अनंत चतुर्दशी: ‘अशी’ करा गणपतीची उत्तरपूजा; पाहा, विसर्जन विधी, मंत्र अन् प्रार्थना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 01:36 PM2024-09-15T13:36:54+5:302024-09-15T13:37:55+5:30

Anant Chaturdashi Ganpati Visarjan Uttar Puja Vidhi In Marathi: बाप्पाला निरोप देताना गणपती विसर्जन उत्तर पूजा करणे महत्त्वाचे मानले गेले आहे. जाणून घ्या...

anant chaturdashi 2024 know about ganpati visarjan uttar puja vidhi with mantra in marathi | अनंत चतुर्दशी: ‘अशी’ करा गणपतीची उत्तरपूजा; पाहा, विसर्जन विधी, मंत्र अन् प्रार्थना

अनंत चतुर्दशी: ‘अशी’ करा गणपतीची उत्तरपूजा; पाहा, विसर्जन विधी, मंत्र अन् प्रार्थना

Anant Chaturdashi Ganpati Visarjan Uttar Puja Vidhi In Marathi: गणेशोत्सवाची आता सांगता होत आहे. १७ सप्टेंबर २०२४ रोजी अनंत चतुर्दशी आहे. मंडळांसह हजारो घरगुती गणपतीचे विसर्जन या दिवशी होईल. भाविकांचा, भक्तांचा यथोचित पाहुणचार घेतल्यानंतर बाप्पा आपल्या गावी परत जाईल. बाप्पाला निरोप देताना अनेकांना भावना अनावर होतात. साश्रू नयनांनी गणरायाला निरोप दिला जातो. गणपतीच्या पहिल्या दिवशी पार्थिव गणपती पूजन करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनाच्या आधी केली जाणारी गणपती उत्तरपूजा महत्त्वाची आहे. गुरुजी मिळत नसतील किंवा आले नाहीत, तरी घरीच आपण ही गणपती विसर्जन उत्तरपूजा करू शकतो. 

अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देताना उत्तर पूजा करण्याची प्रथा परंपरा आहे. या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देताना कुळधर्म, कुळाचाराप्रमाणे पूजन करण्यासह काही विधी करावेत, असे म्हटले जाते. देशातील कोट्यवधी घरांमध्ये गणपतीचे पूजन केले जाते. काही ठिकाणी दीड दिवस, पाच दिवस, गौरी-गणपती, सात दिवस गणपती पूजन केले जाते. अनेक घरांमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश पूजन करण्यात येते. गणेश चतुर्थीला स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाते. 

गणपती विसर्जन उत्तरपूजा विधी

- सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी.

- गणपतीला आवडणारे मोदक, लाडू, मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा.

- गणपतीला नवीन वस्त्रे अर्पण करावीत.

- आचम्य श्रीसिद्धिविनायकमहागणपतीप्रीत्यर्थं गंधादिपंचोपचारैः उत्तरपूजनं करिष्ये । महागणपतये नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामिः । अक्षतां हरिद्रां कुंकुमं च समर्पयामि । श्रीमहागणपतये नमः । सिंदूरंदूर्वांकुरान् कालोद्भवपुष्पाणि च समर्पयामि ।

वरीलप्रमाणे मंत्र म्हणून गणपतीला गंध , फुले , अक्षता , हळद – कुंकू , दूर्वा , शेंदूर हे उपचार वाहावेत.

- श्रीमहागणपतये नमः । धूपं समर्पयामि । महागणपतये नमः । दीपं समर्पयामि । महागणपतये नमः । नैवेद्यं समर्पयामि ।

वरील मंत्र म्हणून गणपतीला धूप , दीप ओवाळावा व नंतर नैवेद्य दाखवावा . कापूर लावून आरती करावी व पूजेच्या शेवटी दिलेले मंत्रपुष्प व प्रार्थनेचे मंत्र म्हणावेत.

- एका कापडात सुपारी, दुर्वा, मिठाई आणि काही पैसे घ्यावेत. या वस्तू त्या कापडात गुंडाळून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवाव्यात.

- विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती आणि जयजयकार करावा.

- गणेशोत्सव काळात अनावधानाने झालेल्या चुकांबाबत गणपतीकडे क्षमायाचना करावी.

- गणपतीच्या मूर्तीसह पूजा साहित्य, हवन साहित्य आणि अन्य वस्तू विसर्जित कराव्यात.

बाप्पाला निरोप देताना ही प्रार्थना करा

गणराया बाप्पाला निरोप देण्यापूर्वी मनापासून प्रार्थना करावी. देवाला सांगणे करावे. साकडे घालावे. देवा गणराया, मी आपल्या चरणांचा दास आहे. माझ्या आकलनानुसार आणि यथाशक्तीनुसार मी आणि माझ्या कुटुंबाने तुझी सेवा केली आहे. जे काही अधिकउणे झाले असेल ते पूर्ण करून घ्या. माझ्या हातून, माझ्या मुलाबाळांचे हातून घडलेल्या अपराधांना क्षमा करा. सपरिवार आमचे रक्षण करा. सर्वस्वी मी आपला दास आहे. माझ्या सर्व संकटांचा परिहार करून माझ्या, आमच्या, कुटुंबाच्या समस्या, उद्योगधंदा तसेच नोकरीतील भासणाऱ्या अडचणी दूर करून त्यांत आम्हाला यश-लाभ व्हावा आणि प्रतिवर्षी असेच आनंदाने येऊन आमचे हातून सेवा करून घ्यावी. अधिक काय सांगू? माझा सर्व गोष्टी आपण जाणत आहात. कृपादृष्टी ठेवा हीच प्रार्थना.

अनंत चतुर्दशीचा गणपती विसर्जन मंत्र

अनेन कृत उत्तराराधनेन तेन श्रीभगवान् सिद्धिविनायकः सांगः सपरिवारः प्रियताम् । ॐ तत्सत् ॥

यातुं देवगणा: सर्वे पुजामादाय पार्थिवीम।
इष्टकामप्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च।।

गणपतीची प्रार्थना झाल्यावर असा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात. म्हणजे पूर्वी प्राणप्रतिष्ठेने आलेले देवत्व विसर्जित होते. त्यानंतर मूर्ती स्थिर आसनावरून थोडी पुढे सरकवून ठेवावी. मग मूर्ती उचलून समुद्रात किंवा कुळाचाराप्रमाणे योग्य त्या पवित्र स्थळी विसर्जित करावी. यावेळी काही ठिकाणी गणपतीच्या हातावर दही, लाह्या देण्याची परंपरा आहे. आपापले कुळधर्म, कुळाचाराप्रमाणे गणपती बाप्पाला निरोप द्यावा, असे म्हटले जाते. 

गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या!!!
 

Web Title: anant chaturdashi 2024 know about ganpati visarjan uttar puja vidhi with mantra in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.