पण त्याबरोबर उपासनाही महत्त्वाची; त्यासाठी करा दिलेले मंत्रोच्चारण!
करता पाहता बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली. २८ सप्टेंबर रोजी यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. या दिवशी अनंत चतुर्दशीला दहा दिवस बसलेले बाप्पा आपल्या गावी परत जातील. जेवढ्या उत्साहात बाप्पाचे आगमन करतो, तेवढ्याच आदरपूर्वक बाप्पाला निरोप दिला पाहिजे, तरच तोही तृप्त मनाने जाताना आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन जाईल.
त्यावेळेस बाप्पाची यथासांग पूजा करून त्याला प्रिय लाडू, मोदकांचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्व भाविकांना वाटा. बाप्पाचे विसर्जन करण्याआधी बाप्पाच्या सान्निध्यात काही काळ शांत बसून 'ओम गण गणपतये नम:' या मंत्राचा जप करा. या मंत्राचा जप करून झाल्यावर पुढील मंत्र म्हणत बाप्पाला दुर्वांची जुडी अर्पण करा.
- ॐ गणाधिपाय नम:
- ॐ उमापुत्राय नम:
- ॐ विघ्ननाशनाय नम:
- ॐ विनायकाय नम:
- ॐ ईशपुत्राय नम:
- ॐ सर्वसिद्धप्रदाय नम:
- ॐ एकदन्ताय नम:
- ॐ इभवक्त्राय नम:
- ॐ मूषकवाहनाय नम:
- ॐ कुमारगुरवे नम:
यानंतर श्री गणेशाची आरती करा आणि विसर्जनाच्या ठिकाणी नेल्यानंतर पुन्हा एकदा आरती करा आणि श्री गणेशाच्या मूर्तीला कुठेही धक्का लागणार नाही, मूर्तीचा अपमान होणार नाही याची काळजी घेत मूर्तीचे विसर्जन करा. त्यावेळेस पुढील मंत्र म्हणा...
यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्।
इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च ॥
शास्त्रानुसार विसर्जन हे वाहत्या पाण्यात होणे आवश्यक असल्यामुळे गणेशमूर्तीचे विसर्जन जलाशयात म्हणजे तलाव, विहिरीत करू नये. अन्यथा त्या जलाशयातील तो जलाशय प्रदुषित तर होतेच पण त्यातील नैसर्गिक उमाळे मुजून जातात व कालांतराने तो जलाशय निरुपयोगी ठरतो. गणेशमूर्तीचे विसर्जन वाहत्या पाहण्यात करणे शक्य नसल्यास नागपंचमी, पोळा, हरितालिका, पार्थिवशिवपूजा, जन्माष्टमी इ. व्रतांमधील मृत्तिकेच्या मूर्तीप्रमाणेच शेतात, घरातील बागेत किंवा तुळशीवृंदावनात विसर्जन करणे इष्ट ठरते.
हे सर्व झाल्यावर मनोभावे देवाला प्रार्थना करा... गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या!